आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After 20 Months Loan Become Cheap, Reserve Bank Cut 0.25 Repo Rate

२० महिन्यांनंतर कर्जे स्वस्त! रिझर्व्ह बँकेने केली रेपो दरात पाव टक्का कपात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मकर संक्रांतीला रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्का कपात केली. यामुळे गृह, वाहन कर्जासह सर्व कर्जे स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला. महागाईचा पारा कमी झाल्याने रिझर्व्ह बँकेने पतधोरण आढाव्याच्या १५ दिवस आधीच रेपोमध्ये कपात केली. रेपो दर ८ टक्क्यांवरून ७.७५ टक्क्यांवर आला असून नवा दर तत्काळ लागू झाला आहे. बँकांनी पाव टक्का कपात केल्यास गृह कर्जाचा मासिक हप्ता २५ लाखांमागे ४१८ रुपयांनी कमी होईल. मे २०१३ नंतर झालेली व्याजदरातील ही पहिलीच कपात आहे.

सुमारे २० महिन्यानंतर झालेल्या व्याजदर कपातीमुळे उद्योग, गृहनिर्माण, ऑटो क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. कर्ज स्वस्त होऊन मॅन्युफॅक्चरिंगला चालना मिळेल, असे मत या क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केले आहे.

वर्षभरात १ टक्का व्याजदर कपात रेपो दरात पाव टक्का कपातीने व्याजदर कपातीला सुरुवात झाली. येत्या वर्षात ०.७५ टक्के ते १ टक्का व्याजदर कपात अपेक्षित असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.

पहिली कपात युनायटेड बँकेची : रेपो दरात कपात होताच युनायटेड बँक व युनियन बँकेनेही कर्जाचा बेस रेट ०.२५ टक्क्याने कमी केला. हा रेट १०.२५ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणला. एसबीआयसह इतर बँकांचेही कर्ज स्वस्त करण्याचेही संकेत आहेत. सेन्सेक्सची ५ वर्षांतील सर्वात मोठी उसळी : रेपो कपातीच्या दिलाशाला सेन्सेक्सने ७२८.७३ अंकांच्या उसळीसह सलामी दिली. ही पाच वर्षांतील एका सत्रातील सर्वात मोठी उसळी आहे. सेन्सेक्स २८,०७५.५५ वर बंद झाला. निफ्टीने २१६.६० अंकांच्या कमाईसह ८४९४.१५ पर्यंत मजल मारली.

आश्चर्यजनक दिलासा
> पतधोरणाच्या १५ दिवस आधीच आरबीआयने रेपोमध्ये कपात करत आश्चर्यजनक दिलासा दिला.
> ०.२५ टक्के कपात करून रेपो दर ७.७५ टक्क्यांवर आणला आहे.
> रिव्हर्स रेपो दरात ०.२५ टक्के कपात, सीआरआर ४ टक्के कायम
> मे २०१३नंतर प्रथमच कर्ज स्वस्त
> महागाई दर ६ टक्क्यांच्या खाली राहण्याची शक्यता
> यंदा कच्च्या तेलाच्या किमती खालीच राहण्याचा अंदाज
> जुलै २०१४ पासून महागाईवरील दबाव कमी झाला.
> रिझर्व्ह बँकेचे आगामी पतधोरण ३ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार
> अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक पाऊल; अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून निर्णयाचे स्वागत.