आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत आणि अमेरिकेच्या पतधोरणाची कारणमीमांसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत आठवडा भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत घटनात्मक होता. अर्थव्यवस्थेला चिंतातुर करणारी चिन्हे निदर्शनास आली. जसे की, ग्राहक आणि घाऊक महागाई दरामध्ये वाढ आणि औद्योगिक निर्देशांकात घट झाली. यामुळे आरबीआय आपल्या पतधोरणात व्याजदर पुन्हा वाढवणे अपेक्षित होते; परंतु महागाई दरात अन्न व निगडित गोष्टींच्या भावातील फरकामुळे वाढ झाली व मागील पतधोरणांमध्ये घेतलेल्या निणर्यांमुळे पुढे ते आटोक्यात येतील, अशी आशा असल्याचे कारण देत रघुराम राजन यांनी विकासगती वाढावी म्हणून व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घोषित केला आणि बाजाराला सुखद धक्का दिला.
अमेरिकेच्या 75 अब्ज डॉलर्स बाँड खरेदीमुळे गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊ नये :
दुसरीकडे, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत प्रगती होत असल्याने तेथील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हचे मावळते अध्यक्ष बेन बर्नान्के यांनी तेथील अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याकरिता चालू असलेल्या दर महिना ८5 अब्ज अमेरिकन डॉलर बाँड खरेदी कार्यक्रमामध्ये बदल करून तो ७5 अब्ज अमेरिकन डॉलर दर महिना करत असल्याचे घोषित केले. यामुळे जगभरातील विकसित देशांच्या भांडवली बाजारांमध्ये उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले; पण त्याच वेळी भारतासारख्या विकसनशील देशांच्या बाजारातून विदेशी भांडवल तरलता कमी होण्याच्या भीतीने शेअर बाजार गडगडला. डॉलरची पत जगभरात वधारली. खरे पाहता, अमेरिकेने जरी बाँड खरेदी ७5 अब्ज अमेरिकन डॉलर्स प्रतिमहिना केला असला, तरी पुढील काळात तो आणखी कमी करण्याचा निर्णय अर्थव्यवस्थेत आणखी सुधार झाला तरच घेण्यात येईल, असेदेखील बेन बर्नान्के यांनी सांगितले आणि तेव्हाही टप्प्याटप्प्याने बाँड खरेदी कमी करण्यात येईल, असेच अपेक्षित आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरून न जाता भारतीय अर्थव्यवस्थेत आपला विश्वास असाच कायम ठेवावा. कारण आज न उद्या हा कार्यक्रम अमेरिका बंद करेल हे निश्चित आहे.
chaitanyavwangikar@gmail.com