आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवृत्तीनंतरच्या जीवनाबाबत भारतीयच जास्त सजग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आयुष्यभर नोकरी केल्यावर निवृत्तीचा काळ तरी चांगला व्यतीत व्हावा, किंबहुना उतारवयातही राहणीमानाचा दर्जाही टिकावा असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या जीवनाचा नोकरीतच विचार करायचा कल वाढला आहे. त्यातही सध्याच्या बचतीचे प्रमाण बघितल्यास निवृत्तीचा विचार करण्यामध्ये भारतीयच सगळ्यात जास्त सजग असून जवळपास 39 टक्के जणांनी निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी पूर्ण तयारी केली असल्याचे अ‍ॅसेंचर या जागतिक पातळीवरील व्यवस्थापन सल्ला आणि तंत्रज्ञान सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीने अलिकडेच केलेल्या एका अभ्यासात दिसून आले आहे.
निवृत्तीसाठी पुरेशी बचत करणे गरजेचे असल्याचे मत भारता पाठोपाठ चीन (28 %) आणि अमेरिकेतल्या (21 %) लोकांनी व्यक्त केले आहे. परंतु रशिया (4 %), जपान (5 %), दक्षिण कोरिया (8 %) या देशांमध्ये मात्र निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी तरतूद करण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे अ‍ॅसेंचरच्या जागतिक निवृत्ती सर्वेक्षण 2012 मध्ये करण्यात आले आहे. अ‍ॅसेंचरने 15 देशांमधील 25 ते 60 वयोगटातील जवळपास 8112 व्यक्तींचे सर्वेक्षण करून हा अहवाल तयार केला आहे.
बाजारात उपलब्ध असलेल्या पेन्शन उत्पादनांमध्ये अगोदरपासूनच खासगी गुंतवणूक करणा-या भारतीयांचे प्रमाण 39 टक्के आहे. परंतु अन्य देशांमध्ये रशिया (12 %), ऑस्ट्रेलिया (19 %), ब्राझील (20 %) आणि स्पेन (29 %) या देशांमध्ये मात्र हे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे.
निवृत्तीनंतरच्या आर्थिक स्थितीबद्दल चिंता वाटण्याच्या जागतिक पातळीवरील सरासरी 82 टक्के प्रमाणाच्या तुलनेत भारतातील प्रमाण जास्त म्हणजे 84 टक्के आहे. ब्रिटन (65 टक्के), जर्मनी (66 %) ऑस्ट्रेलिया (69 %) आणिअमेरिका (69 %) या देशातील नागरिकांनी देखील आपल्या निवृत्तींनंतरच्य सांपत्तिक स्थिती बद्दल चिंता व्यक्त केली आहे. दक्षिण कोरिया (95 %), मॅक्सिको (92 %), रशिया (92 %), स्पेन (91%) या देशातील नागरिक मात्र निवृत्तीनंतरच्या योजनेबाबत निराशावादी असल्याचे दिसून आले.
निवृत्तीनंतर आपल्या राहणीमानाचा दर्जा चांगला ठेवण्याच्या दृष्टीने महिन्याकाठी नेमकी किती बचत करावी लागेल याबाबत सजगता असलेल्या भारतीयांचेच प्रमाण सर्वाधिक म्हणजे 68 टक्के असून त्या पाठोपाठ चीनचे 61 टक्के आहे. जागतिक पातळीवरील हे प्रमाण सरासरी 33 टक्के आहे. निवृत्तीच्या जीवनासाठी आताच तरतूद करणे गरजेचे असल्याचे मत जवळपास सर्वच भारतीयांनी (99 %) व्यक्त केले असून त्या पाठोपाठ मॅक्सिको (98 %) आणि दक्षिण कोरिया (96 %) या देशातील नागरिकांनी व्यक्त केले आहे. जर्मन, ब्रिटन आणि फ्रान्समधील नागरिकांचे हे प्रमाण अनुक्रमे 79 %, 81 % आणि 83 % आहे.
निवृत्ती उत्पादनांचे व्यवस्थापन करणा-या वित्तीय संस्थांचा ब्रॅँड कोणता आहे याला विकसनशील अर्थव्यवस्थांमधील नागरिक जास्त महत्त्व देत असल्याचे दिसून आले आहे. या मध्ये चीन सर्वात वरच्या स्थानावर (97 %) असून त्या पाठोपाठ ब्राझील (97 %), भारत (96 %) दक्षिण कोरिया (94 %), पोलंड (93 %), मॅक्सिको (91 %), रशिया (90 %) या देशांचा क्रमांक लागतो.