आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान कंपन्यांतील ‘एफडीआय’चे लवकरच ‘टेकऑफ’ होणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आर्थिक अडचणीच्या खराब वातावरणात घिरट्या मारत असलेल्या देशातील विमान कंपन्यांनी केलेल्या विनंतीला अखेर केंद्र सरकारकडून दुजोरा मिळाला आहे. भारतीय विमान कंपन्यांमध्ये 49 टक्के विदेशी थेट गुंतवणुकीला परवानगी देण्यास सरकारने अनुकूलता दर्शवल्यामुळे या कंपन्यांमधील ‘एफडीआय’चे आता लवकरच टेकऑफ होणार आहे.
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री अजित सिंग यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत भारतीय विमान कंपन्यांमध्ये 49 टक्के विदेशी थेट गुंतवणुकीला परवानगी देण्याबाबत अनुकूलता दर्शवण्यात आली आणि याबाबतची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
अर्थमंत्री आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री यांच्यात 75 मिनिटे या विषयावर प्रदीर्घ चर्चा झाली. या बैठकीमध्ये स्थानिक विमान कंपन्यांमध्ये विदेशी थेट गुंतवणुकीला परवानगी देण्याबाबत विशेष चर्चा झाली आणि त्यांनी ते मान्य केले. आता हा विषय लवकरच मंत्रिमंडळ समितीसमोर मांडण्यात येईल असे अजित सिंग यांनी सांगितले. सध्या भारतीय विमान कंपन्यांमध्ये 49 टक्क्यांपर्यंत ‘एफडीआय’ची परवानगी अगोदरच आहे. फक्त आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना एफडीआयमध्ये सहभागी करायचे की नाही हा प्रश्न आहे. सचिवांच्या समितीनेही ही मर्यादा 49 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली असल्याचे सिंग यांनी सांगितले.
एअर इंडियाला 150 कोटी
एअर इंडियातील वैमानिकांसह कर्मचा-यांचे थकीत पगार चुकते करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील या विमान कंपनीला 150 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. हा निधी लवकरच एअर इंडियाला देण्यात येणार असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.