आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Airline Company Forigen Investment Share Market Up

विमान वाहतूक कंपन्या, तेजीने शेअर्सचे उड्डाण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय विमान वाहतूक कंपन्यांमध्ये 49 टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. याचा परिणाम बुधवारी शेअर बाजारात दिसून आला. बाजारातील विमान वाहतूक कंपन्यांच्या शेअर्सनी तेजीचे उड्डाण नोंदवले. जेट एअरवेज, स्पाइसजेट आणि किंगफिशर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी आली.
भारतीय विमान वाहतूक कंपन्यांत विदेशी कंपन्यांचा हिस्सा वाढवण्यास सरकारने अनुकूलता दाखवली आहे. नागरी हवाई वाहतूकमंत्री अजित सिंग यांनी सांगितले की, यासंदर्भात अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा झाली. विमान वाहतुकीस एफडीआयला त्यांनी मान्यता दिली आहे. आता केंद्रीय मंत्रिमंडळाकडून यावर शिक्कामोर्तब होईल.
विदेशी कंपन्यांना भारतीय विमान वाहतूक उद्योगात प्रवेश देणे हा मोठा धारणात्मक निर्णय असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. आतापर्यंत भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला मान्यता नव्हती. या निर्णयाचा चांगला परिणाम विमान वाहतूक कंपन्यांच्या समभागावर झाला आणि त्यांची जोरदार खरेदी झाली. जेट एअरवेजच्या समभागांत 4.96 टक्के तेजी आली. जेटचे शेअर्स 246.55 रुपये या पातळीवर बंद झाले. एक वेळ जेटच्या समभागांनी 12.55 टक्के तेजीसह 264.40 रुपये ही पातळी गाठली होती. विजय मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाइन्सचे शेअर्स 0.60 टक्के तेजीसह 25.25 रुपयांवर बंद झाले. किंगफिशर एअरलाइन्सचे शेअर्स एक वेळ 10.35 टक्के तेजीसह 27.70 रुपयांपर्यंत वधारले होते. स्पाइकजेटच्या समभागात 2.46 टक्के तेजी आली आणि हे शेअर्स 22.90 रुपये या पातळीवर बंद झाले. दिवसभराच्या सत्रात स्पाइकजेटच्या शेअर्सनी 10 टक्के तेजीसह 24.60 रुपयांची पातळी गाठली होती.
वाढते कर्ज, भडकलेल्या इंधनाच्या किमती आणि कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे घरघर लागलेल्या विमान वाहतूक कंपन्यांच्या पंखात एफडीआयमुळे चांगले बळ येईल अशी अपेक्षा बाजाराला असल्यामुळे या कंपन्यांच्या समभागात तेजी आल्याचे विश्लेषकांनी स्पष्ट केले.