आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात तेजीची शक्यता, सतर्कता हवीच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण आणि जपानने दिलेले प्रोत्साहन पॅकेज यामुळे शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून आली. अमेरिका फेडरल रिझर्व्हने आपला रोखे खरेदीचा क्यूई कार्यक्रम समाप्तीचा निर्णय घेतला आहे. याशिवाय जपानने दिलेल्या प्रोत्साहन पॅकेजमुळे शेअर बाजारात रोख पैसा येण्याच्या अपेक्षेने तेजी आली. बँक ऑफ जपानने शुक्रवारी उचललेल्या या पावलाने जगभरातील आर्थिक बाजारपेठेला आश्चर्याचा धक्का दिला.
एप्रिलमध्ये विक्रीकरात वाढ केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे आर्थिक विकास आणि महागाईत तेजी आली नसल्याचे त्यांनीही मान्य केले. याआधी अमेरिकेने टाकलेले पाऊल बाजाराने नकारात्मक घेतले होते. मात्र विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे नकारात्मक कलावर फारसा परिणाम झाला नाही. मुळात बाजारासाठी कोणतीही इतर सकारात्मक घडामोड नव्हती.

केंद्र सरकारची वित्तीय तूट एप्रिल ते सप्टेंबर या काळात ४.३९ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. संपूर्ण आर्थिक वर्षाच्या निश्चित केलेल्या लक्ष्याच्या ८२.९ टक्के इतकी ही तूट आहे. ऑक्टोबरमधील सणांच्या हंगामातील वाहनांची मासिक विक्रीही फारशी उत्साहजनक नव्हती. एचएसबीसीच्या मॅन्युफॅक्चरिंग पीएनआयमध्ये किरकोळ वाढ झाली. ऑक्टोबरमध्ये हा निर्देशांक ५१.६ वर राहिला, सप्टेंबरमध्ये तो ५१ होता. त्यामुळे बाजारात आलेली तेजीची लाट बाजारात रोख पैसा वाढण्याच्या अपेेक्षेनेच आली होती हे स्पष्ट होते. यात देशातील सध्याच्या आर्थिक घडामोडींचा फारसे योगदान नव्हते.

आगामी नाणेनिधी आढाव्यात रिझर्व्ह बँक प्रमुख व्याजदरांत काही प्रमाणात कपात करेल या अपेक्षेने बाजारातील वाढीला काही प्रमाणात मदत केली. यामुळेच गेल्या काही दिवसांत बँकांच्या समभागांत वाढ दिसून येत आहे. रिझर्व्ह बँकेने कपात केली तरी ती पाव टक्क्यापेक्षा जास्त नसेल. ही कपात मोठी वाढ करण्यास पूरक ठरणार नाही. जोपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेशी निगडित मूलभूत कारणांत अपेक्षा जाणवत नाही, तोपर्यंत सतर्क राहणे योग्य राहील.

जागतिक पातळीवर अमेरिकेच्या क्यूई कार्यक्रम समाप्तीच्या घोषणेनंतरही जपानने टाकलेल्या पावलामुळे रशिया, चीन आणि अमेरिकेच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. युरोपातून सध्या तरी फारशा उत्साही बातम्या नाहीत. कच्च्या तेलाच्या गतीने घटणा-या किमती बाजाराची दिशा ठरवतील.

नायमॅक्समध्ये मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमती घटून ७६.७५ डॉलर प्रतिबॅरलपर्यंत खाली आल्या आहेत. तर ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती कमी होऊन ८२.६४ डॉलर प्रतिबॅरल झाल्या आहेत. भारतासह विकसनशील देशांसाठी हे शुभवर्तमान आहे.

तांत्रिकदृष्ट्या बाजार आता सकारात्मक टप्प्यात आहे. त्यात आणखी वाढ नाकारता येत नाही. विशेषकरून कच्चे तेल आणि सोन्याच्या किमतीत होणारी घसरण पाहता ही वाढ राहण्याची शक्यता जास्त आहे. तरीही आगामी काळात करेक्शन येण्याची शक्यता जास्त आहे. निफ्टीला वरच्या दिशेने ८३८६ च्या आसपास पहिला प्रमुख अडथळा आहे. हा एक अर्थपूर्ण अडसर राहील. या पातळीवर नफावसुली दिसून यईल. त्यानंतर निफ्टीला ८४४८ अंकांवर मोठा अडथळा होण्याची शक्यता आहे.

खालच्या दिशेने निफ्टीला ८२९१ वर पहिला आधार मिळण्याची शक्यता आहे. हा एक तत्काळ आधार असून त्यातून निफ्टीचा कल माहिती होईल. समजा निफ्टी या पातळीखाली येऊन बंद झाला तर त्याला ८२६२ वर आधार मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर निर्देशांकाला ८१८१ अंकांवर महत्त्वाचा आधार राहील. यावर बारकाईने नजर ठेवण्याची गरज आहे.
शेअर्सच्या बाबतीत या आठवड्यात एसीसी लिमिटेड आणि वोक्हार्ट लिमिटेड चार्टवर उत्तम दिसताहेत. एसीसीचा बंद भाव १४९१.२० रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट १५२२ रुपये आणि स्टॉप लॉस १४५६ रुपये आहे. तर वोक्हार्टचा बंद भाव ७७०.२० रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य ७८४ रुपये आणि स्टॉप लॉस ७५२ रुपये आहे.

लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.com चे सीईओ आहेत.
vipul.varma@dainikbhaskargroup.com