आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील आठवड्यात शेअर बाजारात अपेक्षेप्रमाणे तेजी दिसून आली. त्यानंतर निफ्टीत 6266 या पातळीच्या जवळ अडथळा पाहायला मिळाला. फंड आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे निफ्टीत वाढ दिसून आली. शेअर बाजारापुरते सांगायचे झाले, तर कमी प्रमाणात होणारे व्यवहार (व्हॉल्युम) हा खरा काळजीचा विषय आहे. त्यामुळे वाढीची कक्षा मर्यादित राहिली आहे. मात्र, निफ्टीने 6266 ही पातळी ओलांडल्याने तेजीबाबत सकारात्मक बाबींना बळ मिळाले आहे.
जागतिक क्षितिजावर युक्रेन संकट आणि त्याचा जगावर होणारा परिणाम यामुळे गुंतवणूकदारांनी सावध तसेच सतर्क पवित्रा घेतला आहे. यामुळेच सोमवारी भारतासह जगातील प्रमुख बाजारात नफेखोरी मोठ्या प्रमाणात दिसून आली. मात्र, विदेशी फंडांकडून खालच्या पातळीवर निवडक समभाग खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याने देशातील शेअर बाजारात तेजी आली. मंगळवारी शेअर बाजार सकारात्मक तेजीसह बंद झाले. आगामी काळातही अशा स्वरूपाची वाढ दिसून येईल.
आर्थिक आघाडीवर नजर टाकल्यास एचएसबीसी मार्केट मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय वगळता इतर दोन प्रमुख आर्थिक सूचक आकडे कमकुवत राहिले. एचएसबीसी मार्केट पीएमआय जानेवारीत 51.4 होता, फेब्रुवारीत तो वाढून 52.5 झाला आहे. यावरून भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याचे संकेत आहेत. असे असले तरी तिस-या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) 4.7 टक्के राहिले आणि एप्रिल ते जानेवारी या काळात महसुली तुटीचे लक्ष्य गाठण्याची चिन्हे नाहीत. यामुळे देशाच्या आर्थिक विश्वसनीयतेला धक्का पोहोचला आहे. लिक्विडिटीमुळे बाजारात आतापर्यंत तेजीचा कल दिसून आला आहे. मात्र, सार्वजनिक निवडणुकांपूर्वीचा राजकीय पट लक्षात घेता काही गुंतवणूकदारांनी बाजारापासून चार हात दूर राहणेच पसंत केले आहे.
जागतिक पातळीवर जर्मनीतून चांगल्या बातम्या येत आहेत. चीनचा एचएसबीसी मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय फेब्रुवारीत सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. त्याचे पडसाद जगातील प्रमुख शेअर बाजारात दिसून आले. अमेरिकेने आपल्या जीडीपी विकासदराचा अंदाज घटवत अर्थव्यवस्था रुळावर येण्याची अपेक्षा कायम ठेवली आहे, हे अपेक्षितच आहे. तेथील अकृषी क्षेत्रातील रोजगाराची आकडेवारी येत्या शुक्रवारी जाहीर होईल. त्याचा शेअर बाजारावर परिणाम होऊ शकतो. एकंदरीतच चीन वगळता जागतिक पातळीवर आर्थिक घटक सकारात्मक आहेत. युक्रेन संकटाचा परिणाम जागतिक स्तरावर जाणवू शकतो. त्यामुळे शेअर बाजारातील तेजी आकसण्याची शक्यता आहे.
तांत्रिकदृष्ट्या या आठवड्यात देशातील शेअर बाजारात सकारात्मक कल टिकून राहण्याची शक्यता आहे. वाढत्या निफ्टीला आता 6315 वर अडथळा होण्याची शक्यता आहे. त्यावर बारकाईने नजर ठेवायला हवी. हा हलका अडथळा असून वाढत्या निफ्टीला त्यामुळे फारसा धोका नाही. निफ्टी या पातळीला पार करून खाली आल्यास काही प्रमाणात तांत्रिक करेक्शन होण्याची शक्यता आहे. निफ्टी या पातळीच्या वर बंद झाल्यास आगामी काळात निफ्टी नवा उच्चांक गाठू शकतो. खालच्या दिशेने निफ्टीला 6212 वर पहिला आधार मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या आधार पातळीत फारसा दम नाही. निर्देशांकाला त्यानंतर 6159 वर चांगला आधार आहे. तत्काळ परिस्थितीत तगडा आधार या पातळीवर मिळेल. मात्र, निफ्टी या पातळीच्या खाली आल्यास बाजार मंदीच्या तडाख्यात आल्याचे संकेत मानावेत.
या शेअर्सकडे ठेवा लक्ष : शेअर्सच्या बाबतीत, या आठवड्यात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी लिमिटेड हे समभाग चार्टवर उत्तम स्थितीत दिसताहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा मागील बंद भाव 361.95 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 381 रुपये, तर स्टॉप लॉस 351 रुपये आहे. एसबीआयचा मागील बंद भाव 1550.35 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 1588 रुपये, तर स्टॉप लॉस 1512 रुपये आहे. एचडीएफसीचा मागील बंद भाव 821.85 रुपये आहे. त्याचे टार्गेट 834 रुपये, तर स्टॉप लॉस 810 रुपये आहे.
- लेखक टेक्निकल अॅनालिस्ट आणि moneyvistas.comचे सीईओ आहेत.
vipul.verma@dainikbhaskargroup.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.