ऑफर्सचा पाऊस: विमान / ऑफर्सचा पाऊस: विमान प्रवास स्वस्त, एअर इंडिया, इंडिगो, गो एअरकडून सवलती

Apr 04,2014 02:28:00 AM IST

नवी दिल्ली- एक रुपया तिकीट दरावरून विमानतळ प्राधिकरण संचालनालयाने (डीजीसीए) स्पाइसजेटला दटावले असले तरी विमान वाहतूक कंपन्यांकडून सवलतीच्या ऑफर्सचा धडाका सुरूच आहे. एअर इंडिया, इंडिगो आणि गो एअर या कंपन्यांनी गुरुवारी सवलतीच्या दरात विमान प्रवासाच्या ऑफर्स जाहीर केल्या.

एअर इंडियाने मान्सून बोनान्झा ही योजना जाहीर केली असून यात 40 निवडक मार्गांवर सवलतीच्या दरातील तिकीट ऑफर देण्यात आली आहे. या योजनेतील तिकिटे 1499 रुपये दराने (कर वेगळे) उपलब्ध असतील. या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबरपर्यंत प्रवास करता येईल, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले. इंडिगो कंपनीने किमान 1389 रुपयांच्या तिकीट दरांची ऑफर जाहीर केली आहे. एकेरी मार्गाचे हे दर असून इंडिगोच्या नेटवर्कमधील थेट विमान उड्डाणांचा यात समावेश आहे. या योजनेनुसार दिल्ली-मुंबई मार्गाचे तिकीट दर 2400 रुपये ठेवण्यात आले आहेत. या तिकीट दरात करांचा समावेश नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले. गो एअर कंपनीनेही 48 तास सेल ऑफर नावाची योजना सादर केली असून ती गुरुवारपासून सुरू झाली आहे. या योजनेनुसार प्रवासांवर 30 ते 40 टक्के सवलत देण्यात येणार आहे. जुलै आणि सप्टेंबरमधील 90 दिवसांच्या आगाऊ आरक्षणावर ही सवलत मिळणार आहे.

ऑफर अशा
एअर इंडियाच्या ऑफरनुसार 1499 रुपयांत निवडक मार्गांवर प्रवास करता येईल, इंडिगो कंपनीने किमान 1389 रुपये, तर गो एअरने तिकीट दरात 30 ते 40 टक्के सवलत दिली आहे.

X