आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रेडिट कार्डच्या शुल्कांबाबत माहिती ठेवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकतेच रजतला त्यांच्या कंपनीच्या बँकिंग भागीदाराकडून कॉर्पोरेट ऑफर अंतर्गत एक क्रेडिट कार्ड मिळाले आहे. त्या कार्डवरील प्रस्तावित सुविधांमुळे रजतची स्वारी खुशीत होती. त्यांना त्यासाठी काहीच वार्षिक शुल्क किंवा प्रक्रिया शुल्क द्यावे लागले नव्हते. मात्र, पहिल्याच स्टेटमेंटमुळे त्यांना जबर धक्का बसला. त्यातून अनेक छुपे खर्च समोर आले. पेमेंट ड्यूच्या रूपात अनेक प्रकारचे शुल्क लावण्यात आले होते. त्यासंदर्भात रजतने बँकेत फोन केला असता, कार्डच्या वापरातच या सर्व फीस आणि शुल्कांचा समावेश आहे, असे त्यांना सांगण्यात आले. त्यांच्यापुढे काहीच पर्याय नव्हता. त्यांना सर्व रक्कम भरावी लागली. क्रेडिट कार्डवर अनेक प्रकारचे शुल्क आणि फीस, नियम असतात. पहिल्या चर्चेत त्याबाबत ग्राहकाला माहिती न मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी त्यावर असणार्‍या फीस आणि शुल्कांबाबत माहिती असणे गरजेचे आहे..
ओपन आणि हिडन चाज्रेस
वार्षिक फी व इतर शुल्क : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सुरुवातीच्या काळात बँका किंवा कंपन्या वार्षिक फी माफ करून क्रेडिट कार्ड देतात. मात्र, ही ऑफर एका वर्षात संपते. त्यानंतर कार्डचा प्रकार आणि क्रेडिट लिमिटच्या आधारे वार्षिक एक हजार रुपये ते 3000 रुपये फी वसूल केली जाते.
रिव्हॉल्व्हिंग व्याजदर : मुदतीच्या आत कार्डवर असणारी देय रक्कम चुकती केली नाही तर महिन्याकाठी 1.99 टक्के ते 4 टक्क्यांपर्यंत व्याज वसूल केले जाते. हे दर कमी वाटत असले तरी वार्षिक पातळीवर याची गणना केल्यास अन्युलाइज्ड परसेंट रेट (एपीआर) मध्ये बदलल्यास हेच दर 27 टक्के ते 48 टक्के होतात.
ओव्हरड्रॉ लिमिटहून जास्त घेतल्यास फी : क्रेडिट लिमिट पार केल्यानंतर ग्राहकाकडून ही फी वसूल केली जाते. साधारणपणे ओव्हरड्रॉ करण्याच्या र्मयादेच्या टक्केवारीत याचे प्रमाण असते.
उशिरा भरणा शुल्क : ग्राहकांकडून कार्डवरील देय रक्कम भरण्यास उशीर झाल्यास प्रत्येक कंपनी हे शुल्क वसूल करते. ही एका ठरावीक रक्कम किंवा भरणा केलेल्या रकमेवरील टक्केवारीत वसूल केले जाते.
सेवा कर : क्रेडिट कार्डची फीस, व्याज आणि इतर शुल्कांवर 12.24 टक्के दराने सेवा कर वसूल केला जातो.
आउटस्टेशन चेकवर शुल्क : समजा ग्राहकाने क्रेडिट कार्डवरील रकमेचा भरणा चेकद्वारे केला तर चेक रकमेवर ठरावीक दराने सेवा शुल्क आकारले जाते. यात किमान शुल्क निश्चित ठरवलेले असते.
विदेशी चलन व्यवहार : विदेशी चलनातील व्यवहारांच्या बाबतीत नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर (मास्टर/व्हिसा) कडून देण्यात आलेल्या दराच्या आधारावर भारतीय चलनात रूपांतर केले जाते. त्यावर एक विशिष्ट टक्केवारीने फी वसूल केली जाते. किमान दर निश्चित ठरवलेला असतो.
रक्कम काढण्याचे शुल्क : क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढल्यास त्यावरही शुल्क आकारणी केली जाते. काढलेल्या रकमेच्या प्रमाणावर हे शुल्क अवलंबून असते.
पेट्रोल भरणे, रेल्वे तिकीट यावर शुल्क : क्रेडिट कार्डद्वारे पेट्रोल भरणे, रेल्वे तिकीट बुक करणे आदीवरही शुल्क आकारले जाते.
छुप्या शुल्कांतून मुक्ततेसाठी काही टिप्स : क्रेडिट कार्डचा वापर करायचा असेल तर वर नमूद शुल्कांपासून सुटका नाही. मात्र, या टिप्समुळे काही प्रमाणात हा भार कमी करता येतो. :
1. अर्ज करण्यापूर्वी क्रेडिट कार्डबाबत सखोल माहिती घ्या. कोणत्या कंपनीचे कार्ड जास्त फायदेशीर राहील हे तपासा.
2. आपल्या गरजेनुसार कार्ड घ्या.
3. प्रारंभीचे दर आणि क्रेडिट कार्डशी संबंधित शुल्कांची माहिती घ्या. कार्डसोबत मिळणार्‍या बुकलेटमधील सर्व माहिती, नियम काळजीपूर्वक वाचा.
4. शॉपिंग करताना काळजी घ्या, अनावश्यक वस्तूंची खरेदी टाळा.
5. वेळेच्या वेळी व्याज तसेच बिलात नमूद शुल्कापेक्षा थोड्या जास्त रकमेचा भरणा करा.
6. मासिक स्टेटमेंट वाचा आणि समजून घ्या, अनावश्यक शुल्कांबाबत तक्रार नोंदवा.
7. क्रेडिट लिमिटपेक्षा जास्त खर्च करू नका.
8. विदेशी चलनातील व्यवहारांच्या रूपांतरित दराबाबत माहिती घ्या.
क्रेडिट कार्डचे अनेक फायदे आहेत. पे-बॅक पाँइंटस, कॅश बॅक ऑफर्ससह रिटेल कंपन्या व ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सकडून पार्टनरशिपसाठी स्पेशल डिस्काउंट मिळतो. त्याचा योग्य रीतीने वापर करता आला नाही तर ड्यू अमाउंटचा भरणा आपल्या भरणा रकमेच्या र्मयादेबाहेर जाण्याची शक्यता असते. यातून अनेक अडचणी वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे संपूर्ण माहिती असल्याशिवाय असे व्यवहार कार्डद्वारे करू नका.
लेखक bankbazaar.com चे सीईओ आहेत.
adhil.shetty@dainikbhaskargroup.com