मुंबई - अमेरिकेतील रोखे खरेदी कार्यक्रम (टॅपरिंग) आवरता घेतला तरी त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही आणि चालू खात्यातील तूट यंदाच्या आर्थिक वर्षात जीडीपीच्या तुलनेत तीन टक्क्यांपेक्षा कमी राहील, असा विश्वास रिझर्व्ह बँकेच्या आठव्या वित्तीय स्थिरता अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
बाह्य धोक्यांचे प्रमाण लक्षणीय कमी झालेले असून अमेरिकेतील ‘टॅपरिंग’ भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम मर्यादित आणि अल्प कालावधीसाठी असेल असे या अहवालात म्हटले आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने महिन्याला 85 अब्ज डॉलरच्या रोखे फेरखरेदीचा कार्यक्रम राबवला होता. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सुधारणांचे संकेत दिसू लागल्याने फेडरल रिझर्व्हने हा कार्यक्रम जानेवारीपासून आवरता घेण्यात येण्यात असल्याची घोषणा फेडरल रिझर्व्हने डिसेंबरच्या तिस-या आठवड्यात केली होती.