आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुहूर्त साधणार: अक्षय्य तृतीयेची सुवर्णसंधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एप्रिल महिन्यात सोन्याच्या किमती आपटल्यामुळे सोमवारची अक्षय्य तृतीया सराफा बाजारासाठी अनुकूल ठरणार आहे, परंतु ग्राहकांचा विचार करता बहुतांश मागणी गुंतवणुकीच्या दृष्टीने राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा अलंकारांपेक्षाही सोन्याची नाणी आणि लगडी यांना जास्त मागणी येण्याचा अंदाज सराफ बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहे.

गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेला झालेल्या एकूण विक्रीमध्ये दागिन्यांचा वाटा हा जवळपास 90 टक्के, तर नाण्यांचा वाटा 10 टक्के होता, परंतु यंदा सोन्याची नाणी खरेदी करण्याचे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत जाईल असाही सूर सराफा बाजारात व्यक्त केला जात आहे.
अलीकडे सोन्याच्या किमतीत घट झाल्याने यंदा अक्षय्य तृतीयेला सोने आणि अलंकारांच्या विक्रीत 20 ते 25 टक्के वाढ होण्याचा अंदाज ऑल इंडिया जेम्स अ‍ॅँड ज्वेलरी फेडरेशनचे अध्यक्ष हरेश सोनी यांनी व्यक्त केला.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणार्‍या अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीला महत्त्व असते, परंतु सोन्याच्या किमतीने सामान्यांचे डोळे पांढरे झाले होते. परंतु अक्षय्य तृतीयाच्या तीन आठवडे अगोदरच दहा ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 11.5 टक्क्यांनी घसरून तो 10 एप्रिलच्या 29 हजार रुपयांच्या उंचीवरून 17 एप्रिलला 25,680 रुपयांवर आला. त्यानंतर या किमतीत सुधारणा होऊन तो शनिवारी दिल्ली सराफ बाजारात दहा ग्रॅम सोन्याचा भाव 125 रुपयांनी घसरून 27,700 रुपयांवर आला.

गेल्या अकरा वर्षांच्या प्रदीर्घ तेजीनंतर यंदा एप्रिलमध्ये सोन्याच्या किमती खाली घसरल्या. किंमत कमी होण्याची प्रत्येक जणाला प्रतीक्षा होती. त्यामुळे या संधीचा जास्तीत जास्त फायदा सोने खरेदीदार उचलतील, अशी अपेक्षा आहे. परंतु रिद्धिसिद्धी बुलियन लिमिटेडचे संचालक मुकेश कोठारी यांच्या म्हणण्यानुसार 12 ते 17 एप्रिल या कालावधीत सोन्याचा भाव पडल्यानंतर जवळपास 80 टक्के सोने खरेदी अगोदरच झाली आहे. सराफा बाजारातील घाऊक, दागिने आणि किरकोळ विक्रेत्यांनी या पडझडीतूनच सवलतीच्या दरात सोने खरेदी केली आहे. त्यामुळे खास अक्षय्य तृतीयेला सोन्याची मागणी वाढेल, असे वाटत नाही.

गोल्ड ईटीएफच्या व्यवहारासाठी वेळेत वाढ
अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे 13 मे रोजी ग्राहकांना गोल्ड ईटीएफचे व्यवहार करणे आणखी सुलभ जावे यासाठी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने संध्याकाळी 7 वाजेपर्यंत व्यवहाराची वेळ वाढवली आहे. त्याचप्रमाणे या दिवशी गोल्ड ईटीएफमधील सर्व व्यवहारासाठी शुल्क माफ केले आहे. गोल्ड ईटीएफमधील व्यवहार साडेचारला सुरू होऊन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालतील. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बाजारात सोने व ईटीएफची जोरदार खरेदी होण्याची आशा विश्लेषकांनी व्यक्त केली.

गुंतवणुकीचे प्रमाण वाढल्याने ईटीएफला झळाळी
सोन्याची प्रत्यक्ष खरेदी करण्याऐवजी गुंतवणुकीचे सुरक्षित साधन म्हणून अलीकडच्या काही वर्षांत गोल्ड ईटीएफमधील गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच 2011मधील 423.5 कोटी रुपयांच्या तुलनेत मागील वर्षातल्या अक्षय तृतीयेला गोल्ड ईटीएफमधील गुंतवणुकीचे प्रमाण 44 टक्क्यांनी वाढून 608 कोटी रुपयांवर गेले असल्याचे राष्ट्रीय शेअर बाजाराकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. गोल्ड ईटीएफच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तादेखील 18 टक्क्यांनी वाढून ती मागील वर्षातल्या मार्चमधील 9,886 कोटी रुपयांवरून यंदाच्या मार्चमध्ये 11,648 रुपयांवर गेली आहे.