आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोन्याची मागील कामगिरी लक्षात घेऊन त्यात गुंतवणूक करणे, तसेच रिअल इस्टेट व इक्विटीत याच सूत्राआधारे केलेली गुंतवणूक चुकीची ठरू शकते. एकदा हात पोळल्यानंतर गुंतवणूकदार पुन्हा त्या साधन श्रेणीकडे (असेट क्लास) वळत नाहीत. माहिती आणि जागरुकतेचा अभाव हे यामागचे प्रमुख कारण आहे. मात्र, जेव्हा गुंतवणुकीची दिशा, उद्दिष्ट ठरलेले नसते तेव्हा अशा स्वरूपाच्या चुका होतात. परताव्यासाठी गुंतवणूक करणे योग्य नाही कारण त्याची काही मर्यादा ठरलली नसते. त्यामुळे गुंतवणूकदार जास्तीत जास्त नफा कमावण्याच्या मागे लागलेला असतो. अशावेळी गुंतवणुकीच्या मूलभूत नियमांना फाटा दिला जातो. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करताना त्या साधनाची सखोल माहिती घ्यायला हवी. त्या साधनाचे विश्लेषणात्मक गणित मांडायला हवे. यामुळे ते गुंतवणूक साधन किती टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकते याची कल्पना येते आणि कालांतराने येणारे नैराश्य टाळता येते. आता आपण विविध गुंतवणूक साधनांत गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी, काय अपेक्षा ठेवाव्यात आणि का हे जाणून घेऊ...
1) इक्विटी : दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवण्याचे साधन म्हणून इक्विटीकडे पाहिले जाते. या साधनात चढ-उतार जास्त असतात. त्यामुळे अनेकदा यातून कमी परतावा मिळतो. मात्र जेव्हा इक्विटी बाजार उत्तम कामगिरी बजावतो तेव्हा मागचे सारे नुकसान भरून देतो. मात्र, बाजाराच्या अल्प काळातील तेजीला भुलून तशा प्रकारच्या परताव्याची अपेक्षा करत गुंतवणूक केली तर ते चुकीचे ठरू शकते. भूतकाळाचा विचार केल्यास इक्विटी बाजाराने दीर्घकाळासाठी 15 टक्क्यांच्या आसपास परतावा दिला आहे. त्या हिशेवाने या साधनातून 12 ते 15 टक्के परताव्याची अपेक्षा करण्यास हरकत नाही.
2) सोने : भारतीयांना सोने अत्यंत प्रिय आहे, मात्र गुंतवणुकीसाठी नव्हे तर दागिन्यांसाठी. या साधनाशी भावनिक नाते असते. मात्र गेल्या काही वर्षात सोन्याने 25 टक्क्यांहून जास्त परतावा दिला आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणा-यांचे प्रमाण वाढले आहे. दीर्घकाळाचा विचार केल्यास सोन्यातील गुंतवणुकीने 9 ते 10 टक्के परतावा दिला आहे. वाढत्या महागाईच्या तुलनेत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आदर्श मानले जाते. त्यामुळे हा परतावा योग्य मानला जातो.
3) रिअल इस्टेट : घरांच्या सातत्याने वाढत्या किमती पाहून अनेक गुंतवणूकदार या साधनाकडे आकर्षित होत आहेत. त्यासाठी ते आपली आयुष्यभराची कमाई लावण्यास तयार असतात. मात्र किमती सातत्याने वाढतच राहतील याची कोणीही हमी देऊ शकत नाही. यात नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. तसेच एकाच वेळी एकरकमी मोठी गुंतवणूक होत असल्याने जोखीम वाढते. दीर्घकाळाचा विचार केल्यास यापासून मिळणारा परतावा इक्विटीच्या तुलनेत जास्त नसतो.यातील नकारात्मक बाबी लक्षात घेतल्या तर केवळ परताव्यासाठी या साधनात गुंतवणूक करणे योग्य नाही.
4) फिक्स्ड इन्कम पर्याय : ठरावीक मुदतीच्या (फिक्स्ड) आणि सुरक्षित साधनात गुंतवणुकीकडे सर्वांचा कल असतो. मात्र, गेल्या काही वर्षांत फिक्स्ड इन्कम श्रेणीत काही बदल झाले आहेत. त्यामुळे हा पर्याय निवडण्यापूर्वी आकडेमोड करून गणित मांडावे लागते. अल्पबचत आता फिक्स्ड राहिली नाही. डेट म्युच्युअल फंड पुन्हा चांगला परतावा देतील याची शाश्वती नाही. यात अनेक प्रकार असतात, ज्यांची कामगिरी व्याजदरांशी निगडित असते. त्यामुळे एक गुंतवणूकदार म्हणून वारंवार डेट पोर्टपोलिओचा आढावा घ्यावा लागतो. त्यानंतरच या साधनांतून चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा करावी.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.