आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All women Bank To Start Operations From November

भिशी, बचत गट गुंतवणूक महिला बँकेकडे वळणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महिलांसाठी खास राष्ट्रीय पातळीवरील बँक स्थापन करण्याच्या वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी केलेल्या घोषणेचे तमाम महिलावर्गाने स्वागत करताना यंदा ‘जागतिक महिला दिना’ची आगळी-वेगळी भेट असल्याचे म्हटले आहे. यामुळे घरगुती बचत, भिशी किंवा अन्य साधनांमध्ये होणारी गुंतवणूक आता महिला बँकेकडे वळण्यास मदत होऊ शकेल, असे मत विविध तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

काही आघाडीच्या बँकांनी महिलांसाठी विशेष शाखा सुरू केल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी महिला पतपेढ्यादेखील कार्यरत आहेत; परंतु महिलांनी महिलांसाठी चालवलेली देशातील पहिली राष्ट्रीयीकृत बँक ठरणार आहे. आवश्यक त्या मंजुर्‍या आणि परवाना मिळाल्यानंतर ही नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याचे संकेतही वित्तमंत्र्यांनी दिले आहेत.

महिलांसाठी स्वतंत्र बँक सुरू करण्यामागे सरकारची नेमकी काय योजना आहे हे स्पष्ट होत नसले तरी ही राष्ट्रीयीकृत बँक असेल ही आनंदाची गोष्ट आहे. या प्रस्तावित बँकेची मालकी सरकारकडे राहणार असल्यामुळे महिलांचा बँकेवरील विश्वास वाढेल. जिल्हा आणि तालुका पातळीवर या बँकेचे काम चांगले होऊन बँकांमधील ठेवींचे प्रमाण वाढण्यासही चांगला हातभार लागण्यास मदत होऊ शकेल, असे मत ऑल इंडिया बँकिंग असोसिएशनचे सचिव विश्वास उटगी यांनी दै. ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.

बँकांमध्ये पगार, बढती तसेच करिअरमध्ये प्रगती करण्याच्या समान संधी आहेत. 1972- 73 मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण झाल्यापासूनची वाटचाल बघितली तर त्या काळात बँकांमध्ये नोकरीला लागलेल्या महिला या प्रवासात अत्युच्च पातळीवर गेल्या, तर बर्‍याच महिला आता निवृत्तीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे करिअर घडवताना मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन नवीन महिलांनादेखील या हक्काच्या बँकेच्या माध्यमातून प्रगतीचे शिखर गाठता येऊ शकेल, असा ठाम विश्वासही उटगी यांनी व्यक्त केला.

सारस्वत बँकेच्या लघु आणि मध्यम उद्योग विपणन विभागाच्या महाव्यवस्थापक उर्वशी धराधर यांनी, महिलांची बँक झाल्यामुळे आर्थिक व्यवहार आणखी सुलभ होतील आणि त्यांच्या मनातील बँक व्यवहाराबाबतची असुक्षिततेची भावना कमी होऊ शकेल. मुख्य म्हणजे ही बँक सार्वजनिक क्षेत्रातली असल्याने सरकारचा पाठिंबा तसेच विविध योजनांचा जास्त फायदा घेत येऊ शकेल, याकडे लक्ष वेधले.

गेल्या 31 वर्षांपासून डोंबिवलीत कार्यरत असलेल्या कांचन गौरी महिला सहकारी पतपेढीच्या अध्यक्षा ऊर्मिला प्रभुघाटे म्हणाल्या की, या बँकेच्या माध्यमातून उद्योग - व्यवसाय करण्याचे धडे महिलांना मिळतील. प्रकल्प अहवालावर कर्ज तसेच सुलभ अर्थसाह्य मिळाले तर त्या आणखी भक्कमपणे आपल्या पायावर उभ्या राहू शकतील; पण ही बँक महाराष्ट्रातही अस्तित्वात आणण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची आहे.

उद्योजकीय गुणांना चालना - बँकांना दस्तऐवज सादर करण्यामागे कमी शिकलेल्या, तळागाळातील महिला कमी पडतात. त्यामुळे बर्‍याचदा छोटा उद्योग करण्याची जिद्द असतानाही केवळ आर्थिक मदत न मिळाल्याने ती मारली जाते. परिणामी जवळपास 60 टक्के महिला आज अशा आहेत की ज्यांच्याकडे स्वत:चे बँक खाते नाही. शेवटी मग थोडेसे जास्त टक्क्यांनी व्याज देणार्‍या पर्यायांकडे त्या वळतात; पण स्वत:ची हक्काची बँक झाल्याने या महिलांना बँकांमधील महिला कर्मचार्‍यांबरोबर संवाद साधता येईल. भिशी किंवा अन्य मार्गाने होणारी बचत बँकेकडे वळण्यास यामुळे मोठा हातभार लागण्यास हातभार लागू शकेल, असे मत बचत गट चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या प्रांजल जाधव यांनी व्यक्त केले. ऊर्मिला प्रभुघाटे यांनीदेखील भिशीची रक्कम बँकेत वळवण्याच्या दृष्टीने चांगल्या गुंतवणुकीचे महत्त्व महिलांच्या मनावर बिंबवण्याची गरज व्यक्त केली.