शेअर्स खरेदी करण्याचे निकष यासंबंधी बरीच माहिती घेतल्यानंतर आता शेअर्स खरेदी-विक्री करण्याच्या ऑर्डर कशा द्यायच्या याची माहिती घेऊ. शेअर्सची खरेदी-विक्री करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट, डिमॅट अकाउंट व बँकेतील बचत (सेव्हिंग) किंवा चालू (करंट) अकाउंट हवेत व हे तिन्ही एकमेकांशी लिंक्ड म्हणजे संलग्न हवेत, हे आपण सुरुवातीला बघितलेले आहे. आता यांचा उपयोग करून शेअर्स खरेदी-विक्रीच्या ऑर्डर कशा द्यायच्या (प्लेस करायच्या) ते बघू. या ऑर्डर आपण फोनवर देऊ शकतो किंवा स्वत: ऑनलाइन प्लेस करू शकतो. प्रत्येक फर्मच्या पद्धतीत थोडा-फार फरक असतो. एका फर्मची पद्धत काय आहे ते बघू, म्हणजे त्यावरून सर्वसाधारण कल्पना येईल. फर्ममध्ये ट्रेडिंग अकाउंट उघडताना आपल्याला एक अकाउंट नंबर दिला जातो आणि एक युनिक ‘युजर आयडी’ही दिला जातो. बँकेतील बचत खात्याचा जसा एक खाते क्रमांक असतो तसाच हा ट्रेडिंग अकाउंटचा खाते क्रमांक. शिवाय एटीम कार्डाचा जसा पिनकोड असतो तसा ट्रेडिंग अकाउंटबरोबर त्याचा टेलिपिन कोडही असतो. ट्रेडिंग अकाउंट नंबर व टेलिपिन कोड या दोन्हीचा उपयोग करून फोनवरून ऑर्डर देता येते. त्यासाठी फर्मच्या टेलिब्रोकिंग फोन नंबरवर फोन केल्यावर आधी सिस्टिमतर्फे ट्रेडिंग अकाउंट नंबर की-इन करण्यास सांगितले जाते व तो वैध करण्यासाठी टेलिपिन कोड की-इन करण्यास सांगितले जाते. तो बरोबर असेल तर कंपनीच्या प्रतिनिधीबरोबर संपर्क होतो व त्याला आपण आपली ऑर्डर देऊ शकतो. आपल्या नावाने इतर कोणी फोन करत नाही याची खातरजमा करण्यासाठी क्वचित प्रतिनिधी ओळख पटवणारे प्रश्नही विचारतो. आता समजा शेअर खरेदीची ऑर्डर देत आहोत, तर बँकेतील बचत खात्यातून तितकी रक्कम फर्मकडे वळती केली जाते किंवा होल्ड केली जाते. हे काम कंपनीचा प्रतिनिधीच करतो. तसेच शेअर विकताना ते होल्ड करण्याचे कामही प्रतिनिधीच करतो. ऑर्डर एंटर केल्यानंतर प्रतिनिधी एक रेफरन्स क्रमांक देतो. ऑर्डरबाबत पुन्हा संपर्क साधावा लागला तर त्या वेळेस हा सांगणे आवश्यक असते, म्हणून तो लिहून ठेवावा. या पद्धतीत कंपनीच्या प्रतिनिधीबरोबर संपर्क होण्यास कधी कधी वेळ लागू शकतो. शिवाय ऑर्डर दिल्यानंतर भावात बदल करायचा असेल तर पुन्हा वरीलप्रमाणेच फोन करावा लागतो. अनेक वर्षे व्यवहार करून कंपनीच्या सबब्रोकरबरोबर काही ग्राहकांचे विश्वासाचे संबंध निर्माण होतात. असे लोक सरळ त्या सबब्रोकरला फोन करून खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात. मात्र, ही पद्धत वापरू नये. जोपर्यंत सर्व सुरळीत सुरू आहे तोपर्यंत हे सोयीचे वाटते. समस्या आल्यावर दोन्ही बाजूंना त्रास होतो.
व्यवहार करण्याचा दुसरा मार्ग ऑनलाइन व्यवहार करणे. त्यासाठी फर्मच्या वेबसाइटवर गेल्यानंतर त्यावर ‘ट्रेड नाऊ’ किंवा ‘लॉग-इन फॉर ट्रेड’ असे काही लिहिलेली पट्टी दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर युजर आयडी की-इन करण्यासाठी स्क्रीन येईल. तो एंटर केल्यावर पासवर्ड द्यावा लागतो. याशिवाय जास्तीची सुरक्षा म्हणून जन्मतारीख किंवा पॅनकार्ड नंबरसुद्धा टाकावा लागतो. यानंतर ट्रेडिंगच्या साइटवर जाऊन खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करू शकतो. ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी काही कंपन्यांसंदर्भात त्यांचे सॉफ्टवेअर आपल्या संगणकावर इन्स्टॉल करावे लागते. विशेषत: ट्रेडर म्हणून दिवसभरात अनेक व्यवहार जलदगतीने करायचे असतील व एकाच वेळेस अनेक शेअर्सचे भाव स्क्रीनवर दिसण्याची तरतूद (स्ट्रिमिंग कोट्स) हवी असेल तर कंपनीतर्फे अशी सोय असते. मात्र, नवीन असताना साधी व सोपी (बेसिक) पद्धत वापरावी.
व्यवहार फोनवर करावेत की स्वत: ऑनलाइन करावेत? स्वत: ऑनलाइन व्यवहार केले तर बर्याच गोष्टींवर आपले नियंत्रण राहते. ज्या शेअरचा व्यवहार करायचा आहे त्याचा किती भाव सुरू आहे, कशा प्रकारे तो बदलत आहे हे दिसते. एकदा ऑर्डर दिल्यानंतर त्यात बदल करायचे असतील तर ऑर्डर अमलात येण्यापूर्वी ते सहज करता येतात. मात्र, नेट कनेक्शन नसेल तर फोनचा पर्याय आहेच.
मोबाइलवर व्यवहार करणे हा तिसरा मार्गही आता उपलब्ध आहे. त्यासाठी मोबाइलवर नेट कनेक्शनची सोय असावी लागते. नंतर मोबाइलवर कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन तेथून आधी
गुगल प्ले किंवा अॅप स्टोअर अशा लिंकवरून मोबाइल ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करावे लागते तसेच मोबाइल ट्रेडिंगसाठी कंपनीकडे नोंदणी (रजिस्ट्रेशन) करावी लागते. आपला फोन अॅँड्रॉइड , विंडोज की आयफोन इत्यादी त्यानुसार योग्य अॅप डाऊनलोड करावे.
ऑर्डर कशी द्यायची यासंबंधी अधिक माहिती पुढील लेखात.