आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय शेअर बाजार आता सकारात्मक कक्षेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिझर्व्ह बँकेने मागील आठवड्यात व्याजदरात अचानक कपात केल्यानंतर शेअर बाजारात अपेक्षेनुसार तेजी आली. फंड तसेच गुंतवणूकदारांकडून झालेल्या जोरदार खरेदीमुळे बेंचमार्क निर्देशांकांनी नवे शिखर गाठले. जर निफ्टी ८४४५ अंकांच्या वर बंद झाल्यास त्याचा आणखी वाढीचा मार्ग खुला होईल, असे मागच्या आठवड्यात नमूद केले होते. निफ्टीने ही अडथळा पातळी ओलांडल्यानंतर मागे वळून पाहिले नाही. यात सातत्याने तेजी दिसून आली. मागील आठवड्यात घाऊक महागाईची आकडेवारी किमान पातळीत राहिल्याने आणि त्यानंतर रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी आली. त्यापूर्वी रिझर्व्ह बँक तीन फेब्रुवारीच्या आढाव्यात व्याजदरात कपात करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्याआधीच कपात करून आणखी व्याजदर कपातीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे व्याजदराशी निगडित समभागांच्या जोरदार खरेदीमुळे तसेच विप्रोसारख्या कंपन्यांच्या चांगल्या आर्थिक निकालामुळे तेजीला बळ मिळाले. तसे पाहिले तर तिमाही निकाल अपेक्षेनुसार आले असले तरी उत्पन्नाच्या आघाडीवर सकारात्मक आकडेवारी आल्याने बाजाराच्या आशा उंचावल्या आहेत.

जागतिक पातळीवर स्थिती फारशी समाधानकारक नाही. चीनच्या अर्थव्यवस्थेकडून चांगले संकेत नाहीत आणि युरोझोनवर आर्थिक संकटाचे मळभ दाटते आहे. ग्रीस युरोझोनमधून बाहेर पडणार का हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे. येत्या २५ जानेवारीला होणा-या निवडणुकीनंतर त्यावरचा निर्णय अवलंबून राहील. समजा ग्रीसने युरोझोनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर जागतिक बाजारावर त्याचा परिणाम दिसून येईल. मात्र, जर्मनी या युरोझोनमधील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेने ही चिंता काही प्रमाणात कमी केली आहे. समजा युरोपियन सेंट्रल बँकेचे (ईसीबी) अध्यक्ष मारिओ द्राघी यांनी आर्थिक मदत जाहीर केली (व्यापक प्रमाणात असे मानले जात आहे) तर जगभरातील बाजारातून त्याचे स्वागत होईल. ईसीबी या रोख्यांचा खरेदी कार्यक्रम कसा पूर्ण करते हे पाहणे आवश्यक आहे. सर्व बाजारांनी ५०० अब्ज युरोची(सुमारे ३५,७२० अब्ज रुपये) रोखे खरेदी गृहीत धरली आहे. त्यामुळे यापेक्षा कमी रकमेची खरेदी झाल्यास बाजारासाठी ते निराशाजनक ठरू शकते. शेअर बाजारांवर या मदत पॅकेजचा कसा परिणाम होईल यासाठी याची मात्रा कशी राहील हे पाहणे महत्त्वाचे राहील. आगामी काळाचा विचार केल्यास भारतीय बाजार सकारात्मक झोनमध्ये आले असून येणा-या सत्रांत यात आणखी वाढ दिसून येईल. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी युरोझोनकडून मिळणा-या संकेताची प्रतीक्षा करणे हिताचे राहील.

तांत्रिकदृष्ट्या निफ्टी आता, अनचार्टेड टेरिटरीमध्ये आहे आणि सकारात्मक पण आहे. याचाच अर्थ असा की, जागतिक पातळीवर कमकुवत संकेत असले तरी वाढीचा कल दिसून येईल. वाढीचा विचार केल्यास निफ्टीला पहिला अडसर ८७५६ अंकांच्या आसपास राहील. हा एक मध्यम स्वरूपाचा अडथळा राहील. त्यानंतर त्याला ८८४१ वर पुढील अडथळा होण्याची शक्यता आहे. खालच्या दिशेचा विचार केल्यास निफ्टीला ८४४७ च्या आसपास पहिला आधार मिळण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी ८५२९ च्या आसपास आणखी एक आधार पातळी असून ती महत्त्वाची आहे. जोपर्यंत हा आधार आहे तोपर्यंत निफ्टीतील घसरणीची शक्यता मर्यादित आहे. मात्र ही आधार पातळी तुटल्यास बाजाराचा कल कमकुवत होईल, अशात पुढील आधार ८४४७ अंकांच्या आसपास राहील. समभागांच्या बाबतीत, रिलायन्स कॅपिटल लिमिटेड आणि कोटक महिंद्रा लिमिटेड चार्टवर उत्तम दिसताहेत. रिलायन्स कॅपिटलचा सध्याचा बंद भाव ४६९ रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य ४७७ रुपये आणि स्टॉप लॉस ४५९ रुपये आहे, तर कोटक महिंद्राचा सध्याचा बंद भाव १३९५.७० रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट १४२१ रुपये आणि स्टॉप लॉस १३५७ रुपये आहे.

vipul.verma@dbcorp.in लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत.