आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चुकीच्या पॉलिसीमधून सुटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवन विमा पॉलिसी घेताना ग्राहकाला त्याबद्दल फारच जुजबी माहिती असते. आयकर वाचवणे हा त्याचा मूळ उद्देश असतो आणि त्याचबरोबर भरलेले हप्ते परत मिळावे अशी इच्छा असते. अशा वेळी ओळखीच्या एजंटला फोन करून, ‘अरे, मला आयकर वाचवण्यासाठी 25 हजार रु.ची गुंतवणूक करायची आहे. त्या अनुषंगाने योग्य अशी पॉलिसी सांगा,’ अशी विचारणा केली जाते. एजंटला इतका फ्रीडम दिला की, तो अजाणतेपणे किंवा जाणूनबुजून (जास्तीच्या कमिशनच्या लोभाने) ग्राहकाच्या दृष्टीने अनुचित अशा एक किंवा अनेक पॉलिसींची शिफारस करतो. या व्यवहारात ग्राहक आणि विक्रेता या दोन्ही पक्षांचे दृष्टिकोन वेगवेगळे असतात. ग्राहकाला जीवन विम्यामध्ये रस नसतो. त्याला टॅक्स वाचवायचा असतो आणि हप्त्यांपोटी भरलेले पैसे परत हवे असतात. विक्रेत्याला कमिशन हवे असते आणि त्याच्यामार्फत विकलेल्या पॉलिसींचा आकडा वाढवायचा असतो. जीवन विम्याचा मूळ उद्देश आणि विम्याच्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर मिळणार्‍या परताव्याचे प्रमाण या गोष्टी दोघांच्या खिजगणतीतही नसतात.
साधारणत: 24 ते 25 व्या वर्षांपासून माणूस नोकरी करायला सुरुवात करतो. स्वत:चे असे पैसे खिशात खुळखुळायला लागल्यानंतरचा उत्साह काही औरच असतो. जानेवारी महिन्यात अकाउंट्स डिपार्टमेंटमधून फतवा बाहेर पडतो. अमुक इतक्या रकमेची गुंतवणूक कर, नाहीतर आयकर कापला जाईल. टीव्हीवर जाहिरातींचा भडिमार चालू असतो. ‘वृद्ध बापाकडे त्याचा साठी पार केलेला मुलगा सिनेमासाठी पैसे मागतो आणि वर गाडीची चावीही मागून घेतो.’ अमुक एक विमा कंपनी ‘झीनत अमानचे एक सदाबहार गाणे एक तरुणी गात असते. लगेचच तिची डुप्लिकेट तिच्याबरोबर ते गाणे गायला सुरुवात करते.’ गॅरंटेड म्हणून एक रबर स्टँप मारला जातो... विमा कंपनी. वर्तमानपत्रांमध्येही अनेक तज्ज्ञ (?) रकानेच्या रकाने भरून वेगवेगळ्या स्कीम्सबद्दल (शब्दांचा अतिशय काटेकोरपणे वापर करून) स्तंभलेखन करत असतात. या सर्व गोष्टींचा सतत भडिमार झाल्यावर ग्राहक जास्त विचार करायच्या फंदात पडत नाही. शिवाय तरुण वयामध्ये विमा पॉलिसीचे विश्लेषण करण्यासारख्या फालतू गोष्टींसाठी वेळही नसतो आणि अशा परिस्थितीत पॉलिसी घेतली जाते. मनी बँकसारखी पॉलिसी असली तर दर वर्षी एक अशा पाच पॉलिसी घेण्याचा सल्ला दिला जातो. 25 वर्षांपर्यंत दरवर्षी एक ठरावीक रक्कम परत मिळण्याची कायमची सोय होते. विमा पॉलिसी कोणाकडून व का घेतली जाते याची नोंद करायचा प्रयत्न केला तर एक ग्रंथ तयार होईल. काही काळानंतर या सर्व पॉलिसीधारकांना स्वत:कडून झालेल्या चुकीची कल्पना येते. फायनान्शियल प्लानर अशा वेळी सर्वसाधारणपणे एकच सल्ला देतात. ‘पॉलिसी सरेंडर करा आणि जे पैसे मिळतील ते दुसर्‍या एखाद्या पर्यायामध्ये गुंतवा.’ सरसकटपणे असा सल्ला देणे चुकीचे आहे. पॉलिसीधारकाने इतर गोष्टींबाबत चौकशी करून सद्य:स्थितीमध्ये त्यातल्या त्यात कमी नुकसानीचा पर्याय काय आहे आणि त्याचबरोबर माझे विम्याचे छत्रही (रिस्क कव्हर) कायम राहणार आहे या अनुषंगाने निर्णय घेणे आवश्यक आहे. बहुतेकांना ‘सरेंडर’व्यतिरिक्त इतर पर्यायांची माहितीही नसते. पॉलिसी सरेंडर केल्यावर एक तर इन्शुरन्स कव्हर जाते. ही गोष्ट अतिशय जोखमीची आहे. दुसरे म्हणजे सरेंडर व्हॅल्यू इतकी कमी असते की, ती रक्कम कोणत्याही ठोस परताव्याच्या पर्यायात गुंतवली तरी झालेले नुकसान भरून निघत नाही.
dilip-samant@yahoo.com