आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Facebook And Whatsapp Deal By Venugopal Dhoot, Divya Marathi

‘व्हॉट्सअ‍ॅप’ फेसबुकच्या खिशात,विनाशुल्क सेवा, जाहिरातही घेत नाहीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यवहार : फेसबुककडून 19 अब्ज डॉलर्सपैकी 4 अब्ज डॉलर्स रोखीने, तर 12 अब्ज डॉलर्सचे फेसबुकचे शेअर्स ‘व्हॉट्सअ‍ॅप’ला मिळणार


सोशल मीडियाच्या सतत वाढणा-या प्रभावामुळे या क्षेत्रात प्रचंड उलथापालथी सुरू आहेत आणि नव्याने या क्षेत्रात पदार्पण करणा-या सेवा प्रस्थापितांना आव्हान देत आहेत. असेच जबरदस्त आव्हान ‘व्हॉट्सअ‍ॅप’ या अ‍ॅप्लिकेशनने फेसबुकसह इतर सेवांसमोर उभे केले आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या मागे असणारी तरुणांची वाढती संख्या पाहून फेसबुकला ही सेवा विकत घेण्यावाचून पर्यायच राहिला नाही. या सर्व घडामोडीत महत्त्वाचा वाटा भारतातील संभाव्य बाजारपेठेचा आहे, हे आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे.


अमेरिकेतील सिक्विआ कॅपिटल या व्हेंचर कॅपिटल कंपनीची त्यांना आर्थिक मदत : ‘व्हॉट्सअ‍ॅप’ नेमके काय आहे आणि त्याची खरी ताकद कशात आहे, हे प्रथम समजून घेतले पाहिजे. डॉट कॉमच्या कालखंडात अनेक नामवंत मेसेजिंग कंपन्या उदयाला आल्या. त्यापैकी ‘याहू डॉट कॉम’ ही एक महत्त्वाची सेवा. गुगलच्या आक्रमणानंतरही ही सेवा अजून टिकून आहे. बहुतेक डॉट कॉम कंपन्या जाहिरातींच्या माध्यमातून आपला महसूल मिळवतात. पण जाहिरात न घेता आपल्या जवळच्यांशी संपर्क करू शकणारी एखादी सेवा सुरू करता येईल का, असा प्रश्न ज्यान कौम या युक्रेनियन तरुणाला पडला. रशियातील युक्रेनमधून कौम स्थलांतरित होऊन अमेरिकेत आला होता. युक्रेन आणि रशियातल्या आपल्या गरीब नातलग आणि मित्रांशी संपर्क साधू शकणारी एखादी सेवा त्याला हवी होती. सॅन ज्योस स्टेट युनिव्हर्सिटीतला ड्रॉपआउट असलेल्या या कौमने याहूमधला आपला सहकारी ब्रायन अ‍ॅक्टने याच्याबरोबर 2009 मध्ये ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ही सेवा सुरू केली. अमेरिकेतील सिक्विआ कॅपिटल या व्हेंचर कॅपिटल कंपनीने त्यांना आर्थिक मदत देऊ केली. पाहता पाहता ही विनाशुल्क सेवा जगभर पसरली.


फेसबुकला ‘व्हॉट्सअ‍ॅप’ चे आकर्षण का वाटले, यामध्ये त्या दोघांतील वेगळेपण आणि वाढीची गती याला महत्त्व आहे. फेसबुक आणि त्याच्या इतर सेवा इंटरनेटवर आधारित आहेत. फेसबुकचे युजर एक अब्जाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत आणि त्यापैकी 9 कोटी 30 लाख युजर्स भारतातील आहेत. यामध्ये 7.5 ते 8 कोटी युजर्स फेसबुकशी मोबाइलद्वारे जोडलेले आहेत. ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ही सेवा पूर्णपणे मोबाइलवर आधारित आहे आणि भारतात तिचे युजर्स 3.5 कोटींवर पोहोचले आहेत. त्यापैकी 70 टक्के युजर्स रोज ‘व्हॉट्सअ‍ॅप’ चा वापर करतात, असे लक्षात आले आहे. मोबाइलवर फेसबुकचा वापर करणा-यांची संख्या दरवर्षी 39 टक्क्यांनी वाढते आहे, तर ‘व्हॉट्सअ‍ॅप’ चा वाढीचा दर तब्बल 125 टक्के आहे. म्हणूनच फेसबुकला 19 अब्ज डॉलर्स देऊन ‘व्हॉट्सअ‍ॅप’ विकत घेण्याचा मोह झाला.
जगभर तिचे 45 कोटी युजर्स असल्यामुळे प्रचंड मोठी ब्रँड व्हॅल्यू तयार झाली : फेसबुकची ही बोली ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ने मान्य केली, त्याला कारणेही तशीच आहेत. ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ही सेवा महसूल मिळविण्याच्या दृष्टीने सुरू झाली नसली, तरी जगभर तिचे 45 कोटी युजर्स असल्यामुळे प्रचंड मोठी ब्रँड व्हॅल्यू तयार झाली. फेसबुककडून मिळणा-या 19 अब्ज डॉलर्सपैकी 4 अब्ज डॉलर्स रोखीने मिळणार आहेत, तर 12 अब्ज डॉलर्सचे फेसबुकचे शेअर्स ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ला मिळतील. शिवाय ‘व्हॉट्सअ‍ॅप’ चे संस्थापक आणि कर्मचारी यांना 3 अब्ज डॉलर्स मिळतील. हा खरेदीचा व्यवहार काही कारणाने पूर्ण झाला नाही, तर फेसबुकला 2 अब्ज डॉलर्स टर्मिनेशन फी म्हणून ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ला द्यावी लागेल. अलीकडच्या काळातला सोशल मीडियातला हा सर्वात मोठा व्यवहार आहे.


‘व्हॉट्सअ‍ॅप’वर रोज 10 लाख युजर्स नव्याने, 2 वर्षांतच ‘व्हॉट्सअ‍ॅप’ 1 अब्ज युजर्सवर पोहोचण्याचा अंदाज : सोशल मीडियामध्ये आपण सतत पुढे राहावे, म्हणून सर्वच सेवा कंपन्या धडपडत असतात. फेसबुकनेही आपली स्वत:ची मेसेंजर सेवा सुरू केली, पण ती पुरेशी परिणामकारक ठरली नाही. यापूर्वीच फेसबुकने ‘इन्स्टाग्राम’ ही मेसेंजर सेवा विकत घेतली, तरीही फेसबुकच्या सेवांपासून तरुण दूर जात आहेत, असे फेसबुकला सतत वाटत राहिले. म्हणून ट्विटर आणि स्नॅप चॅट या दोन्ही सेवा विकत घेण्याचा प्रयत्न फेसबुकने केला. पण या दोन्ही सेवांनी झुकेरबर्गला नकार दिला. म्हणूनच त्याला ‘व्हॉट्सअ‍ॅप’ कडे वळावे लागले. सोशल मीडियातील कंपन्या, पुढच्या 20-25 वर्षांत काय घडणार आहे, याकडे लक्ष ठेवून आपले निर्णय घेत असतात. ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर रोज 10 लाख युजर्स नव्याने येत आहेत. वाढीचा हा वेग पाहता पुढच्या 2 वर्षातच ‘व्हॉट्सअ‍ॅप’ 1 अब्ज युजर्सवर पोहोचेल, असा अंदाज आहे. म्हणजे फेसबुकनंतर ‘व्हॉट्सअ‍ॅप’ चेच नाव घ्यावे लागेल.


अमेरिकेतील युजर्सना भारत 2016 पर्यंत मागे टाकेल
फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप चे युजर्स भारतामध्ये प्रचंड वेगाने वाढत आहेत. अमेरिकेतील युजर्सना भारत 2016 पर्यंत मागे टाकेल. तेच ‘व्हॉट्सअ‍ॅप’ बद्दल आहे. भारतासारख्या विकसनशील देशात 20-25 हजारांचा संगणक घेण्याऐवजी मोबाइल घेणे शक्य होते. त्यामुळे मोबाइलधारकांचा दोन्ही सेवांचा वाढता वापरच या मीलनाला कारणीभूत ठरला आहे.
(लेखक व्हिडिओकॉन उद्योगसमूहाचे चेअरमन आहेत.)