आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्त विमान तिकिटांच्या युद्धात ग्राहकांची चांदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील विमान वाहतूक क्षेत्रातील विविध कंपन्यांतील स्वस्त तिकीट दरांमुळे विमान प्रवाशांची मात्र चांदी झाली आहे. या विमान वाहतूक कंपन्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता अशाच ऑफर आगामी काळात सुरू राहण्याची शक्यता आहे. वाजवी दरात विमान सेवा देणार्‍या या कंपन्यांच्या स्पर्धेत आता पूर्ण सेवा देणार्‍या कंपन्यांनाही उतरावे लागत आहे. कंपन्यांच्या या स्पर्धेचा लाभ विमान प्रवास करणार्‍यांना मिळतो आहे.
देशातील सर्वात नवी व स्वस्त विमान कंपनी एअर एशिया इंडियाने या सवलती देण्यापूर्वीच वाजवी सेवेसाठी प्रसिद्ध असणार्‍या स्पाइसजेटने याची सुरुवात केली. या स्पर्धेत आता देशातील सर्व विमान वाहतूक कंपन्या उतरल्या आहेत. एव्हिएशन सल्लागार सीएपीए इंडियाच्या मते, देशातील विमान प्रवाशांच्या तुलनेत विमान वाहतूक कंपन्यांची क्षमता जास्त असणे हे यामागचे एक प्रमुख कारण आहे. चालू वर्षात विमान प्रवाशांच्या संख्येत सहा ते आठ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. त्याच वेळी विमान प्रवासी वाहतूक कंपन्यांच्या क्षमतेत 10 टक्के वाढीची शक्यता आहे.

स्वस्त विमान प्रवास
स्पाइसजेटने जुलैच्या सुरुवातीला 999 रुपयांत देशभर प्रवासासाठी 10 लाख तिकिटांची योजना सादर केली होती. या योजनेनुसार प्रवाशांना सहा जानेवारी 2015 ते 25 ऑक्टोबर या काळात प्रवास करता येणार आहे. त्यानंतर स्पाइसजेटने ऑगस्ट ते सप्टेंबरमधील प्रवासासाठी 2999 रुपये तिकिटांची ऑफर दिली. त्याच पावलावर पाऊल टाकत इंडिगोने 1699 रुपयांत तिकिटाची योजना सादर केली. आता जेट आणि एतिहादने 135 उड्डाणांसाठी 20 ते 50 टक्के सवलतीत तिकिटांची ऑफर जाहीर केली.
चुरशीची स्पर्धा
जाणकारांच्या मते, विमान वाहतूक कंपन्यांची खराब स्थिती आणि जोरदार स्पर्धा यामुळे विमान प्रवासी भाड्यात सवलतींचा पाऊस पडतो आहे. यातून विमान वाहतूक कंपन्यांना बर्‍यापैकी पैसे मिळत आहेत. बहुतांश कंपन्या आर्थिक चणचणीचा सामना करत आहेत अशा ऑफर दिल्याने कंपनीचा दैनंदिन खर्च उत्तमरीत्या भागतो आहे. बाजारातील हिस्सेदारी वाढवण्याच्या दबावातून कंपन्यांना नवनव्या योजना सादर कराव्या लागत आहेत. मार्च 2014 अखेर देशातील विमान वाहतूक कंपन्यांकडे 32.5 अब्ज रुपयांची रोकड होती.