उत्साह, कठोर परिश्रम अन् स्वप्न पाहण्याची ऊर्मी ज्याच्यात असते त्याला यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची गरजच भासत नाही. ही त्रिसूत्रीच सर्व यशोशिखरे पादाक्रांत करवत तुम्हाला आयुष्यात यशस्वी बनवते हे उद्गार आहेत कामगाराचा कंपनी मालक बनलेल्या भगवान राऊत यांचे. घरात अठराविश्व दारिद्र्य त्यामुळे जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण घेता आले. तरीही नाऊमेद न होता मिळेल ते काम करत ५ रुपये रोजाने कामगाराची नोकरी स्वीकारली पण मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करीत ते आज पाच कोटींच्या उलाढालीपर्यंत पोहोचले आहेत. वयाच्या ४५ व्या वर्षी चिकलठाणा वसाहतीत पाच कंपन्या आहेत.
* नेवासा ते औरंगाबाद : भगवान राऊत हे मूळचे शेवगाव तालुक्यातले घेवरी चांदगाव, पण हे गावच जायगावाडी धरणात गेल्याने शेती गेली अन त्यांच्या आई-वडिलांवर उपासमारीची वेळ आली. वडील सारंगधर अन् आई प्रयागाबाई खचले नाहीत. मामाच्या गावी नेवासा येथे ते आले. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेच हे गाव.याच गावात भगवानसह त्याच्या पाचही मुलांसह ते उदरनिर्वाहासाठी आले. तेथे सारंगधर यांनी सुतारकाम सुरू केले. मुलंही याकामी त्यांना मदत करीत लहानासा भगवान सातवीपासूनच सुतार कामात तरबेज झाला. बाजारात जाऊन लाकडं विकत घ्यायची. शाळेत जायच्या आधी चार खिडक्यांच्या चौकटी अन् चार दरवाजे तयार करुन तो वडिलांना मदत करी. त्याच गावच्या बाजारात. सायकलचे पंक्चर काढणे, बेल-फूल विक्रीचे कामही भगवान करीत असे. दहावी पास झाल्यावर मामा गणपत मोरे यांनी औरंगाबादला पाठवलं.
*कामगार म्हणून एक तप नोकरी...
दहावी पास होताच औरंगाबादला मामांच्या ओळखीने भगवान स्वगत इंजिनिअरिंगमध्ये हेल्पर पदावर पाच रुपये रोज पगाराने १९८३ साली नोकरीला लागले. ती कंपनी त्यांचे नातेवाईक आगलावे व अर्जुन गायके यांची होती. तरीही काम करुन मोठं व्हायच हे स्वप्न असल्यानं महिन्याकाठी ५८ दिवस कामाचा विक्रम भगवानने करुन दाखवला. दररोज १७ ते १८ तास काम लेथ मशीनवर छोटा भगवान करीत असे. ते करताना त्याला वाटे
आपलाही असाच कारखाना असावा. पण ते स्वप्न साकार व्हायला तब्बल बारा वर्षे लागली.
* लेथ मशीन ठरली कामधेनू..
लेथ मशीन ही इंजिनिअरिंग क्षेत्रातली कामधेनू आहे, असे भगवान राऊत म्हणतात. या मशीनवर ज्याची कमांड त्याला जगभर डिमांड हेच ब्रीद त्यांचे आहे. ही मशीन घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करावा, असे स्वप्न भगवानने नोकरीच्या अगदी सुरुवातीलाच पाहण्यास सुरुवात केली. पण जवळ पैसे नव्हते. चार रुपये रोजात काय होणार पण त्यातूनही बचत करीत तब्बल बारा वर्षांनंतर १९९२ साली भगवानने ६५ हजार रुपयांची लेथ मशीन घेतली. १० हजार रोख अन बाकीचे पैसे हप्त्याने दयायचे ठरले.तरीही दोन वर्षे नोकरी सुरुच होती.मनाचा पक्का निर्धार करुन १९९४ साली नोकरी सोडली.अनेक व्हेंडर भगवानला चांगले ओळखत त्यामुळे त्यांने एकेका मालकाला मशिन समोर नारळ फोडण्यासाठी मान देऊन बोलावले प्रत्येक मालकाने एक-एक ऑर्डर दिल्याने.भगावानने चिकलठाण्यातच पत्र्याचे शेड भाड्याने घेतले.एक मशिन,एक कामगार घेऊन व्यवास सरु केला पण वर्षभरात ही जागा कमी पडू लागली प्रचंड ऑर्डर चा ओघ सुरु झाला कारण बारा वर्षाच्या तपशचर्येत भगवानने सर्वच मालकांसह मोठ- मोठ्या लोकांशी अत्यंत चांगले संबंध प्रस्थापीत केले होते.
ऑटोमोगलने दिला ब्रेक...
१९९४ मध्ये ऑटोमोगल या मोठ्या कंनीने मोठे काम दिले. महिन्याला सात ते आठ हजार गिअर बॉक्स बनवण्याचे कंत्राट होते. ते काम मिळाल्याने कामगार वाढले. जागाही अपुरी पडी लागल्याने स्वत:चे युनिट उभारण्याची वेळ आली आहे हे भगवानच्या पटकन लक्षात आले.त्यांनी तत्काळ १२०० चौ.फुटांचे रेडिमेड शेड व बाजूलाच ७ हजार चौ. फुटांचा प्लॉट घेतला. या युनिटला त्यांनी आईचे नाव दिले प्रयाग इंजिनिअरिंग. मग भगवानने कधीच मागे वळून पाहिले नाही.
दुसरा ब्रेक फोर्ब्जने दिला...
जगन्मित्र असलेला भगवान यांचा स्वभाव व कामाची पध्दत खूप आवडल्याने त्यांना १९९८ साली प्रचंड ऑर्डर मिळायला सुरुवात झाली. हे युनिटही कमी पडू लागले. फोर्ब्ज कंपनीने खूप मोठे काम दिले. गेल्या पंघरा वर्षांपासून देशातील सर्व प्लान्टचे भगवान हे मोठे व्हेडर आहेत. या कंपनीचे काम मिळताच दुसरे युनिट के सेक्टरमध्ये चिकलठाण्यातच बांधले. त्यांनतर भगवान यांच्या प्रगतीचा वेलू गगनावर गेला. कारण १९९८ ला तिसरे व चौथे युनिट शेंद्र्यात बांधले. यात कोणार्क इंडस्ट्रीजचे हेमंत गोरे हे मित्र पार्टनर आहेत. या युनिटचे नाव विजय-कोणार्क आहे, तर पाचवे युनिट हे इन्फोटेक च्या रूपाने सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क येथे बांधले तेथे मुकुंद मांगूळकर या मित्रासोबत पार्टनरशिप केली.
८० कामगार
आज भगवान राऊत यांच्या पाच कंपन्यांत ८० कामगार आहेत इन्फोटेक कंपनीत ८० मुलांना रोजगार उपलब्ध करुन दिलाय. पाच रुपये रोजावरुन ते आज पाच कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोहोचले आहेत.
मित्र नावाच्या विद्यापीठात पीएचडी
भगवान यांचे शिक्षण जरी कमी असले तरी उच्चशिक्षित मित्रांच्या सहवासाने पीएचडी इतके ज्ञान दिले. यात औरंगाबादहून नुकतेच पुण्याला बदलून गेलेले पोलिस आयुक्त संजय कुमार, जिल्हा परिषद सीईओ झालेले डी.एम.मुगळीकर, गरवारेचे अनिल भालेराव, मामा तुळशीराम रणमले, उद्योजक एस.के.चौधर, प्रा.यु.व्ही. पांचाळ, अॅड.सी.के. शिंदे, के.बी. गवळी, छबुराव आगलावे मामा यांच्यासह असंख्य मित्रांचे आशीर्वाद मिळाल्यानेच इथवर आलो, अशी प्रांजळ कबुली ते देतात.