आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Investment In Mutual Fund By Jitendra Solanki

गुंतवणुकीसाठी योग्य म्युच्युअल फंडाची निवड कशी करावी ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. याद्वारे छोटे गुंतवणूकदार विविध गुंतवणूक श्रेणींमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकतात. यात डायव्हर्सिफिकेशन, प्रोफेशनल मॅनेजमेंट आणि लिक्विडिटीची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची असते. सध्याच्या काळात 30 हून अधिक अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्या (एमएमसी) आणि म्युच्युअल फंडाच्या एक हजाराहून अधिक योजना बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे योग्य निवड करणे ग्राहकासाठी आव्हानात्मक ठरते. जागरूकतेचा अभाव आणि एएमसी डिस्ट्रिब्युटरमुळे अनेकदा गुंतवणूकदार चुकीच्या योजनांची निवड करतात. चांगल्या योजनेची निवड करून चांगला परतावा मिळावा, यासाठी संशोधनावर भर द्यावा लागतो. त्यासाठी खालील मुद्द्यांचा विचार करणे गरजेचे ठरते.
1. ध्येय निश्चित करा : आपले ध्येय निश्चित करणे हे, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. ध्येय निश्चित केल्याने कालावधीचा अंदाज येतो. त्यामुळे योग्य गुंतवणूक श्रेणीची निवड करण्यास मदत मिळते. उदाहरणार्थ, मुलांच्या भविष्यासाठी किंवा निवृत्तीनंतरची तरतूद अशा दीर्घकालीन ध्येयासाठी 15 ते 30 वर्षांचा कालावधी असतो. अशा वेळी इक्विटीसारख्या श्रेणीत गुंतवणूक करू शकता. पण तेच ध्येय जर 2 ते 3 वर्षांचे असेल तर एफएमपी, एफडी, एमआयपी हे चांगले पर्याय ठरतात.
2. परतावा : अनेकदा गुंतवणूकदार टॉप परफॉर्मिंग स्कीमच्या 1-2 वर्षांतील परतावा पाहून त्याकडे आकर्षित होतात; पण भविष्यातही त्या स्कीममधून तेवढात परतावा मिळेल याची शाश्वती नसते. जेव्हा आपण परताव्याचा विचार करतो, तेव्हा दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. पहिली म्हणजे, कन्सिस्टन्सी (सातत्य) आणि दुसरी म्हणजे डाऊनसाइट प्रोटेक्शन. 2000 च्या मोठ्या घसरणीच्या
काळातही ज्या योजना टिकून राहिल्या, त्या चांगल्या योजना ठरू शकतात. एचडीएफसी टॉप 200, बिर्ला सनलाइफ फ्रंटलाइन इक्विटी आणि डीएसपीबीआर टॉप 100 इक्विटी याही अशाच काही योजना आहेत, तर दुसरीकडे जेएम म्युच्युअल फंडाच्या कामगिरीवर मोठा परिणाम झाला होता.
3. आर्थिक गुणोत्तर : म्युच्युअल फंडाच्या योजनेच्या फॅक्ट शीटमध्ये मध्ये मिळणारे अनेक आर्थिक प्रमाण आहेत. हे प्रमाण म्युच्युअल फंडाच्या योजनेचे काही प्रमाणात विश्लेषण करतात. उदाहरणार्थ, आपल्या योजनेची कामगिरी तिचे बेंचमार्क/इंडेक्सच्या तुलनेत कसे असेल, याची माहिती बीटापासून मिळते. स्टँडर्ड डेव्हिएशनद्वारे म्युच्युअल फंड योजनेतील धोक्यांंची माहिती मिळू शकते. शार्प रेशोद्वारे कोणत्याही योजनेच्या रिस्क
अ‍ॅडजस्टेट रिटर्नच्या बाबतीत माहिती मिळते, तर पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशोद्वारे कोणत्याही फंडात पोर्टफोलिओमध्ये किती फेरबदल झाले हे लक्षात येते. हे रेशो समजण्यासाठी अवघड असले, तर तुम्ही त्यासाठी चांगल्या फायनान्शियल अ‍ॅडव्हायझरची मदत घेऊ शकता.
4. खर्चाचे प्रमाण : हेही एक महत्त्वाचे प्रमाण आहे. म्युच्युअल फंड योजनांद्वारे आपल्याला जो परतावा मिळतो त्यावर रेशोचा परिणाम होतो. आपल्याला पैशांचे नियोजन करण्यासाठी दरवर्षी कोणत्या फंडात किती गुंतवणूक करावी लागेल, हे त्यावरून समजते. ही रक्कम मॅनेजमेंट फीस, एजंट कमिशन, रजिस्ट्रार फीसच्या रूपात घेतली जाते. उदाहरणार्थ, जर तुम्ही 1.5 टक्के एक्सपेन्स रेशो असणा-या एखाद्या फंडात 10 हजार रुपये गुंतवत असाल तर तुम्हाला 8.5 टक्के परतावा मिळू शकेल. मोठ्या कालावधीत यात वाढ झाली तर परतावा नष्ट होण्याचीही शक्यता असते.
5. फंड मॅनेजर : म्युच्युअल फंडाद्वारे कोणत्या समभागांमध्ये गुंतवणूक करावी हे फंड मॅनेजर ठरवतात. अशात फंड मॅनेजरची एंट्री आणि एक्झिटमुळेही अनेकदा चांगल्या योजनांच्या कामगिरीवर परिणाम होतो. जेएमएम म्युच्युअल फंड हे याचे अत्यंत चांगले उदाहरण आहे. या फंडाने फंड मॅनेजर संदीप सबरवाल यांच्यावर विश्वास दाखवला. त्यांच्यामुळे स्कीम वरच्या श्रेणीत आली होती; पण त्यांच्या जाण्याने पुन्हा घसरण होण्याचा अंदाज लावला जात आहे. चांगल्या काळातही घसरणा-या बाजारात फंड मॅनेजरचा ट्रॅक रेकॉर्ड कसा होता, याचा अभ्यास करायला हवा.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.
jp.solanki@dainikbhaskargroup.com