आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पाइस जेटची सूत्रे पुन्हा अजय सिंह यांच्याकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आर्थिक संकटात सापडलेल्या स्पाइस जेट या विमान वाहतूक कंपनीची सूत्रे आता कंपनीचे मूळ संस्थापक अजय सिंह यांच्याकडे सोपावण्यात आली आहेत. आतापर्यंत स्पाइस जेटचा कारभार पाहणारे सन समूहाच्या मारन कुटुंबीयांना यातून बाहेर काढण्यात आले आहे. मारन कुटुंबाने आपल्याकडील ५३ टक्के स्पाइस जेटचा हिस्सा हस्तांतरित करण्यास मुभा
दिली आहे.

कर्जाच्या खाईत सापडलेल्या स्पाइस जेटला सावरण्यासाठी मारन कुटुंबीय ८० कोटी रुपये कंपनीला देणार आहे. मुंबई शेअर बाजारात १००० कोटी रुपयांचे बाजार मूल्य असलेल्या स्पाइस जेटचे समभाग १८.६५ रुपयांवर बंद झाले. स्पाइस जेटला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी योजना तयार करण्यात आली असून त्यानुसार कंपनीचे मूळ संस्थापक
अजय सिंह यांच्याकडे स्पाइस जेटची सूत्रे देण्यास कार्यकारी मंडळाने संमती दिली आहे. कलानिधी मारन आणि काल एअरवेज आता आपल्याकडील स्पाइस जेटचे सर्व मालकी हक्क, व्यवस्थापन व नियंत्रण हक्क अजय सिंह यांच्याकडे सोपवतील, अशी माहिती सन समूहाचे सीईओ एस.एल. नारायणन यांनी दिली.

अब की बार... आणि अजय सिंह
स्पाइस जेट लिमिटेड या कंपनीचे अजय सिंह हे मूळ संस्थापक आहेत. सध्या केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. लोकसभा निवडणुकीत अब की बार मोदी सरकार ही घोषणा गाजली होती. अजय सिंह यांनीच हे स्लोगन तयार केले होते. आयआयटी दिल्लीचे ते माजी विद्यार्थी आहे. प्रवासी विमान वाहतुकीतील इंडिगो आणि
जेट एअरवेजची मक्तेदारी मोडून काढण्यात अजय सिंह यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी स्पाइस जेट सोडले त्या वेळी ८०० कोटींची गंगाजळी कंपनीकडे होती. स्पाइस जेटला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी आता अजय सिंह यांच्यावर आली आहे.