आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल ‘सिम’साठी आधार कार्ड अनिवार्य, बायोमेट्रिक प्रणालीद्वारे होणार ओळख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मोबाइल कार्ड घेतेवेळी यापुढे ग्राहकास आधार कार्ड तसेच बायोमेट्रिक प्रणालीद्वारे स्वत:ची ओळख पटवून द्यावी लागेल. यासंबंधीच्या अटींना अंतिम रूप दिले जात असून गृ़हमंत्रालयाच्या मान्यतेनंतर वर्षअखेरीपर्यंत त्या लागू केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर आधार कार्डशिवाय नवे मोबाइल कार्ड मिळणार नाही.

दूरसंचार विभागातील सूत्रांनी सांगितले की, कार्ड वितरण करतेवेळी दुकानदार ग्राहकांच्या बोटांचे बायोमेट्रिक पद्धतीने ठसे घेतील. हा डाटा ऑनलाइन पद्धतीने यूआयडी कार्डच्या डाटाशी पडताळणी करून त्याची सत्यता तपासली जाईल. ग्राहकाच्या ओळखीचा पुरावा म्हणून हाच डाटा ग्राह्य धरण्यात येईल आणि त्यानंतरच नवे कार्ड संबंधितास देण्यात येईल. सध्या ग्राहकास नवे कार्ड घेतेवेळी मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा तत्सम ओळखीचे पुरावे सत्यप्रतीत सादर करावे लागतात. त्याची सत्यता तपासण्यास वेळ लागत असल्याने कार्ड मिळण्यास विलंब होतो. तसेच ही पद्धत तितकीशी सुरक्षित नसल्याने बोगस कार्ड वितरणाची समस्या कायम होती. कार्डधारकाची ओळख बनावट निघाल्यास त्याचा ग्राहक व वितरकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. आधार कार्डद्वारे काही तासांत ओळख पटू शकणार असल्याने हे गैरप्रकार तसेच इतर पुरावे सादर करावे लागण्याची पद्धत बंद होईल. तसेच या प्रक्रियेत सुरक्षितताही येईल.

मोबाइल कार्डसाठी आधार कार्डमधील माहितीचा वापर करण्याची योजना सध्या आंध्र प्रदेशात प्रायोगिक तत्वावर राबवली जात आहे. राज्यातील 86 दशलक्ष लोकसंख्येपैकी 56 दशलक्ष ग्राहकांना आधार कार्ड देण्यात आले आहेत. तसेच देशातील 25 टक्केपेक्षा जास्त नागरिकांना आधार कार्डचे वितरण झालेले आहे.

मोबाइल कंपन्यांची तयारी
नवे सिमकार्ड देतेवेळी आधार अनिवार्य करण्यास भारती एअरटेल, व्होडाफोन, रिलायन्स कम्युनिकेशन आदी कंपन्यांनी संमती दर्शवल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. यासंदर्भातील नियमावलीस गृहमंत्रालयाची मान्यता मिळाल्यानंतर त्याबाबतची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे.