आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनेरी झळाळीचा दिवस, दिवाळीनंतर प्रथमच मौल्यवान धातूंना चांगले दिवस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिवाळीत २८ हजारांवर गेलेले सोने दिवाळीनंतर झालेल्या जागतिक घडामोडींमुळे नरम झाले होते. शुक्रवारी मात्र सोन्याने तोळ्यामागे ५६५ रुपयांची तेजी नोंदवत २७,८८५ पर्यंत मजल मारली. चांदीही किलोमागे ६२० रुपयांनी झळाळून ३७,९०० रुपयांवर पोहोचली. देशातील लग्नसराईमुळे मागणीत झालेली वाढ मौल्यवान धातूतील झळाळीसाठी कारणीभूत ठरली.

राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोने ब-याच दिवसांपासून तोळ्यामागे २७,००० ते २७,४०० रुपयांच्या पातळीत राहिले. शुक्रवारी मात्र सोन्याने एकदम उसळी घेत दोन महिन्यांचा उच्चांकी स्तर गाठला. सराफा व्यापा-यांनी सांगितले, जागतिक सराफा बाजारातील सकारात्मक संकेत आणि देशातील लग्नसराईमुळे मागणीत झालेली वाढ यामुळे सोन्यात तेजी दिसून आली.दिल्लीत २२ ऑक्टोबर २०१४ रोजी सोने या पातळीत होते. न्यूयॉर्क सराफ्यात सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम)३३.५० डॉलरने वाढून १२६२.६० डॉलरपर्यंत पोहोचले. याचाही परिणाम देशातील सराफा बाजारात दिसून आला. नाणी तयार करणा-यांकडून तसेच औद्योगिक क्षेत्राकडून चांगली मागणी आल्याने चांदीही किलोमागे ६२० रुपयांनी वधारून ३७,९०० रुपयांवर पोहोचली.

तेजीचे कारण
सोन्यातील तेजीसाठी जागतिक संकेत कारणीभूत ठरले. स्वित्झर्लंडने आपले चलन युरोशी संलग्न केले तसेच ठेवींचे व्याज घटवल्याने डॉलरचा भाव गडगडला. परिणामी गुंतवणूकदारांनी सोन्याकडे मोर्चा वळवला व सोने झळाळले.

दिवाळीनंतर प्रथमच २८ हजारांवर
औरंगाबाद | देशातील सराफ्यातील तेजीचा परिणाम औरंगाबादेतील सराफ्यात दिसून आला. महाराष्ट्र राज्य सराफ, सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष दत्ता सावंत यांनी सांगितले, शुक्रवारी सोने तोळ्यामागे १६० रुपयांनी वाढून २८०९० वर पोहोचले. दिवाळीनंतर प्रथमच सोने २८ हजारांवर गेले. चांदीनेही किलोमागे ४० हजारांचा टप्पा गाठला.