आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठरावीक ठिकाणी क्रेडिट कार्डचा वापर टाळावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंत्रज्ञानामुळे एकीकडे जगभरातील लोकांना मदत मिळत असताना त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हे आणि हॅकिंगद्वारे काही गुन्हेगार इंटरनेटच्या या मायाजाळामध्ये असुरक्षितता पसरवत आहेत. लोकांना जी माहिती संपूर्ण जगापासून लपवायची असते ती माहिती असे लोक काही सेकंदांमध्ये मिळवतात. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून गुन्ह्यांचे प्रमाण तर प्रचंड वाढले आहे. तंत्रज्ञानाचा लोकांच्या जीवनावर कसा विपरीत परिणाम होतो, याचे हे अत्यंत योग्य उदाहरण ठरू शकते. क्रेडिट कार्डमुळे खरेदीचा अनुभव अधिक सुकर झाला असला तरी त्यामुळे जोखीमही त्याच प्रमाणात वाढली आहे. क्रेडिट कार्ड कंपन्या ग्राहकांबरोबर होणार्‍या धोक्यासाठी बँकांना जबाबदार ठरवतात. त्यामुळे क्रेडिट कार्डची खरेदी करण्यापूर्वी यातील धोक्यांबद्दल माहिती घेणे अत्यंत गरजेचे ठरते.
० अनिश्चितपणा : अस्थायी बाजारपेठांमधील दुकानेही अस्थायी स्वरूपाची असतात. त्यामुळे एखाद्या वेळी ग्राहकाला ठकवले गेले तर पुन्हा त्या दुकानदाराला शोधणे फार अडचणीचे ठरते. एवढेच नव्हे, तर दुकानदारांकडे अनेकदा ऑनलाइन क्रेडिट कार्ड पेमेंट टर्मिनल नसतात. त्यामुळे पैसे कपात केल्यानंतर प्रोसेसिंगसाठी ते कार्बन कॉपी त्यांच्याकडे ठेवतात. सगळेच व्यावसायिक वाईट प्रवृत्तीचे असतात असे नाही; पण या प्रक्रियेच्या व्यवहारामधील धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे अशा प्रकारच्या अस्थायी बाजारपेठांमध्ये रोख व्यवहार करणेच अधिक सुरक्षित ठरते. तसेच हातात पैसे असतील तर भाव करायलाही सोपे जाते.
० लहान दुकाने : रस्त्याच्या कडेला असणार्‍या लहान दुकानांमध्ये क्रेडिट कार्डसंबंधी ठकवण्याचे प्रकार तुलनेने अधिक दिसून येतात. या ठिकाणचे व्यवहार क्रेडिट कार्ड कंपन्या आणि बँका बहुतेक वेळा नाकारतात. त्यामुळे क्रेडिट कार्डधारकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
० ऑनलाइन शॉपिंगचा धोका : ऑनलाइन शॉपिंगच्या साइटवर क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करण्याआधी त्या साइटची विश्वसनीयता तपासणे गरजेचे ठरते. सर्वांनी ती तपासायला हवीच. प्रत्येक प्रतिष्ठित आणि सुरक्षित ई- कॉमर्स प्लॅटफॉर्मवर एक अ‍ॅनक्रिप्टेच पेमेंट पेज ओपन होते. ते कोणत्याही बँकेचे, क्रेडिट कार्ड कंपनीचे किंवा दुसर्‍या आर्थिक संस्थेचे असू शकते. त्यामुळे संकेतस्थळ सुरक्षित वाटत नसेल तर त्यावर क्रेडीट कार्डच्या माध्यमातून व्यवहार करणे टाळणे योग्य ठरेल.
० परदेशात रजिस्टर्ड डोमेन : जर एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन शॉंिंपगची आवड असेल तर त्यांनी सुरक्षित, प्रतिष्ठित आणि राष्ट्रीय ऑनलाइन प्लॅटफॉर्मचाच वापर करायला हवा. म्हणजेच डॉट कॉम किंवा डॉट इन डोमेनच्या संकेतस्थळांचा वापर करावा. यूएस, यूके किंवा आरयू एक्स्टेंशन असणारी काही संकेतस्थळे सुरक्षित असू शकतात; पण केवळ देशांतर्गत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरच क्रेडिट कार्डचा वापर करणे योग्य ठरते.
० वाय-फाय किंवा सार्वजनिककॉम्प्युटर : सार्वजनिक कॉम्प्युटर किंवा वाय-फाय हॉटस्पॉटचा वापर करून क्रेडिट कार्डने पेमेंट करणेही असुरक्षितच आहे. सायबर कॅफे, लायब्ररी, रेस्टॉरंट, ट्रेन आणि इतर सार्वजनिक ठिकाणीही क्रेडिट कार्डद्वारे खरेदी टाळायला हवी. तसेच आपली वैयक्तिक माहिती देणेही टाळावे.
० स्मार्टफोन शॉपिंग : स्मार्टफोन अनेक दृष्टीने फायदेशीर ठरतो; पण ऑनलाइन व्यवहारांमध्ये हा तितका सुरक्षित ठरत नाही. मोबाइलमध्ये बहुतांश वेळा असुरक्षित अशा वाय-फाय किंवा डाटा नेटवर्कचा वापर केला जातो. त्यामुळे स्मार्टफोनमध्ये मालवेअर पाठवण्यास गुन्हेगारांना मदत मिळते. त्यामुळे त्यांना लांबवरूनही स्मार्टफोनच्या हालचालींवर नजर ठेवता येते. त्यामुळे क्रेडिट कार्डधारकांना धोका होऊ शकतो.
तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती लोकांकडे उपलब्ध नसते. तंत्रज्ञानाशी संबंधित उपकरणे किंवा डोमेन यांच्याकडून सुरक्षिततेची अपेक्षाच असू नये. उलट आपण त्याबाबत अधिक सावध राहायला हवे.
(लेखक bankbazaar.com चे सीईओ आहेत.)
(adhil.shetty@dainikbhaskargroup.com