आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AirAsia India’s Maiden Flight On Bangalore Goa Route

एअर एशियामुळे छेडणार पुन्हा दरयुद्ध, पहिले उड्डाण बंगळुरू-गोवा मार्गावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एअर एशियाच्या हवाई क्षेत्रात नव्या प्रवेशाने पुन्हा एकदा विमान बाजारपेठ दरयुद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंपनीने बंगळुरू- गोवा या मार्गावरील हवाई सफर सर्व करांसहित केवळ 990 रुपयांत उपलब्ध करून दिली आहे. कंपनीच्या पहिल्या विमान प्रवासाला 12 जूनला सुरुवात होत आहे. त्यामुळे अन्य वाजवी भाड्यात सेवा देणार्‍या विमान कंपन्यांनादेखील याच पावलावर पाऊल टाकावे लागेल, असा अंदाज आहे.
एअर एशियाच्या विमान तिकिटांच्या आरक्षणाला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून ती संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. प्रत्येकाला विमान प्रवास घडवायचा हेच आमचे लक्ष्य असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिथ्थू चांडिल्य यांनी सांगितले. एअर-एशियाचे विमान भाडे बाजाराच्या तुलनेत 35 टक्क्यांनी स्वस्त आहे. बारा जूनपासून एअर एशिया ए- 320 या विमानातून प्रवास घडवणार असून हे विमान बंगळुरू येथून गोव्यासाठी दुपारी 3 वाजता उड्डाण घेईल. दिल्ली आणि मुंबई मार्गावर विमानसेवा देण्याचा विचार सध्या नाही, असे कंपनीने म्हटले आहे. एअर एशियाच्या आगमनाच्या अगोदरच स्पाइस जेट, इंडिगो यांसारख्या नो- फ्रील विमान कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांपासून सवलतीच्या दरात विमान तिकीट देण्यास सुरुवात केली आहे. अन्य कंपन्या विमान भाडे कमी करतील काय, या प्रश्नाला उत्तर देताना चांडिल्य यांनी एअर एशियामुळे विमानांच्या भाड्यात सुसूत्रता येईल, असा विश्वास व्यक्त केला.