मुंबई - जागतिक जिन्नस बाजारपेठेतील किमती घसरल्याचा देशातल्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीला फटका बसला आहे. ऑगस्टमध्ये एकूण १३ पैकी सात कृषी उत्पादनांनी नकारात्मक वाढीची नोंद केली असून त्यामध्ये तांदूळ, मसाले आणि तंबाखू यांचा समावेश आहे.
अन्य उत्पादनांमध्ये चहा, कॉफी, कडधान्य, काजू या कृषी उत्पादनांनीदेखील नकारात्मक वाढीची नोंद या महिन्यात केली असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.
वाजवीपेक्षा जास्त पुरवठा झाल्यामुळे जागतिक बाजारपेठेत कृषी उत्पादनांच्या किमती साधारपणे घसरतात, परंतु दुस-या बाजूला स्थानिक बाजारपेठेतील किमती जागतिक बाजारातील किमतींपेक्षा जास्त असल्यामुळे निर्यातीपेक्षा ही बाजारपेठ चांगला पर्याय ठरतो. अनेक कृषी उत्पादनांच्या निर्यातीमध्ये घट होण्यासाठी प्रामुख्याने हे दोन घटक जबाबदार असल्याचे मत फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महासंचालक अजय सहाय यांनी व्यक्त केले.
तीन प्रमुख उत्पादने घसरली
* तांदूळ : ३.१५ % (६०० दशलक्ष डॉलर), मसाले : २.१८ % (२२७ दशलक्ष डॉलर), तंबाखू : १४.७ % (७३ दशलक्ष डॉलर)
* नकारात्मक वाढीची नोंद करणारी उत्पादने : चहा : ६.७२ %, कॉफी : १०.५ %, कडधान्य : ५०.६ %, काजू : १.८२ %
* सकारात्मक वाढीची नोंद करणारी उत्पादने : तेलबिया : ३७.२ %, फळे आणि भाजीपाला : ३.४६ %, प्रक्रिया केलेले पदार्थ : ६.७१ %, सागरी उत्पादने : ३५.५ %, दूध, मांस, कुक्कुट उत्पादने : ३७.२ %
* कृषी उत्पादनांच्या निर्यातीचा कल असा : २०१०-११ : १७.३६ अब्ज डॉलर, २०११-१२ : २७.४३ %, २०१२-१३ : ३१.८६ %, २०१३-१४ : ४५ अब्ज डॉलर.
* देशाच्या एकूण निर्यातीमधील कृषी उत्पादनाचा वाटा : १० %