आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयआयपी- किरकोळ महागाईच्या आकडेवारीवर राहणार नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील शेअर बाजारात तांत्रिक करेक्शन येण्याची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती, अखेर मागील आठवड्यात ते करेक्शन दिसून आले. बेंचमार्क निर्देशांकांनी १४ नोव्हेंबर २०१४ नंतर जी वाढ दर्शवली होती, ती या करेक्शनमध्ये पूर्ण वाहून गेली. घसरणीसाठी अनेक कारणे कारणीभूत आहेत. जागतिक पातळीवरील कारणेही त्यात महत्त्वाची आहेत. चीनच्या बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने मंगळवारी शेअर बाजार घसरला. चीनचा बाजार सुमारे ५ टक्क्यांनी घसरला. गेल्या पाच वर्षांतील एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण आहे. डॉलरच्या तुलनेत युआनमध्ये मोठे चढउतार झाल्यानेही जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली. आर्थिक आकडेवारी समाधानकारक नसतानाही पीपल्स बँक ऑफ चायनाने नोव्हेंबरमध्ये व्याजदरात कपात करून आश्चर्याचा धक्का दिला होता. मंगळवारी केंद्रीय बँकेने राखीव निधीत कपात करण्याच्या शक्यतेने बाजारात युआनचे मूल्य घसरले. २००८ नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे.
अलीकडच्या काळात चीनमधील औद्योगिक आकडेवारी अपेक्षेनुसार आलेली नाही. तसेच प्रशासकीय नियम शिथिल केल्यानंतरही तेथील घरांची बाजारपेठ म्हणावी तशी फुलली नाही. जगभरातील बाजारांनीही चीनच्या बाजाराच्या पावलावर पाऊल टाकले. सर्व बड्या बाजारांत घसरण आली; मात्र नंतर सकारात्मक कलासह बाजार बंद झाले. देशातील आघाडीबाबत सांगायचे झाले, तर रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवल्याने बाजारातील कल नकारात्मक झाला. त्यातच इन्फोसिसच्या प्रवर्तकांनी समभाग विक्री केल्याने घसरणीत भरच पडली. सकारात्मक बाबींचा विचार केल्यास कच्च्या तेलाच्या किमती आणखी घसरण्याची शक्यता आहे. मात्र, बाजाराने ही बाब आधीच गृहीत धरली होती. त्यामुळे कच्च्या तेलाची घसरण कल बदलू शकली नाही. एकूण नव्या कळीच्या मुद्द्यांअभावी बाजारातील कल कमकुवत बनले आहेत.
आगामी आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या आठवड्यात ऑक्टोबरमधील औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) तसेच नोव्हेंबरमधील किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर होणार आहे. हे दोन्ही आकडे महत्त्वाचे असून बाजारातील कल बदलण्याची त्यात क्षमता आहे.
तांत्रिकदृष्ट्या निफ्टी सध्या घसरणीच्या मूडमध्ये आहे. निफ्टीला ८२९७ अंकांच्या आसपास चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे. हा एक मजबूत आधार असून या स्तराच्या आसपास बाउन्स बॅक िदसून येईल. मात्र, अल्पकाळात घसरणीचा कल संपण्यावर ही वाढ अवलंबून राहील. उसळी आल्यास निफ्टी ८५१० च्या पार झाल्यास घसरणीचा काळ संपला, असे समजावे. ८५१० हा निफ्टीसाठी मजबूत अडसर आहे. जोपर्यंत निफ्टी या स्तराच्या खाली आहे तोपर्यंत बाजारात घसरणीचा कल राहील. मात्र, निफ्टी ८२९७ चा स्तर तोडून त्याखाली आल्यास त्याला ८१८० वर चांगला आधार आहे.

समभागांच्या बाबतीत या आठवड्यात एचडीएफसी लिमिटेड आणि टेक महिंद्रा लिमिटेड चार्टवर उत्तम दिसताहेत. एचडीएफसी बँकेचा सध्याचा बंद भाव ११०३.२० रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य ११२८ रुपये आणि स्टॉप लॉस १०७२ रुपये आहे, तर टेक महिंद्राचा सध्याचा बंद भाव २६१२.१५ रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य २६४८ रुपये आणि स्टॉप लॉस २५७४ रुपये आहे.

लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.com चे सीईओ आहेत.
vipul.varma@dainikbhaskargroup.com