आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Airline Ticket Offer News In Marathi , Spice Jet, Indigo

रेल्वे नको, विमानानेच करा प्रवास; स्पाइस जेट, इंडिगोची ऑफर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- येणारा सुटीचा हंगाम ‘कॅश’ करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात स्पाइस जेटने तिकीट कपातीचे पहिले युद्ध छेडले. विमान तिकिटांवर भरघोस सवलती देऊन विमान भाड्याच्या किमतीत चौथ्यांदा कपात करून स्पाइस जेट आणि इंडिगो यांनी पुन्हा या युद्धात नवा रंग भरला आहे.

सवलतींच्या दरातील तिकिटे ग्राहकांच्या हाती देऊन ‘बुरा ना मानो होली है’ असा सूर जवळपास सर्वच कंपन्या आळवू लागल्या आहेत. त्यातून आर्थिक अडचणीत सापडलेल्या विमान कंपन्यांनी सुपर होली सेल्स आणि फ्लॅश सेल्ससारख्या योजना आणून काही निवडक विमान मार्गांवर सवलतीच्या तिकीट दराचे रंग भरले आहेत. त्यामुळे ग्राहकही या सवलतीच्या दरात रंगून घेण्यास नकार देणार नाहीत हेही तितकेच खरे.

‘लो- कॉस्ट’ सेवा देणार्‍या ‘इंडिगो’ या कंपनीने मर्यादित क्षमतेसह निवडक मार्गावर 1,999 रुपये इतके कमी विमानभाडे आकारण्याचे ठरवले आहे. पुढील पाच दिवसांमधील ‘फ्लॅश सेल’मध्ये 30 टक्के सवलत देण्याचेही कंपनीने उशिरा जाहीर केले.
स्पाइस जेटनेही सुपर होली सेल योजनेच्या पिचकारीतून काही निवडक मार्गासाठी 1,999 रुपये (सर्व समावेशासह) एवढेच भाडे आकारले आहे.

आगाऊ तिकीट आरक्षणावर घसघशीत सवलत : स्पाइस जेटने 24 फेब्रुवारीला सुपर समर सेल योजनेअंतर्गत 75 टक्क्यांची भरघोस सवलत जाहीर करून दरकपातीचे युद्ध छेडले. इतकेच नाही, तर दोन महिन्यात तीन वेळा विमान भाड्यात कपात केली.

त्यानंतर गो एअर आणि इंडिगोने या पावलावर पाऊल ठेवले. जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात आणि फेब्रुवारीमध्ये तीनदा अशा प्रकारे जवळपास सर्वच आघाडीच्या विमान कंपन्यांनी स्वस्त विमान भाड्याची स्पर्धा सुरू केली.
आता या युद्धात जेट एअरवेज, एअर इंडिया या कंपन्यांनाही सहभागी व्हावे लागले आहे. एअर इंडियाने यात उडी घेतल्याचे एजंटांकडून समजते. कंपनीने अधिकृत सांगितले नाही.

स्पाइस जेटचे पॅकेज
भाडे : 1,999 रु. (निवडक मार्गांसाठी), कमीत कमी भाड्याचा लाभ घेण्यासाठी प्रवासाच्या अगोदर 90 दिवस तिकीट आरक्षण करणे आवश्यक. कंपनीचे संकेतस्थळ, अन्य तिकिटिंग पोर्टल वा एजंटांच्या मार्फत तिकीट आरक्षण, विमान कंपन्यांचे कॉल सेंटर किंवा विमानतळावर आरक्षण केल्यास ऑफरचा लाभ नाही.
असे असेल भाडे : दिल्ली - चंदिगड : 1,999 रु. हैदराबाद- कोचीन : 2,999 रु., अमृतसर- मुंबई : 3,999 रु.

एअर इंडियाचीही ऑफर?
एअर इंडियानेही ऑफर जाहीर केल्याचे एजंट आणि ट्रव्हल पोर्टलकडून सांगण्यात आले. एअर इंडियाकडून अद्याप यास दुजोरा मिळालेला नाही. एअर इंडियाने दिल्ली -मुंबई मार्गावरील तिकिटाचे दर 60 दिवस आगाऊ आरक्षण केल्यास 3881 रुपये, तर 30 दिवस आगाऊ आरक्षण केल्यास 4983 रुपये ठेवले आहे.

इंडिगोचे पॅकेज : भाडे : 1,999 रु, निवडक मार्गावर प्रवासाचा कालावधी : 14 एप्रिल ते 30 जून, 16 मार्चपासून पाच दिवस तिकीट विक्री.