मुंबई - चार दिवसांच्या तेजीनंतर सोमवारी शेअर बाजारात काही प्रमाणात नफावसुली झाल्याने नवा उच्चांक गाठून सेन्सेक्समध्ये घसरण दिसून आली. निफ्टी मात्र विक्रमी पातळीवर स्थिरावला. निफ्टीने १.९५ अंकांच्या किरकोळ वाढीसह नव्या विक्रमाचे शिखर सर करत ८३२४.१५ ही पातळी नोंदवली. सेन्सेक्स ५.४५ अंकांच्या घसरणीसह २७,८६०.३८ वर बंद झाला.
या आठवड्यात बाजारात आणखी दोन दिवसच कामकाज चालणार आहे. मंगळवारी मोहर्रम, तर गुरुवारी गुरुनानक जयंतीनिमित्त बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली, त्याचाही परिणाम बाजारावर दिसून आला. सेन्सेक्सच्या यादीतील ३० पैकी १८ समभाग चमकले, तर १२ समभाग घसरले. गेल, आयटीसी, ओएनजीसी, एनटीपीसी, कोल इंडिया आणि भेल या समभागांत घसरण झाली. आशियातील प्रमुख बाजारांत संमिश्र, तर युरोपातील प्रमुख शेअर बाजारांत घसरणीचा कल दिसून आला.
टॉप लुझर्स : गेल इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, कोल इंडिया, हीरो मोटोकॉर्प, मारुती सुझुकी, एनटीपीसी, बजाज ऑटो, भेल
टाॅप गेनर्स : सेसा स्टरलाइट, अॅक्सिस बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस
नफावसुलीने घसरण
शुक्रवारी विक्रमी उच्चांक नोंदवणा-या शेअर बाजारात सोमवारी नफावसुली दिसून आली. बहुतेक गुंतवणूकदारांनी सतर्कतेचा पवित्रा घेतला.
जिग्नेश चौधरी, रिसर्च हेड, व्हेरासिटी ब्रोकिंग