आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारात या आठवड्यात मर्यादित घसरणीची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील आठवड्यात शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांत आणि समभागांत मर्यादित कक्षेत व्यवहार झाले. नव्या कळीच्या मुद्द्यांचा अभाव हे त्यामागचे प्रमुख कारण होते. तसे तर सुट्यांमुळे मागील आठवड्यात शेअर बाजारात कमी व्यवहार झाले. सुट्यांमुळे मोठे गुंतवणूकदार व व्यापारी बाजारात विशेष काही करणार नाहीत, अशीच अपेक्षा होती. याशिवाय आर्थिक वर्षाच्या समाप्तीची चिंता आणि वित्तीय तूट वाढ यांसारख्या कारणांनी बाजारातील वाढीला मर्यादा आल्या. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी फंडांकडून पोर्टफोलिओची फेररचना करण्याच्या व्यवहारांमुळे बाजारातील घसरणीलाही मर्यादा आल्या.

वित्तीय तूट २०१४-१५ या आर्थिक वर्षातील पहिल्या ११ महिन्यांत ६.०३ लाख कोटी रुपयांवर आली आहे. एक वर्षापूर्वीच्या समान कालावधीतील ५.९९ लाख कोटींच्या तुलनेत थोडी जास्त आहे. एप्रिल ते फेब्रुवारी या काळात वित्तीय तूट सरकारच्या नव्या अंदाजाच्या ११७ टक्क्यांबरोबर आहे. एक वर्षापूर्वीच्या समान कालावधीत हे प्रमाण ११४.३ टक्के होते. बाजाराच्या दृष्टीने ही निश्चितच चांगली बातमी नाही. एचएसबीसी मार्किटचा मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय इंडेक्स किरकोळ वाढीसह ५२.१ वर आला आहे. मात्र, बाजारातील कल सकारात्मक करण्याइतपत हा आकडा तगडा आहे, असे मानता येणार नाही. बाजाराला रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्याकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. मात्र, पतधोरणात रोख पैसा व्यवस्थेत आणण्यासाठी काहीच उपाय न केल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून आली. मात्र, दुपारच्या सत्रात ही घसरण भरून काढत निर्देशांकांनी वाढ दर्शवली. धातू आणि खाण कंपन्यांच्या समभागांत मोठी खरेदी झाल्याने बाजार हिरव्या निशाणीसह बंद झाला.

जागतिक पातळीवर अमेरिका फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ दीर्घकाळ टाळू शकतो, असे संकेत आहेत. यामुळेही शेअर बाजारात तेजी दिसून आली. या आशेमुळे रोजगारविषयक कमजोर आकडेवारीची चिंता निष्प्रभ ठरली. अमेरिकेतील रोजगारविषयक आकडेवारी शुक्रवारी जाहीर झाली होती. मागील महिन्यात तेथे कमी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याचे चित्र आहे. एकंदरीत जगातील प्रमुख शेअर बाजार सध्या वेट अँड वॉच अशा भूमिकेत आहेत. आता कंपन्यांच्या आर्थिक कामगिरी दाखवणार्‍या निकालांचा हंगाम सुरू होणार आहे. हे निकालच आगामी काळातील बाजाराची दिशा ठरवणार आहेत.

येणार्‍या आठवड्यात बाजार चांगल्या स्थितीत दिसून येईल. मात्र, अद्यापही घसरणीचा धोका टळलेला नाही. निफ्टीला वरच्या दिशेने ८७८४ अंकांच्या आसपास तगडा अडथळा आहे. बाजारातील कलाच्या दृष्टीने ही पातळी महत्त्वाची ठरणार आहे. चांगल्या व्हॉल्यूमसह निफ्टीने ही पातळी पार केल्यास बाजारासाठी ते सकारात्मक संकेत राहतील. अशात निफ्टीला ८८४६ अंकांच्या आसपास तगडा अडथळा होईल. या पातळीनजीक कन्सोलिडेशन तसेच नफा वसुली दिसून येईल. मात्र, या पातळीपूर्वी ८७३६ च्या आसपास निफ्टीला एक छोटा अडथळा आहे. खालच्या दिशेने निफ्टीला ८५४८ अंकांच्या आसपास तगडा अडसर होईल. समजा हा स्तर तुटला तर बाजारातील घसरणीचा मार्ग मोकळा होईल. अशात निफ्टीला पुढील मध्यम आधार ८४५० अंकांच्या आसपास मिळण्याची शक्यता आहे.

एकूणच बाजारात मर्यादित घसरणीसह उत्तम स्थिती राहील, असे मला वाटते. समभागांच्या बाबतीत, या आठवड्यात एचडीएफसी बँक व इंडियन ऑइल चार्टवर उत्तम दिसताहेत. एचडीएफसी बँकेचा सध्याचा बंद भाव १,०३२.७५ रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य १०४९ रुपये आणि स्टॉप लॉस १,०१२ आहे. इंडियन ऑइलचा सध्याचा बंद भाव ३७२.२० रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य ३७८ रुपये आणि स्टॉप लॉस ३६६ रुपये आहे.
विपुल वर्मा
लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत. vipul.verma@dbcorp.in