आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाजार मर्यादेत राहण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्याने तयार करण्यात आलेल्या रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीने (एमपीसी) रेपो दरात ०.२५ टक्के कपात करून सर्वांना आश्चर्यचकित केले. यंदाच्या मान्सूनमध्ये चांगला पाऊस झाला आहे, त्यामुळे आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशात खाण्या-पिण्याच्या वस्तूंची महागाई नियंत्रणात राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एमपीसीने रेपो दरात ०.२५ टक्के घट करून ६.२५ टक्के दर निश्चित केला. २०१० नंतर हा दर सर्वात कमी स्तरावर आहे. जानेवारी २०१५ पासून आजपर्यंत यात १.७५ टक्के कपात करण्यात आली. वास्तविक पाहता पतधोरणामध्ये रिझर्व्ह बँक ही स्थिती कायम ठेवणार अशी आशा विश्लेषकांना होती; परंतु रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेऊन शेअर बाजारात “ऊर्जा’ भरण्याचे काम केले आहे. दरात कपात केल्यानंतर लगेचच सेंटिमेंटमध्ये सुधारणा पाहावयास मिळाली. महागाईबद्दलची चिंता कायम असल्याने तुलनेत ही वाढ अधिक नाही. पुढील काही महिन्यांमध्ये महागाईबद्दल ठोस संकेत मिळत नाहीत तोपर्यंत व्याजदरांवरून चिंता कायम राहणार आहे. तरीसुद्धा सरप्राइज दर कपात करण्याचा निर्णय स्वागतार्ह म्हणावा लागेल.

मागील आठवड्यात भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून “सर्जिकल स्ट्राइक’ करण्याचा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण होता. त्यामुळे शेअर बाजारातील चाल बिघडल्याचे दिसते. सैन्याच्या कारवाईबद्दल अधिकाऱ्यांनी अधिकृत घोषणा केल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पाहावयास मिळाली; परंतु यामुळे वाढीचा कल मर्यादित राहिला. निराशाजनक वातावरण दिसून आले नाही. वास्तविक पाहता ही बाब प्रशंसनीय म्हणावी लागेल. आपला बाजार परिपक्व असल्याचे यावरून सिद्ध होते. “सर्जिकल स्ट्राइक’मुळे उठलेला धुराळा आता हळूहळू बसत आहे. ही गोष्ट बाजारासाठी सकारात्मक म्हणावी लागेल. त्यामुळे येणारा आठवडाही सकारात्मक राहील. अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर सर्व बाजारात सतर्कता असली तरी सकारात्मक वातावरण पाहावयास मिळते. काही आर्थिक सकारात्मक बाबींनी चिंतेत काही प्रमाणात घट झाली आहे. याच्या पुढे जाऊन पाहिले तर भारतीय शेअर बाजारात येणाऱ्या आठवड्यात (बुधवारपासून मंगळवारपर्यंत) मर्यादित व्यवहार होतील; परंतु बाजाराची दिशा सकारात्मक असेल.

तांत्रिक बाजूने पाहिले तर वाढणाऱ्या निफ्टीला पहिला अडथळा ८८०२ अंकांच्या जवळपास मिळेल. हा आकडा सध्याच्या बंद भाव ८७६९.१५ अंकांच्या अगदी जवळ आहे. जर निफ्टी या अडथळा पातळीच्या वर बंद झाला किंवा इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये तो वरच्या पातळीत राहिला तर वाढीचे संकेत समजावेत. असे असले तरी या पातळीवर काही प्रमाणात कन्सॉलिडेशनची आणि नफा वसुली होण्याची शक्यता आहे. निफ्टीला ८८४७ च्या आसपास मध्यम स्वरूपाचा अडसर आहे. त्यानंतर ८८९४ या पातळीवर तगडा अडथळा आहे.

घसरणीच्या बाबतीत सांगायचे झाले तर निफ्टीला ८६९१ वर चांगला आधार मिळेल. बाजारातील सद्य:स्थिती पाहता निफ्टीला चांगला आधार मिळेल. तसेच या पातळीवरून निर्देशांक उसळी मारू शकतो. मात्र, ही पातळी तुटल्यास निफ्टी ८५५५ या नुकत्याच गाठलेल्या खालच्या स्तरापर्यंत गटांगळी मारू शकतो. या आठवड्यात तरी निफ्टी या पातळीच्या खाली जाण्याची शक्यता नाही.

समभागांच्या बाबतीत या आठवड्यात नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी आणि अॅक्सिस बँक चार्टवर उत्तम दिसत आहेत. नॅशनल अॅल्युमिनियम कंपनीचा सध्याचा बंद भाव ४७.२५ रुपये आहे. तो ४९.७५ रुपयापर्यंत वाढू शकतो. घसरणीमध्ये याला ४४.५० रुपयांवर आधार मिळेल. जेएसडब्ल्यू स्टीलचा सध्याचा बंद भाव ५४६.६० रुपये आहे. तो ५५७ रुपयांपर्यंत वाढू शकतो. घसरणीमध्ये याला ५३४ रुपयांवर आधार आहे.

विपुल वर्मा
लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत.
vipul.verma@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...