आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगारांना हवा बोनस, भागधारकांना का नको?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या नफ्यातील जो भाग राखीव निधीच्या रूपाने कंपनीकडे आहे, तो बोनस शेअर्समुळे थेट भागधारकांच्या हातात येतो. याशिवाय इतरही काही फायदे आहेत. बोनस शेअर्समुळे कंपनीच्या शेअरची बाजारातील संख्या वाढते, तसेच भाव कमी होतो, या दोन्हींमुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढतात. बोनस शेअर्स मिळाल्यामुळे भागधारकांना आनंद होतो. बाजारालाही कंपनी उत्तम काम करत आहे, नफ्यात आहे व त्या नफ्याचे शेअरधारकांना वाटप करत आहे याबद्दल विश्वास वाटतो. शेअर बाजारातही कंपनीबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि त्याचा फायदा मिळून त्या शेअरचा भाव वाढतो. बोनस शेअर्समुळे कंपनीचे भाग भांडवल वाढते, त्यामुळे तिला कर्ज घ्यायचे असेल, तर तारण ठेवण्यासाठी जास्त शेअर उपलब्ध होतात. मुख्य म्हणजे शेअरचा भाव बोनसच्या प्रमाणात खाली आला तरी कंपनीच्या कामगिरीनुसार हळुहळू पुन्हा वाढत जातो. काही वर्षांनी तर तो बोनसपूर्व भावाची पातळीही गाठतो किंवा त्याहीपेक्षा वर जातो. एक-दोन वर्षांतच बोनस शेअर्समुळे भागधारकांच्या हातातील शेअरची संख्या दुप्पट झाली आणि निम्म्यावर आलेला भाव पुन्हा बोनसपूर्व पातळीला गेला, अशी प्रत्यक्षातील उदाहरणे आहेत.
दरवर्षी मोजक्याच कंपन्या बोनसची घोषणा करतात
बोनस जाहीर केल्यामुळे कंपनीबद्दल चांगली प्रतिमा तयार होते आणि ती तर सर्वांनाच हवीशी असते; परंतु असे असूनही खूप कंपन्या असा बोनस जाहीर करत नाहीत. दरवर्षी मोजक्याच कंपन्या बोनसची घोषणा करतात. याचे कारण असे की, बोनस जाहीर करण्यासाठी सेबीने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिलेली आहेत. तसेच काही आर्थिक निकषही पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. त्यांनतरच बोनस जाहीर करता येतो. ही तत्त्वे पुढीलप्रमाणे : फक्त खर्‍या नफ्यातून जमा झालेल्या मुक्त राखीव निधीतूनच बोनस शेअर देता येतील. जर मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन केले व त्यातून राखीव निधी जमा झालेला असेल, तर त्यातून बोनस शेअर देता येणार नाहीत. लाभांशाऐवजी बोनस शेअर देता येणार नाहीत. जर कंपनीचे काही शेअर्स ‘पार्टली पेड अप’ (दर्शनी मूल्याच्या अंशत:च रक्कम कंपनीकडे जमा झालेले) असतील, तर ते ‘फुल्ली पेड अप’ (पूर्ण मूल्य चुकते केलेले) झाल्याशिवाय बोनस शेअर देता येणार नाहीत. कंपनीने मुदतठेवी किंवा रोखे यांचे व्याज किंवा मुद्दल थकवलेले नसावे, कामगारांची वैध देणी चुकती केलेली असावीत. इतरही काही नियम आहेत, पण आपण एक प्रत्यक्षातील उदाहरण बघू.
कम-बोनस व एक्स-बोनस
उदाहरणार्थ : ओमेक्स लिमिटेड ही बांधकामक्षेत्रातील कंपनी. या कंपनीने 30 ऑक्टोबर 2013 ला प्रत्येकी 39 शेअरच्या बदल्यात 10 बोनस शेअर अशी सूचना जारी केली व त्यासाठी 12 नोव्हेंबर 2013 ही रेकॉर्ड डेट असल्याचे जाहीर केले. रेकॉर्ड डेट याचा अर्थ या तारखेला तुमच्याकडे कंपनीचे शेअर असतील, तरच त्यावर तुम्हाला बोनस शेअर्स मिळतील. जर तुम्ही 11 नोव्हेंबरला किंवा त्याआधी विकून टाकले, तर मिळणार नाहीत आणि 13 नोव्हेंबरला किंवा त्यानंतर घेतले तरी बोनस शेअर्स मिळणार नाहीत. तसेच बोनस जाहीर केल्यानंतर कंपनीच्या शेअरचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात त्यावेळेस कम-बोनस व एक्स-बोनस असे शब्द ऐकायला मिळतात. एक्स-बोनस याचा अर्थ रेकॉर्ड डेटनंतरचा बोनस. शेअर्सचा परिणाम पचवलेला भाव, तर कम-बोनसचा अर्थ रेकॉर्ड डेटआधीचा भाव. ओमेक्स लिमिटेडबाबत 11 नोव्हेंबरला कम-बोनस भाव 139 रुपये होता. 12 नोव्हेंबर या रेकॉर्ड डेटला प्रत्येकी 39 शेअरमागे 10 बोनस शेअर मिळाले व त्या दिवशी एक्स-बोनस भाव 120 रुपये झाला. भाव कमी होऊनही बोनस शेअर्समुळे याबाबतीत फायदा कसा झाला हे बघूया. बोनसआधी समजा 39 शेअर आहेत, तर त्याचे एकूण मूल्य 39 गुणिले 139 बरोबर 5,421 रुपये होते. बोनसनंतर आपल्याकडे 49 शेअर होतात व त्यांचा भाव कमी होऊन आता 120 आहे, म्हणजेच एकूण मूल्य 49 गुणिले 120 बरोबर 5,880 रुपये होते. तसेच भाव कमी होऊन जो 120 झाला होता तो पुन्हा हळूहळू वाढत आहे व आता एका महिन्याने तो 125 रुपये झाला आहे. कामगारांना जसा बोनस हवाहवासा असतो, तसे भागधारकांनाही हा हवाहवासाच असतो! अशा कोणत्या कंपन्या संभाव्य बोनस उमेदवार आहेत यावर लक्ष ठेवून असावे. kuluday@rediffmail.com