आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार: युलिप्समध्ये गुंतवणूक का करावी?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेअर बाजाराने नुकतीच घेतलेली उसळी आणि केंद्रीय अर्थसंकल्पात डेट म्युच्युअल फंडांच्या कर आकारणीच्या नियमांमध्ये झालेल्या बदलांमुळे युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लान्स (युलिप्स) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या ७-८ वर्षांमधला युलिप्सचा प्रवास तसा खडतरच म्हणावा लागेल. २००५-०७ मध्ये शेअर बाजारात सर्वाधिक लोकप्रिय असणारे युलिप्स गेल्या काही वर्षांत ‘अस्पृश्य’ बनले होते. युलिप्सच्या योग्यतेबाबत आणि त्याच्याशी निगडित खर्चाबाबत गुंतवणूकदारांच्या मनात अनेक शंका होत्या, जे एका अर्थाने स्वाभाविकच होतं.
अनेक गुंतवणूकदारांनी तर युलिपला आपल्या पोर्टफोलिओमध्ये स्थानच ठेवलं नव्हतं. युलिप्सचं मूल्यांकन करणारा योग्य मार्ग गुंतवणूकदार शोधत आहेत आणि युलिप्सची तुलना ते म्युच्युअल फंडसारख्या इतर आर्थिक उत्पादनांबरोबरही करत आहेत. युलिप्सबद्दलचं गुंतवणूकदारांचं ज्ञान वाढवण्यास आणि युलिप आपल्यासाठी सुयोग्य आहे की हे ठरवण्यास, आणि तसं असल्यास योग्य युलिपची निवड कशी करावी याबाबतचे मार्गदर्शन...
अ) दीर्घ मुदतीचा करार :
समभागांचा खरा फायदा तेव्हाच होतो जेव्हा त्यात दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली जाते आणि दीर्घ मुदतीत इतर कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा समभागांमधली गुंतवणूक सर्वोत्तम परतावा देते याचे अनेक पुरावे गतकाळात सापडतील. युलिप गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीच्या करारात (एसआयपीपेक्षा चांगल्या) बद्ध करते आणि अप्रत्यक्षरीत्या गुंतवणूकदाराला समभागांच्या दीर्घकालीन मूल्याची शिकवण देते.
ब) कराचे फायदे :
मुदतीच्या पूर्ततेनंतर युलिपमधून मिळणारं उत्पन्न करमुक्त (पॉलिसी कव्हर वार्षिक प्रीमियमच्या १० पट असल्यास) असतं शिवाय त्याला गुंतवणूक केल्याच्या वर्षात ८० सीअंतर्गत (१.५ लाखांपर्यंत) कर वजावटही मिळू शकते.
क) खर्च:
युलिप्स त्यांच्या चढ्या आणि अपारदर्शक खर्चासाठी बदनाम आहेत. नियमांमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या बदलांमुळे युलिप्सचा खर्च ब-यापैकी माफक बनला आहे आणि समकक्ष म्युच्युअल फंडांमध्ये येणा-या खर्चांपेक्षा तो कमी नसला तरी किमान तो त्यांच्याएवढा तरी आहे. युलिप खंड केल्यास आकारलं जाणारं शुल्कही मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आलं आहे.

ड) कर्ज: युलिप हे दीर्घ मुदतीचं उत्पादन आहे तसंच दीर्घकाळापर्यंत राखून ठेवल्यास ते सर्वोत्तम परतावा देत असलं तरी ते काही प्रमाणात लिक्विडिटीही देतं. त्यामुळे युलिप गुंतवणुकीसमोर कर्जही​ घेता येतं. युलिपचे बरेच फायदे असले तरी ते सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेतच असं नाही. या उत्पादनाचं स्वरूप दीर्घकालीन असल्याने अल्पकालीन लिक्विडिटी अपेक्षित असणा-या गुंतवणूकदारांसाठी ते योग्य ठरणार नाहीत. युलिप गुंतवणूकदाराला एका विशिष्ट इन्शुरन्स कंपनीशीही जोडतं.
(लेखक हे एमडी आणि सीईओ, एडलवाइज टोकियो लाइफ इन्शुरन्स आहेत)