आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपच्या विजयाप्रमाणेच बाजाराने दिला धक्का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीच्या जबरदस्त विजयाप्रमाणेच शेअर बाजाराची चालही धक्का देणारी ठरली. मंगळवारी सत्राच्या प्रारंभी बाजारात नकारात्मक सूर होता. मात्र, जसे निवडणुकीचे निकाल आले व आपच्या जागा वाढत गेल्या तसा बाजार वर चढत राहिला. आपला ६० च्या वर जागा मिळतील हे सकाळी ११.३० वाजता स्पष्ट झाल्यानंतर सेन्सेक्सने ४०० अंकांची वाढ नोंदवली होती. रेलिगेअर सिक्युरिटीज अध्यक्ष (रिटेल) जयंत मंगलिक यांनी सांगितले, आपच्या मोठ्या विजयामुळे बाजारात खरेदी झाली.

या स्तरावर काही प्रमाणात नफा वसुलीही झाली. युरोपातील प्रमुख बाजारातील नकारात्मक कलाचाही परिणाम काही प्रमाणात झाला. त्यामुळे बाजार पुन्हा एकदा नकारात्मक पातळीत आला. मात्र, शेवटच्या सत्रात जोरदार खरेदी झाल्याने सेन्सेक्स १२८.२३ अंकांनी वाढून २८,३५५.६२ वर बंद झाला. निफ्टीने ३९.२० अंकांच्या कमाईसह ८,५६५.५५ अंकांची पातळी गाठली. टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, एसबीआय, सेसा, महिंद्रा अँड महिंद्राचे समभाग चमकले.

गुंतवणूकदारांनी आता नेमके काय करावे?
बोनान्झा पाेर्टफोलिओचे उपाध्यक्ष पुनीत किनरा यांनी सांगितले, बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यता नाही. या पातळीवरून बाजारात सुधारणा दिसून येईल. निफ्टीला ८४५० वर महत्त्वाचा आधार राहील. ही आधार पातळी तुटल्यास घसरणीचा धोका वाढणार आहे. एस २ अॅनालिटिक्स डॉट कॉमचे सीएमडी सुदर्शन सुखानी यांनी सांगितले, गुंतवणूकदारांनी बाजार स्थिर होण्याची वाट पाहावी. आयटी, फार्मा आणि खासगी बँकांचा पर्याय उत्तम राहील.

आपचा परिणाम
आपच्या उद्योगविरोधी वक्तव्यांमुळे त्याला उद्योगविरोधी मानले जात होते. त्यामुळेच सोमवारी सेन्सेक्स ४९१ अंकांनी कोसळला होता. मंगळवारी नेमके याउलट होऊन स्थिर सरकार पाहता बाजारात तेजी आली.

वाढीची इतर कारणे
*चांगल्या आर्थिक आकडेवारीचा परिणाम होऊन बाजारात खरेदी वाढली.
*सलग सात दिवसांत ४.९ टक्के अर्थात १,४५४ अंकांनी सेन्सेक्स घसरला होता. या स्तरावर खरेदी झाली.