आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Share Market By Udya Kulkarni, Divya Marathi

उच्चतम व न्यूनतम शेअरची भाव मर्यादा (सर्किट ब्रेकर्स)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक शिस्तीसाठी शेअरचा भाव किती वाढू द्यायचा आणि किती घसरू द्यायचा यावरही मर्यादा हवी. यासाठीच स्टॉक एक्स्चेंजतर्फे भाव मर्यादा म्हणजे प्राइस बँड निश्चित केलेले असतात. यालाच सर्व सामान्यपणे सर्किट ब्रेकर म्हणतात.


का हीवेळा एखाद्या कंपनीबाबत अतिशय चांगली बातमी येते, त्यामुळे त्या कंपनीच्या व्यवसायात व नफ्यात भरघोस वाढ होणार याबद्दल अनेक गुंतवणूकदारांची खात्री पटते. कंपनीच्या त्या वाढीव उत्पन्नाच्या तुलनेत त्यांना शेअरचा आजचा भाव कमी वाटतो, त्यामुळे तो शेअर विकत घेण्यासाठी ते खरेदीच्या ऑर्डर देतात. अशा प्रकारे या शेअरला खूप मागणी येते, पण त्याचवेळेला ज्यांच्याकडे तो शेअर आहे, त्यांनीही ती बातमी ऐकलेली असते, ते कशाला असा चांगला शेअर विकायला बघतील? म्हणजे मागणी जास्त, पण विकणारे कोणी नाही अशी स्थिती येते. भाव वाढायला लागतात. पण हे किती मर्यादेपर्यंत वाढू द्यायचे? एका दिवसात भाव वाढत-वाढत दुप्पटसुद्धा होईल. पण असे प्रकार खूप जास्त प्रमाणात अनिश्चितता निर्माण करतील. हे आर्थिक शिस्त म्हणून योग्य नसते. शिवाय आलेली बातमी मार्केटने पचवायला हवी, तिच्यावर शांतपणे विचार करायला हवा. कंपनीबाबत वाईट बातमी येते तेव्हा उलटी स्थिती होते. सगळेजण तो विकायला बघतात, पण खरेदीदार कोणी पुढे येत नाही. मग त्या शेअरचा भाव घसरायला लागतो. तो किती घसरू द्यायचा यावरही मर्यादा हवी. यासाठीच स्टॉक एक्स्चेंजतर्फे भाव मर्यादा म्हणजे प्राइस बॅँड निश्चित केलेले असतात. यालाच सर्व सामान्यपणे सर्किट ब्रेकर म्हणतात.


उदाहरण : समजा एखाद्या शेअरचा भाव 100 रुपये आहे आणि तिच्यासाठी 10 टक्के प्राइस बॅँड निश्चित केलेला आहे. मग स्टॉक एक्स्चेंजतर्फे बंधन असते, हा भाव एका दिवसात 90 रुपयांच्या खाली जाऊ नये व 110 रुपयांच्या वर जाऊ नये. म्हणजे हा शेअर विकताना किंवा खरेदी करताना 90 रुपयांपेक्षा कमी भाव तुम्ही लावू (कोट) शकणार नाही की विकताना किंवा विकत घेताना 110 रुपयांपेक्षा जास्त भाव देऊ शकणार नाही.
वेबसाइटवरून बघता येते


‘गेट कोट ’
समजा शेअरचा भाव 100 रुपये असलेल्या एखाद्या कंपनीबाबत खूप चांगली बातमी आलेली आहे. गुंतवणूकदारांची तो विकत घेण्यासाठी मग एकच झुंबड उडेल, ते जास्त किंमत द्यायला तयार असतील. पण भाव मर्यादेच्या नियमानुसार विकणारे 110 रुपयांपेक्षा जास्त भाव लावू शकत नाहीत आणि यापेक्षा जास्त भाव नंतर मिळेल त्यांना माहीत असल्याने ते हा शेअर विकायला पुढे येणार नाहीत. म्हणजेच फक्त खरेदीदार (बायर) आहेत, पण विकणारे (सेलर) नाहीत अशी स्थिती येते आणि त्या शेअरचे खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प होतात. दुस-या दिवशी या कालच्या 110 रुपये भावावर सर्किट लावले जाते. 110 रुपयांवर 10 टक्क्यांनी म्हणजे 110 अधिक 11 रुपये बरोबर 121 रुपये भावापेक्षा जास्त भाव लावता येणार नाही. तसेच 110 वजा 11 बरोबर 99 रुपये भावापेक्षा कमी भाव लावता येणार नाही. रोजच जर तो शेअर असा अप्पर सर्किटमध्ये लॉक होत गेला तर, असे काही दिवस चालेल, नंतर एका टप्प्यावर आता वाढलेला भाव पुरेसा आहे वाटून काही विकणारे समोर येतील व त्या भावात विकत घेणारे काही असतील. त्या दिवशी, त्या भावात मग ते सर्किट ब्रेक होईल. शेअर सर्किट ब्रेकरमध्ये गेला की रोज त्याला किती मागणी आहे, किती ऑर्डर पेंडिंग आहेत ते बीएसई व एनएसईच्या वेबसाइटवरून बघता येते. त्यावरूनही भाव वाढतो आहे तसे त्या शेअरची मागणी वाढते आहे की घटते आहे लक्षात येऊ शकते. तसेच प्रत्येक शेअरसाठी त्या दिवसाची अप्पर व लोअर सर्किटची भाव मर्यादा किती आहे तेही या वेबसाइटवरून बघता येते. ‘गेट कोट ’ मध्ये एखाद्या शेअरचा भाव बघितला की त्यात खाली लोअर व अप्पर प्राइस बॅँड दर्शवले जातात.


भाव कमी झाल्यास लोअर सर्किट वाढल्यास अप्पर सर्किट
लोअर सर्किटबाबत भाव रोज कमी होत जातो आणि कंपनी चांगली असेल तर, एका टप्प्यावर तो भाव खरेदीसाठी योग्य वाटून मग खरेदीदार समोर येतात. मात्र कंपनीत जर काही घोटाळा आहे वगैरे बिंग फुटल्याने भाव खाली येऊन तो लोअर सर्किटमध्ये गेला असेल तर ते अनेक दिवस चालू राहते. इथे आपण अप्पर व लोअर सर्किट म्हणजे काय ते समजण्यासाठी 10 टक्के भाव मर्यादेचे उदाहरण घेतले. प्रत्यक्षात एक्स्चेंजच्या नियमांनुसार काही शेअर्सवर दोन टक्के, काहींवर पाच टक्के तर काहींवर 10 टक्के भाव मर्यादा आहे आणि त्या व्यतिरिक्त इतर सर्व शेअरवर 20 टक्के भाव मर्यादा आहे.


एक महत्त्वाचा अपवाद म्हणजे ज्या शेअर्सवर डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट उपलब्ध आहे म्हणजे जे फ्यूचर आणि ऑप्शनमध्ये उपलब्ध असतात किंवा जे शेअर्स डेरिव्हेटिव्ह इंडेक्सचा भाग असतात त्यांच्यासाठी कोणतीही भाव मर्यादा नाही. एका दिवसात ते कितीही वर जाऊ शकतात किंवा कोसळू शकतात. सत्यम कॉम्प्युटर्स हे याचे एक प्रत्यक्षातील उदाहरण आहे. 7 जानेवारी 2009ला याच्या अध्यक्षांनी स्वत:च कंपनीचा ताळेबंद 4000 कोटी रुपयांनी फुगवलेली आहे कबुली दिल्यावर कंपनीच्या शेअरचा भाव एका दिवसात 77 टक्क्यांनी कोसळला, 178 रुपयावरून 50 रुपये इतका खाली उतरला. फ्यूचर आणि ऑप्शन कॉन्ट्रॅक्टना आणि त्यातील शेअर्सना जरी भाव मर्यादा नसली तरी चुकीने कोणी खूप जास्त किंवा कमी भाव ऑर्डरमध्ये दिला तर ते टाळण्यासाठी डमी भाव मर्यादा लावण्यात आलेल्या आहेत.


स्टॉक एक्स्चेंजचे निर्णय व नियंत्रण
एक्स्चेंज वेळोवेळी प्रत्येक शेअरवर भाव मर्यादा दोन टक्के, पाच टक्के, दहा टक्के की 20 टक्के असावी याचा आढावा घेत असते व त्यात सुधारणा करत असते. ज्या शेअरवर 20 टक्के भाव मर्यादा आहे तो अप्पर सर्किटमध्ये लागोपाठ दोन दिवस राहिला की मग सहसा ही मर्याद 10 टक्के केली जाते, त्यानंतर 5 टक्के केली जाते. हा निर्णय एक्स्चेंजेस घेतात. जशी शेअर्ससाठी भाव मर्यादा असते तशीच खुद्द सेंसेक्स व निफ्टीबाबतही असते. त्याचा ऊहापोह पुढील लेखात करू.


kuluday@rediffmail.com