आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य विमा: गुणदोष, अटी, नियम समजून घ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमच्या गरजा, तुमचे बजेट पूर्ण करणारी आरोग्य विमा योजना तुम्ही खरेदी करतात. विविध प्रकारच्या आरोग्य विमा योजना उपलब्ध असून, प्रत्येकाचे काही गुणदोष आहेत. कुटुंबासाठी योग्य योजना दुस-या कुटुंबासाठीही योग्य असेलच असे नाही. त्यामुळे आरोग्य विमा योजना निवडण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.
१. विमा कवच तुमच्या एकट्यासाठी आहे की तुमच्या कुटुंबासाठीही. त्यामुळे विम्याची रक्कम पुरेशी आहे का? तुमच्या कंपनीच्या विमा पॉलिसीअंतर्गत येत आहात का?
जरी तुम्ही आणि तुमचा नवरा अथवा बायको कंपनीकडून मिळणा-या आरोग्य विमा योजनेंतर्गत येत असाल तरी वैयक्तिक आरोग्य विमा घेणे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी गरजेचे असू शकते. कारण तुमच्या कंपनीकडून मिळालेल्या विमाछत्राची रक्कम (सम अ‍ॅश्युअर्ड) पुरेशी असेलच असे नाही. तुम्ही टॉप अप पर्यायाचीही निवड करू शकतात. ज्यात अधिक रक्कम भरून तुमच्या कंपनीकडून मिळणा-या रकमेइतकेच अतिरिक्त संरक्षण तुम्हाला मिळते. परवडणा-या प्रीमियममध्ये हे टॉप अप उपलब्ध असते.
२. कुटुंबासाठी खरेदी करताना विविध पर्याय तपासून पाहा.
त्यात तुम्हाला प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र सम अ‍ॅश्युअर्ड हवी किंवा एकत्र(floater) सम अ‍ॅश्युअर्ड हवी. स्वतंत्र सम अ‍ॅश्युअर्ड पेक्षा एकत्र सम अ‍ॅश्युअर्ड आर्थिकदृष्ट्या अधिक परवडणारी असू शकते, मात्र कमी सम अ‍ॅश्युअर्ड निवडली तर त्याअंतर्गत येणारे संरक्षण कमी असू शकते. काहीवेळा फ्लोटर पॉलिसी निवडताना कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीसाठी स्वतंत्र पॉलिसी घेणे अधिक परवडणारे असू शकते. सर्वसाधारणपणे सर्व विमा कंपन्या विमाधारक, पती अथवा पत्नी आणि दोन मुलांना संरक्षण देणारी एकच िवमा पॉलिसी देतात. काही पॉलिसींमध्ये विमा संरक्षण पॉलिसीधारकावर अवलंबून असलेल्या पालकांनाही पुरविले जाते.
३. आवश्यक सम अश्युअर्ड विचारात घेताना तुमच्या शहरातील वैद्यकीय खर्च आणि महागाईचा त्यावर होणारा परिणामही विचारात घ्या. काळजीपूर्वक निवडलेली सम अश्युअर्ड आणि त्यासोबत मिळणारा बोनस तुमचा वैद्यकीय खर्च ठरावीक मर्यादेपर्यंत भरून काढण्यासाठी पुरेसा असला पाहिजे.
४. पॉलिसीअंतर्गत कशासाठी संरक्षण मिळते आणि कशासाठी नाही हे समजावून घ्या.
पॉलिसी खरेदीपूर्वी त्यात येणा-या आणि वगळण्यात आलेल्या गोष्टींची माहिती घ्या. तुमची विमा योजना कशासाठी संरक्षण देत नाही हे तितकेच किंबहुना अधिक महत्त्वाचे आहे, जितके की कशासाठी तुम्हाला संरक्षण मिळते आणि तुम्ही किती प्रीमियम भरणार आहात. तुम्ही एक सर्वसमावेशक पॉलिसी विकत घेत आहात याची खात्री करा. आरोग्य विम्यांतर्गत दिल्या जाणा-या गोष्टींची पाहणी करताना हे लक्षात ठेवा की तुमचा वैद्यकीय इतिहास हा तुमच्या वैद्यकीय भविष्याची माहिती सांगेलच असे नाही. अशा अनपेक्षित घटनांचा विचार करा आणि तुमच्या प्राधान्यक्रमाची यादी तयार करा.
५. तुमच्या अधिकाधिक गरजा पुरविणारी विमा योजना निवडणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला पॉलिसी अंतर्गत काय हवे उदा. केवळ गंभीर आजारपण, अपघातातून होणारी इजा, सर्व प्रकारचे वैद्यकीय खर्च किंवा ओपीडीचा खर्चही हे तपासून पाहा. िवमा घेताना हे आवर्जून विचारा की केवळ रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा खर्च मिळेल की ओपीडीचाही. जर केवळ गंभीर आजारांसाठी संरक्षण मिळणार असेल तर कुठले गंभीर आजार विम्याअंतर्गत आहेत हे तपासून पाहा आणि तुमच्या जीवनशैलीनुसार गरजेचे असलेले खरेदी करा.
६. तुमच्या आरोग्य विम्यामध्ये न येणा-या गोष्टींची यादी पडताळून पाहा. कायमस्वरुपी आणि ठरावीक कालावधीसाठी असणा-या दोन्ही गोष्टींची यादी तपासून घ्या. विम्यात न येणा-या गोष्टींमध्ये आजारांचे विश्लेषण आणि कोणत्या परिस्थितीमध्ये आरोग्य विम्याचे कव्हर मिळणार नाही याची माहिती दिलेली असते. उदा. सर्वसाधारणपणे कॉस्मेटिक सर्जरी आरोग्य विम्यामधून वगळलेली असते. अशाप्रकारच्या सर्जरी आवश्यकच असतात असे नाही मात्र पेशंटच्या आग्रहास्तव केल्या जातात. विमा योजनेच्या सुरुवातीच्या कालावधीत (प्रतीक्षा कालावधी) बहुतांश विमा कंपन्या तुम्हाला आधीपासून असलेल्या आजारांसाठी संरक्षण देत नाहीत. पॉलिसीधारकाने काही वर्ष सातत्याने पॉलिसी ठेवल्यावर पूर्वीपासून असलेल्या आजारांसाठी संरक्षण दिले जाते. इतर कायमस्वरुपी वगळण्यात आलेल्या गोष्टींमध्ये गर्भारपणातील खर्च (कंपनीकडून दिल्या जाणा-या आरोग्य विम्यामध्ये बहुतांशवेळा गर्भारपणातील खर्च समाविष्ट असतात) किंवा लसीकरण किंवा साहसी खेळातून होणा-या दुखापती किंवा एड्ससारख्या आजारांवर होणारा खर्च यासारख्या काही गोष्टींचा समावेश असतो.
७. प्रीमियम समजावून घ्या - आरोग्य विमा खरेदी करण्यापूर्वी तुम्ही भरणार असलेली रक्कम आणि तुम्हाला मिळणारे संरक्षण याची तुलना करून पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे. योग्य किमतीमध्ये सर्वसमावेशक संरक्षण पुरविणारी योजनाच योग्य असते. किमतीची तुलना पॉलिसीच्या वैशिष्ट्यांशी करा केवळ दोन कंपन्यांमधील किंमतीची एकमेकांशी तुलना करू नका. तसेच को-पेमेंट पर्याय उपलब्ध आहे का हे तपासून पाहा ही चांगली कल्पना असू शकते कारण यामुळे प्रीमियमचा दर मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
८. पॉलिसीच्या अटी नीट समजावून घ्या जेणेकरून नंतर आश्चर्य वाटणार नाही. विमा एजंट हा विमा योजनेचे बारकावे समजावून घेण्यासाठी उत्तम मार्गदर्शक ठरू शकतो. विमा योजना खरेदी करण्यापूर्वी तुमच्या शंका किंवा तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याविषयी अजिबात लाजू नका.
हॉस्पिटल नेटवर्क समजावून घ्या
तुमच्या विमा पॉलिसीअंतर्गत येणा-या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये तुमच्या शहरातील चांगली हॉस्पिटल आहेत ना आणि तुमच्या घरापासून योग्य अंतरावर ती आहेत ना, हे तपासून घ्या. यामुळे तुम्हाला कॅशलेस सोयीचा उपयोग करून दर्जेदार उपचार करून घेता येतील.
नूतनीकरणाच्या अटी आणि नियम समजावून घ्या
अचानक उद्भवणा-या वैद्यकीय गरजांसाठी वैद्यकीय विमा घेणे आणि त्याचे नूतनीकरण करण्याचे फायदे प्रत्येकाला पुरेशा प्रमाणात लक्षात येतीलच असे नाही. विमा योजनेसाठीचा वेटींग कालावधी केवळ पॉलिसीचे सातत्याने नूतनीकरण केले तरच कमी होतो हे लक्षात घेतले पाहिजे आणि सातत्याने नूतनीकरण केले मात्र विम्यांतर्गत दावा नाही केला तर कमाल मर्यादा ध्यानात घेऊन बोनसही दिला जातो.