आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Budget Reform Continue, Jaitley Said In Global Economic Council

बजेटनंतरही सुरू राहणार सुधारणा, जागतिक आर्थिक परिषदेत जेटलींचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाओस - अर्थसंकल्पानंतरही देशात आर्थिक सुधारणा सुरूच राहतील, असे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दाओस येथील जागतिक आर्थिक परिषदेत व्यक्त केले. विमा विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात पारित झाले नाही, तर त्यासाठी संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कर संरचना सुटसुटीत बनवणे व अनुदान तर्कसंगत करण्यावर भर देण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

अर्थमंत्री म्हणाले, अर्थसंकल्प एक दिवसात सादर होतो. वर्षात ३६५ दिवस असतात, त्यामुळे सुधारणा केव्हाही करता येतात. अर्थसंकल्पातच सर्व काही सुधारणा नमूद करणे आवश्यक नाही. आर्थिक सुधारणांसाठी सरकार कटिबद्ध असून सुधारणा सुरूच राहतील.

तर्कसंगत होणार अनुदान : अनुदान पूर्णपणे बंद करता येणार नाहीत. कारण देशातील एकतृतीयांश लोक गरीब आहेत. मात्र, त्याला तर्कसंगत बनवावे लागणार आहे. जानेवारीपासून स्वयंपाकाचा गॅसचे अनुदान बँक खात्यात जमा होत आहे. आता अनुदानास पात्र नसणा-यांना ओळखणे सोपे जाईल. जे गरीब नाहीत असे अनेक जण अनुदानित रॉकेलचा वापर करत आहेत. याला आता आळा बसणार आहे.

विम्यात शाश्वत गुंतवणूक :
अध्यादेशाच्या काळात विमा क्षेत्रात करण्यात आलेली गुंतवणूक कायद्यानुसार ती नंतर रद्द करता येणार नाही. ३१ मार्चपर्यंत होणारी गुंतवणूक कायम स्वरूपाची राहील. विधेयक या अधिवेशनात पारित झाले नाही तर संयुक्त अधिवेशन बोलावण्यात येईल. या विधेयकात विमा कंपन्यातील थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा २६ टक्क्यांवरून ४९ टक्क्यावर नेण्याचा प्रस्ताव आहे.

काळा पैसा : स्विस बँकेत जमा असलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशाबाबत सरकारकडे पुरावे असल्याचे जेटली यांनी सांगितले. स्वित्झर्लंडला या संदर्भात माहिती देणार असल्याचे ते म्हणाले.

तुर्तास मॅट बंद होणार नाही
जेटली यांनी सांगितले, सध्या मी अर्थसंकल्प तयार करतो आहे. कराबाबतचे जे वाद आहेत त्यात सरकारला एक छदामही मिळालेला नाही. प्रतिमा मात्र डागाळली. जास्त कर आकारण्याचा मानस नाही. किमान वैकल्पिक कराबाबत (मॅट) त्यांनी सांगितले, हा कर आताच बंद करता येणार नाही. जोपर्यंत उत्पादन आणि सरकारचे उत्पन्न वाढत नाही तोपर्यंत मॅट बंद करता येणार नाही.