Home | Business | Share Market | the stock market is at record levels; Due to good rainfall forecast

चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे शेअर बाजार विक्रमी पातळीवर; FMCG क्षेत्रात सर्वाधिक 1.81% वाढ

वृत्तसंस्था | Update - May 11, 2017, 03:00 AM IST

यंदा मान्सून संदर्भात सकारात्मक अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे भारतीय शेअर बाजार आजपर्यंतच्या सर्वात उच्चांकी पातळीवर बंद झाला. मुंबई शेअर बाजारात बुधवारी झालेल्या व्यवहारात ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ३१५ अंकाच्या वाढीसह ३०,३४८ या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ९० अंकाच्या वाढीसह ९४०७ या पातळीवर बंद झाला.

 • the stock market is at record levels; Due to good rainfall forecast
  नवी दिल्ली- यंदा मान्सून संदर्भात सकारात्मक अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे भारतीय शेअर बाजार आजपर्यंतच्या सर्वात उच्चांकी पातळीवर बंद झाला. मुंबई शेअर बाजारात बुधवारी झालेल्या व्यवहारात ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ३१५ अंकाच्या वाढीसह ३०,३४८ या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ९० अंकाच्या वाढीसह ९४०७ या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रमुख निर्देशांक दिवसभराच्या व्यवहाराच्या उच्चांकावर बंद झाले, तर निफ्टी पहिल्यांदाच ९४०७ या पातळीवर बंद झाला आहे.

  भारतीय बाजारातून मिळालेले सकारात्मक संकेतामुळेच बुधवारी शेअर बाजारात तेजी नोंदवण्यात आली आहे. हवामान खात्याने या आधी व्यक्त करण्यात आलेल्या पावसाच्या अंदाजात दुरुस्ती करून नवीन अंदाजात वाढ केली आहे. या अंदाजानुसार सर्वसामान्य पावसाच्या १०० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आधी ९६ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. भारतात मान्सून येण्याची वेळ जवळ आली असताना पावसाच्या अंदाजात झालेल्या वाढीमुळे बाजाराला सकारात्मक संकेत मिळाले आहेत. यामुळे बाजारात तेजी नोंदवण्यात आल्याचे मानले जात आहे.

  त्याचबरोबर देशात यंदा अन्नधान्याचेही विक्रमी उत्पादन होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कृषी मंत्रालयाच्या वतीने आधी व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजात वाढ करून यंदा विक्रमी गहू तसेच कडधान्याचे उत्पादन होणार असल्याची आकडेवारी मंगळवारीच जाहीर करण्यात आली होती. यामुळे महागाई दर नियंत्रणात राहण्याची शक्यताही वाढली आहे.
  कंपन्यांच्या खर्चात कपात तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरात कपात होण्याचीही शक्यता यामुळे वाढली आहे. यामुळे विशेष करून एफएमसीजी क्षेत्रात जोरदार खरेदी नोंदवण्यात आली आहे.

  आशियाई बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेताचाही बाजारावर परिणाम दिसून आला. त्याच बरोबर मंगळवारी विदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी केली. त्यामुळे देखील गुंतवणूकदारांची धारणा सकारात्मक झाली.

  कृषी क्षेत्रात तेजी : हवामान विभागाने चांगल्या मान्सूनचा अंदाज व्यक्त केल्यामुळे आज झालेल्या व्यवहारात खतांसंबंधित (फर्टिलायझर) शेअरमध्ये १२ टक्क्यांपर्यंतची तेजी नोंदवण्यात आली आहे. यात सर्वाधिक ११.४६ टक्के तेजी चंबल फर्टिलायझरच्या शेअरमध्ये नोंदवण्यात आली. या व्यतिरिक्त राष्ट्रीय केमिकल्समध्ये ६.६२ टक्के, एफएसीटीमध्ये ६ टक्के, मँग्लोर केमिकल्स अँड फर्टिलायझरमध्ये ३.५० टक्के तर नागार्जुन फर्टिलायझरमध्ये ४.९२ टक्क्यांची तेजी नांेदवण्यात आली आहे.

  कृषी उत्पन्नात वाढीचा अंदाज : भारतातील गहू तसेच कडधान्य उत्पादनात यंदा वाढ होणार असून गव्हाचे आतापर्यंतचे विक्रमी उत्पादन होणार असल्याचा अंदाज मंगळवारी कृषी विभागाने व्यक्त केला होता. त्यापाठोपाठ पुढील हंगामात चांगल्या पावसाची शक्यता असून कृषी उत्पादनात १५ टक्के वाढ होण्याची अपेक्षा बुधवारी वर्तवली आहे.

  गेल्या वर्षीपेक्षा यंदा खरीप हंगामात जास्त पेरणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचा परिणाम पुढील वर्षीच्या रब्बी हंगामावर देखील सकारात्मक पडेल.

  मोठ्या शेअरमध्ये खरेदी
  - हेवीवेट स्टॉक्समध्ये खरेदी झाल्यामुळे निर्देशांकात विक्रमी तेजी नोंदवण्यात आली.
  - सेन्सेक्सच्या दृष्टीने टॉप पाच कंपन्यांमधील केवळ टीसीएसचे शेअर घसरणीसह बंद झाले. टीसीएसमध्ये ०.९ टक्क्यांची घसरण झाली.
  - तर रिलायन्स उद्योग समूहात २.१७ टक्के, एचडीएफसी बँकेत १.२ टक्के, आयटीसीमध्ये ०.८७ टक्के आणि एचडीएफसीत ३.२५ टक्क्यांची वाढ झाली.
  - सेन्सेक्समध्ये समावेश असलेले २२ शेअर हिरव्या निशाणीवर बंद झाले.

  मिडकॅप, स्मॉलकॅपमध्ये तेजी
  भारतीय शेअर बाजारात बुधवारी झालेल्या व्यवहारात लार्जकॅप शेअरच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमध्ये मजबुती दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमध्ये झालेल्या खरेदीमुळे बाजारात तेजी नोंदवण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजारातील मिडकॅप निर्देशांकात ०.९२ टक्के तर स्मॉलकॅप निर्देशांकात ०.८१ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली आहे. तर निफ्टी मिडकॅप -१०० निर्देशांक ०.७१ टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

  मार्केट कॅप १२६ लाख कोटींवर
  मुंबई शेअर बाजारातील लिस्टेड सर्व कंपन्यांचा एकूण मार्केट कॅप १२६ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दुपारी झालेल्या व्यवहारात बीएसईचा एकूण मार्केट कॅप १२६.३४ लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. याआधी ४ मे रोजी बीएसई मार्केट कॅप १२५.६१ लाख कोटी रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता.

  एफएमसीजी क्षेत्रात खरेदी
  भारतीय शेअर बाजारात बुधवारी झालेल्या व्यवहारात आयटी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा निर्देशांक सोडला तर इतर सर्व क्षेत्रांतील निर्देशांक तेजीसह बंद झाले. एफएमसीजी क्षेत्रात सर्वाधिक १.८१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. वाहन क्षेत्रातील निर्देशांकात १.४४ टक्के तसेच औषधी क्षेत्रातील निर्देशांकात ०.०९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

Trending