आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहन विक्री, मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयवर बाजाराची नजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील आठवड्यात अपेक्षेनुसार देशातील शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण असल्याने फंड तसेच ट्रेडर्सनी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केली. देशातून दिशादर्शक संकेत न मिळाल्यानेही घसरण झाली. निफ्टीला ७८६१ या पातळीवर चांगला आधार मिळेल आणि या स्तराजवळ काही प्रमाणात तेजी दिसून येईल, असे मी मागील सदरात नमूद केले होते. निफ्टीने ७८४२ ही खालची पातळी गाठली, जी नमूद केलेल्या आधार पातळीच्या आसपासच आहे. मात्र निफ्टी या स्तरावरून उसळी घेऊन या आधार पातळीच्या खूप वर ७९६८.८५ या स्तरावर बंद झाला.
मात्र देशातील बाजारातील कल नकारात्मक बनला आहे. दरम्यान, चीन आणि युरोपातील बड्या अर्थव्यवस्थांत सुधारणा कायम राहिल्यानेही काळजीत भर पडली. देशात सर्वोच्च न्यायालयाने १९९३ नंतर वाटप झालेल्या २१८ कोळसा खाणींपैकी २१४ कोळसा खाणींचे वाटप रद्द केले. त्यामुळेही बाजारावर परिणाम झाला. िसमेंट, वीज आणि बँकांच्या समभागांत मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

मागील आठवड्यात एक चांगली बातमीही आली. क्रेडिट रेटिंग एजन्सी स्टँडर्ड अँड पुअर्सने (एस अँड पी) भारताचे सार्वभौम पतमानांकन नकारात्मकवरून स्थिर केले. त्याचबरोबर भारताचे पतमानांकन आणखी सुधारू शकते, देशाचा जीडीपी ५.५ टक्के व्हायला हवा आणि महसुली तूट, महागाई दर, बाहेरील व देशांतर्गत घटकांत सुधारणा व्हायला हवी, असे मत एस अँड पीने व्यक्त केले. या प्रमुख घडामोडींमुळे बाजाराला दिलासा मिळाला. मात्र रिझर्व्ह बँकेच्या नाणेनिधी आढावा धोरणाने हा दिलासा फार काळ टिकला नाही. रिझर्व्ह बँकेने अपेक्षेनुसार सलग चौथ्या वेळी प्रमुख व्याजदरांत बदल केले नाहीत. रेपो दर ८ टक्के आणि सीआरआर ४ टक्के कायम ठेवला. तर मंगळवारी जाहीर झालेल्या महसुली तुटीच्या आकड्यांनी अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत चिंता निर्माण केली. कारण ही तूट एप्रिल ते ऑगस्ट या काळात पूर्ण वर्षाच्या लक्ष्याच्या ७४.९५ टक्कांइतकी राहिली. एकूणच गुंतवणूकदारांबाबत सतर्कतेचे वातावरण राहिले. थोडक्यात, बाजारात घसरणीचा कल राहण्याची शक्यता आहे.

येत्या आठवड्यात खूप सुट्या आहेत. त्यामुळे या आठवड्यात फारसे काही घडण्याची शक्यता नाही. मात्र रुपयाचे अवमूल्यन चिंताजनक आहे, मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ६१.७५ पर्यंत खाली घसरला होता. ही रुपयाची ५ मार्चनंतरची सर्वात खालची पातळी आहे. याशिवाय बुधवारी वाहन िवक्रीचे तसेच एचएसबीसी मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयचे आकडे जाहीर होतील. त्यावर बाजाराची नजर राहील.

तांत्रिकदृष्ट्या शेअर बाजारात घसरणीची शक्यता असून बाजार कन्सॉलिडेशनच्या टप्प्यात आहे. निर्देशांक खालची पातळी गाठू शकतात. घसरणा-या निफ्टीला ७९१२ वर पहिला आधार मिळण्याची शक्यता आहे. हा मध्यम स्वरूपाचा आधार आहे. त्यानंतर निफ्टीला ७७९१ या पातळीवर आधार मिळेल, हा मात्र मजबूत आधार ठरण्याची शक्यता आहे.

निफ्टीला वरच्या दिशेने ८०३२ वर पहिला अडथळा होईल. हा एक मध्यम स्वरूपाचा अडथळा आहे. समजा निफ्टीने हा अडथळा पार केला तर तेजी दिसून येईल. अशा स्थितीत निफ्टीला ८१२३ वर अडसर आहे. हा मात्र तगडा अडसर आहे. शेअर्सच्या बाबतीत या आठवड्यात विजया बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडचे समभाग चार्टवर उत्तम दिसताहेत. विजया बँकेचा बंद भाव ४८ रुपये आहे . त्याचे टार्गेट ५१ रुपये आणि स्टॉप लॉस ४५ रुपये आहे. तर अल्ट्राटेक सिमेंटचा बंद भाव २६३१.६५ रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट २६६८ रुपये आणि स्टॉप लॉस २५८९ रुपये आहे.

- लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.com चे सीईओ आहेत.
vipul.varma@dainikbhaskargroup.com