आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात घसरणीची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विविध फंडआणि संस्थांकडून नव्याने खरेदी झाल्याने मागील आठवड्यात शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांत तेजी दिसून आली. आगामी अर्थसंकल्पाकडून अपेक्षा वाढीस लागल्याने बाजारात तेजी दिसून आली. विशेष म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतरही आर्थिक सुधारणा सुरूच राहतील, अशी ग्वाही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी िदल्यानंतर बाजारातील तेजीला धार आली. त्याशिवाय युरोझोनमधील ग्रीस संकटावर तोडगा निघण्याचे संकेत मिळाल्याने बाजाराची चिंता काही प्रमाणात कमी झाली, तर युक्रेनमधील युद्धबंदीचे वृत्त जगातील प्रमुख शेअर बाजारांसाठी सकारात्मक ठरले.
देशाच्या आघाडीवर हा आठवडा संमिश्र राहिला. जानेवारीत किरकोळ महागाईचा दर वाढून ५.११ टक्क्यांवर पोहोचला. मात्र, घाऊक महागाईने शून्याखाली जात वजा ०.३९ टक्क्यांची पातळी गाठली. हा साडेपाच वर्षांचा नीचांक आहे. यात अखाद्य वस्तूंच्या घसरत्या किमतींमुळे ही पातळी दिसून आली. औद्योगिक उत्पादनाबाबत अद्यापही चांगली स्थिती नाही. डिसेंबरमध्ये हे उत्पादन १.७ टक्के गतीने वाढले आहे. नोव्हेंबरमध्ये ही गती ३.९ टक्के एवढी होती. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. दरम्यान, एचएसबीसी मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय जानेवारीत घटून ५२.९ नोंद झाल्याने चिंतेत आणखी भर टाकली आहे. आता अर्थसंकल्पानंतर बाजाराला रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्याची तसेच दर कपातीची अपेक्षा आहे. त्यामुले आर्थिक आघाडीवरून आलेल्या नकारात्मक बातम्यांकडे दुर्लक्ष करून बाजाराने तेजी नोंदवली. जागतिक पातळीवर अमेरिका शेअर बाजाराचा एस अँड पी ५०० निर्देशांक सोमवारी सर्वकालीन उच्चांकावर बंद झाला. यात युक्रेन करार आणि ग्रीस संकटावरील तोडगा निघण्याच्या दृष्टीने झालेली प्रगतीचा वाटा मोठा राहिला. याशिवाय तेलाच्या किमतीत आलेल्या तेजीने जागतिक बाजारातील कल मजबूत होण्याचे एक प्रमुख कारण राहिले.
आगामी काळात बाजारात सतर्कता राहील. वाढती वित्तीय तूट आणि मंदावलेला आर्थिक विकास या आव्हानांना सरकार अर्थसंकल्पातून कशा रीतीने उत्तर देते याकडे गुंतवणूकदारांची नजर आहे. अर्थसंकल्पाकडून अपेक्षांनी गगनाची उंची गाठली आहे. त्यामुळे शेअर बाजारात सतर्कता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. तांत्रिकदृष्ट्या बाजारात आता नव्या उंचीवर जाण्याचे संकेत देत आहेत. याचाच अर्थ असा की, निर्देशांकांत काही प्रमाणात घसरण येण्याची शक्यता आहे.
आधार आणि अडथळ्यांचा विचार केल्यास, निफ्टीला खालच्या दिशेने पहिला अाधार ८७३० अंकांच्या आसपास होईल. हा एक चांगला आधार राहील आणि या स्तराच्या आसपास बाजारात काही प्रमाणात कन्सोलिडेशन िदसून येईल. समजा निफ्टी या पातळीच्या खाली आला तर त्याला ८६४६ वर चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे. हा तगडा आधार राहील. निफ्टीला वरच्या दिशेने पहिला अडथळा ८८४० ते ८८८० या अंकांच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे. जोपर्यंत निप्टी या स्तरांच्या खाली आहे तोपर्यंत बाजारात घसरणीचे संकेत आहेत, असे समजावे. निफ्टी या पातळ्यांच्या वर आला तर वातावरण आणखी वाढ दिसून येईल. मग निफ्टीला ९०१२ अंकांवर मोठा अडसर राहील.
समभागांच्या बाबतीत या आठवड्यात एचडीएफसी लिमिटेड आणि टेक महिंद्रा लिमिटेड चार्टवर उत्तम दिसताहेत. एचडीएफसीचा सध्याचा बंद भाव १,२८८ रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट १,३१४ रुपये आणि स्टॉप लॉस १,२५६ रुपये आहे, तर टेक महिंद्राचा सध्याचा बंद भाव २,८९९.५५ रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य २,९३१ रुपये आणि स्टॉप लॉस २,८४२ रुपये आहे.
vipul.verma@dbcorp.in