आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Pornima Shirsikar By Santosh Kale, Divya Marathi

ऑनलाइन शेअर मार्केटिंग विश्वातली स्वयंसिद्धा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘हिंग्लिश विंग्लिशमध्ये मोठ्या धडपडीने गुपचूप इंग्लिश शिकून सर्वांवर छाप पाडणारी श्रीदेवी तुम्हाला नक्कीच आठवत असेल. अशा श्रीदेवी आजही अनेक आहेत, फक्त त्या नजरेसमोर येत नाहीत. पौर्णिमा शिरीसकर या तरुणीचा प्रवासही श्रीदेवीच्याच पावलावर पाऊल टाकणारा म्हणता येईल. वैवाहिक जबाबदा-यांमुळे वकील होण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. पण कधी काळी संगणकाचे गमभन ही माहीत नसलेली पौर्णिमा ऑनलाइन शेअर मार्केट ट्रेडिंग आणि कार्यशाळा या आगळ्यावेगळ्या व्यवसायात टॉपवर आहेत. इतकेच नाही तर शेअर बाजारात महिन्याला 50 हजार रुपयांचा नफा मिळवल्याचे लक्ष्य साध्य केल्याबद्दल ‘बेस्ट वूमन आंत्रप्रेन्युअर’ पुरस्काराच्याही त्या मानकरी ठरल्या आहेत.


रुईया महाविद्यालयात 12 पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या 32 वर्र्षांच्या पौर्णिमा शिरीसकर यांचे वकील बनण्याचे स्वप्न होते. सरकारी विधी महाविद्यालयात शिक्षण सुरू असतानाच त्यांचे लग्न झाले. मुलापेक्षा मुलीने जास्त शिकणे सासरकडच्यांना मान्य नव्हते त्यामुळे शिक्षणाशी संबंध तुटला. तरी शिकण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. गरोदर असताना पुन्हा प्रवेश घेऊन कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाली. पण मूलबाळ - संसारामुळे पुन्हा घोडे अडले. पौर्णिमाचे पती घरातली एकमेव कमावणारी व्यक्ती असल्याने त्यांना आपला पगार आई-वडिलांच्या हाती द्यावा लागायचा. पतीला उत्पन्नाची जोड देण्याची गरज आणि आपल्याबरोबरच्या मैत्रिणी शिकून पुढे गेल्याची हुरहूर त्यांना सतावत होती. काही तरी कोर्स करायची जिद्द मनात होती पण आर्थिक परिस्थिती पुरेशी नव्हती. अखेर मल्टी लेव्हल मार्केटिंगसारखे उद्योगही करून पाहिले पण त्याचा फायदा झाला नाही. दीर्घकाळ उत्पन्न देण्याचे साधन शोधताना त्यांच्या भावाने ऑनलाइन शेअर मार्केटिंग करून घरबसल्या कमाई करण्याची आयडिया दिली. ही वेगळी संकल्पना पौर्णिमाला आवडली.


ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शेअर बाजाराच्या बातम्या बघणे, सेमिनार्सला जाणे, रोजचा एक तास फक्त शेअर बाजार जाणून घेण्यासाठी देणे. दरम्यान, पैशाची जमवाजमव करून संगणक घेतला आणि धडेही गिरवले. डिमॅट खाते उघडून थोडे थोडे शेअर्स खरेदी करणे आणि विकणे असा क्रम दोन वर्षे सुरू होता. शेअर बाजार म्हणजे जुगार या मानसिकतेमुळेही अडचणी आल्या. पण मॉल, सुपरमार्केटमध्ये गुजराती, मारवाडी मंडळींची संख्या जास्त का असते याचा अभ्यास केला असता ते शेअर मार्केटमध्ये जास्त सक्रिय असतात हे तिच्या लक्षात आले. मग आपण मागे का? या ध्येयातून दरदिवशी शंभर रुपये कमण्यासाठी तिने एक स्ट्रॅटेजी स्वत:च तयार केली व ती यशस्वी होऊन रोज शंभर रुपये फायदा होऊ लागला.


बॉर्न टू विन : एका महिन्यात तिने 50 हजार कमावले
दीर्घकालीन उत्पन्न मिळवण्याचे खरे ध्येय पौर्णिमाला गवसले ते बॉर्न टू विन, च्या मोटिव्हेशनल सेमिनारमधून. बदलत्या राहणीमानामुळे वाढलेल्या गरजा, मुलाबाळांचे शिक्षण एकट्याच्या जिवावर होणे शक्य नव्हते. त्यामुळे बॉर्न टू विनच्या अभ्यासक्रमात पौर्णिमाने ‘तेजी असो वा मंदी नफा हवाच, तोही महिन्याला 50 हजार’ हाच आपल्या ध्येयपूर्ती प्रकल्पाचा विषय निश्चित केला. शेअर बाजारातील व्यवहाराबद्दल बाहेर मिळणा-या प्रशिक्षणातील पुस्तकी ज्ञान व प्रत्यक्ष व्यवहार यात मोठा फरक असल्याने त्यांनी ध्येयपूर्तीसाठी अभ्यास करून आखणी केली. बाजारात कितीही तेजी असली तरी दिवसाला 1000 रुपये मिळाल्यावर ट्रेडिंग बंद हे सूत्र कसोशीने पाळले. आश्चर्य म्हणजे एका महिन्यात तिने 50 हजार कमवून दाखवले. या ध्येयपूर्तीबद्दल बॉर्न टू विन कडून बिझनेस आंत्रप्रेन्युअर पुरस्कार दिला. नियोजनबद्ध मेहनतीची ही पहिली पोचपावती होती.


ज्ञानदान, महिलांसाठी वर्कशॉप
या सर्व यशस्वी स्ट्रॅटेजी शेअर करण्यासाठी पौर्णिमाने एक छोटेसे व्याख्यान द्यावे अशी गळ विद्यार्थ्यांनी घातली. मंचावर जाऊन कधीच बोलण्याची सवय नसूनही त्यांना भरघोस प्रतिसाद मिळाला. येथूनच तिच्या शेअर मार्केट वर्कशॉप या नव्या वाटचालीला सुरुवात झाली. कारण या अभ्यासक्रमात ‘मी काही तरी दान करेन’ असा संकल्पही तिने सोडला होता. त्यामुळे पैसा नसला तरी ज्ञानदानाच्या रूपाने महिलांना घरी बसल्या बसल्या उत्पन्न मिळवून देण्यासाठी वर्कशॉप सुरू केला. यामध्ये दहावी झालेल्या, संगणक न येणा-यापासून ते अगदी एमबीए झालेल्या महिलांचा समावेश होता.


सुरुवातीला संख्या कमी होती. पण आतापर्यंत पौर्णिमाने जवळपास 35 महिलांना उत्पन्नाचा ऑनलाइन मार्ग दाखवला असून त्या चांगली कमाई करीत आहेत. विशेष म्हणजे पुरुषांची संख्या जास्त आहे. अगोदर शेअर बाजाराचे ज्ञान मिळवा, डिमॅट खाते उघडा मग पेपर ट्रेडिंग करा, त्यातून आलेल्या अनुभवांचा अभ्यास करा, ऑनलाइन व्यवहार कसे होतात हे नुसते न्याहाळा आणि मग प्रत्यक्ष शेअर बाजार व्यवहारांना सुरुवात करा. नफाच झाला पाहिजे या विचाराने व्यवहार करा ही पौर्णिमाच्या कार्यशाळेची सूत्रे आहेत. बरं नुसती सूत्रेच न देता प्रत्येकाला येणा-या अडचणींचा मागोवाही त्या ठेवतात.


महिलांना मार्केटिंगची दिशा दाखवणे, बॅँक खाते उघडण्यास प्रोत्साहित केले
नुसतेच शेअर ट्रेडिंग नाही तर आपल्या आईच्या सावित्रीबाई फुले संस्थेच्या माध्यमातून महिलांना बॅँक खाते उघडण्यासाठी प्रोत्साहित करणे, महिलांमधील सुप्तगुणांना वाव देऊन त्यांना मार्गदर्शन करणे तसेच त्यांना मार्केटिंगची दिशा दाखवण्याचे कामही त्या करीत आहेत. पौर्णिमा म्हणते, आज पदापेक्षाही तुम्हाला महिन्याचे उत्पन्न किती मिळते हे महत्त्वाचे झाले आहे. मला वकील होता नाही आले पण त्या वेळी गरज म्हणून पैसा कमावणे हे माझे उद्दिष्ट होते. ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून मी एका वेगळ्या व्यवसायात यशस्वी झाले.
पौर्णिमा शिरीसकर,
मुंबई. बिझनेस पार्टनर, मनी लिशियस कॅपिटल प्रा.लि. (‘बेस्ट वुमन आंत्रप्रेन्युअर’ पुरस्कार)
kalesantosh70@gmail.com