आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकी आकड्यांवर अवलंबून असेल शेअर बाजार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय शेअर बाजार गेल्या आठवड्यातील अंदाजानुसार मर्यादेत कन्सॉलिडेट झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळालेल्या कमजोर संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाला. शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमतीमुळे जागतिक बाजारात मजबुती दिसून आली. कच्च्या तेलाच्या किमतीतील तेजी मंगळवारीदेखील कायम दिसली. ब्रेंट क्रूड वाढून ४९ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले होते. उत्पादक देशांमध्ये झालेल्या चर्चेमुळे दरात जास्त वाढ नोंदवण्यात आली.

अमेरिकेमध्ये आठवड्याच्या शेवटी महत्त्वाची आर्थिक आकडेवारी जाहीर होणार असल्याने त्यावर अांतरराष्ट्रीय बाजारातील पुढील धारणा अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सध्यातरी सतर्कता कायम दिसणार आहे. अमेरिकेत व्याजदराबाबत निर्णय घेण्यासंबधी फेडरल रिझर्व्हच्या वतीने बुधवारी जाहीर होणाऱ्या धोरणाचीही या आठवड्यात गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता होती. फेडरलच्या अपेक्षेप्रमाणे महागाई दर दोन टक्क्यांच्या खाली राहिल्याने, संमिश्र आर्थिक आकडेवारी आणि जगभरातील केंद्रीय बँकांनी आपापली अर्थव्यवस्था सांभाळलेली असल्याने लवकर फेडरल व्याजदरात वाढ करणार असल्याची शक्यता वाढली आहे. अमेरिकी शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सोमवारी सुट्या भागांच्या स्टॉक्समध्ये झालेल्या खरेदीमुळे विक्रमी पातळीवर पोहोचला होता. यामध्ये गेल्या काही आठवड्याभरातील विक्रम कायम राहिल्याचा परिणामदेखील दिसून आला, तर दुसरीकडे चीनमधील शेअर बाजारदेखील अधिकची आर्थिक मदत मिळण्याच्या अपेक्षेमुळे अनेक महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले. पुढील काळात अमेरिकेत या आठवड्यात जाहीर होणाऱ्या आर्थिक आकडेवारीवर बाजाराची दिशा अवलंबून असणार आहे. यामध्ये रिअल इस्टेट, ग्राहकी निर्देशांक आणि फेडरल रिझर्व्हचे व्याजदर धोरण यांचा समावेश आहे. व्याजदरात वाढ झाली नाही तर पुढील काळात बाजारात मोठ्या प्रमाणात उत्साह दिसण्याची शक्यता आहे. फेडरलच्या वतीने पुढील बैठकीत व्याजदरात वाढ होण्याची शक्यताही कमीच अाहे. त्यामुळे बाजारावर याचा परिणाम होणार नाही तरीदेखील निश्चित निर्णय झाल्यानंतर बाजारात उत्साह दिसून येईल.

भारतीय बाजाराचा विचार केल्यास किरकोळ महागाई दर वाढल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँक लवकर दर कपात करेल याची शक्यता कमीच आहे. मात्र, आतापर्यंत मान्सून चांगला झाल्यामुळे खरीप हंगामात चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे महागाई कमी झाल्यास व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झालेले असून त्यांचाही बाजारावर अद्याप परिणाम कायम आहे. नव्याने काही सकारात्मक बातमी येण्याची अपेक्षा नसल्याने या आठवड्यात निफ्टी त्याच्या मर्यादेत ८४९१ ते ८८४६ अंकाच्या दरम्यान व्यवहार करण्याची शक्यता आहे.

तांत्रिकदृष्ट्या निफ्टीला ८६८९ च्या जवळपास चांगला आधार आहे. या पातळीवर लक्ष ठेवावे लागणार आहे. जर निफ्टीने या अंकाच्या वर उसळी मारली तर बाजाराची धारणा सकारात्मक झाली असल्याचे समजावे आणि यापुढे निफ्टीत आणखी वाढ दिसून येऊ शकते. निफ्टीला पुढचा रेझिस्टन्स ८७२९ च्या जवळपास मिळेल. हा एक मध्यम रेझिस्टन्स असल्यामुळे निफ्टीमधील तेजीला तो अडवण्याची शक्यता कमी आहे. हा गेल्या ५२ आठवड्यांतील विक्रमी उच्चांक असेल. त्यानंतर निफ्टीला पुढचा रेझिस्टन्स ८८४६ च्या जवळपास मिळेल, जाे निफ्टीच्या कन्सॉलिडेशन झोनची वरची पातळी आणि मजबूत रेझिस्टन्स असेल. सध्या तरी निफ्टी या पातळीच्या वर जाईल असे वाटत नाही. घसरणीचा विचार केल्यास निफ्टीला पहिला अाधार ८५९६ च्या जवळपास मिळेल. हा एक मध्यम आधार असेल. त्यापुढील आधार ८५१२ च्या जवळपास मिळेल. हा एक मजबूत आधार असेल. या पातळीला तोडण्यात निफ्टी यशस्वी झाल्यास बाजाराची धारणा कमजोर होईल. त्यामुळे पुन्हा घसरणीची शक्यता वाढेल.

शेअरमध्ये या आठवड्यात एचडीएफसी बँक आणि टायटन कंपनी चांगल्या स्थितीत दिसत आहेत. एचडीएफसी बँकेचा सध्याचा बंद भाव १,२२७.३० रुपये आहे. तो १,२४८ रुपयांपर्यंत वाढ मिळवू शकतो. घसरणीत याला १,२०३ रुपयांवर स्टाॅपलॉस लावावा. टायटन कंपनीचा सध्याचा बंद भाव ४०४.५५ रुपये असून तो ४२३ रुपयांपर्यंत वाढ मिळवू शकतो. घसरणीत त्याला ३९६ रुपयांवर स्टॉपलॉस लावावा.

विपुल वर्मा
लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत.
vipul.verma@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...