आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅलन्स्ड फंड : जोखीम व लाभ यांचा समतोल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणा-या इक्विटी म्युचुअल फंडात गुंतवणूक केली तर जास्त लाभ मिळण्याची शक्यता असते, पण त्यात जोखीमही जास्त असते. उलट डेट म्युचुअल फंडात किंवा बँक मुदत ठेवीसारख्या सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवले तर जोखीम कमी असते, पण लाभही मर्यादित असतो. या जोखीम व लाभ यांचा समतोल साधण्यासाठी बॅलन्स्ड फंडाकडे आपण बघू शकतो. डेट व इक्विटी यांचे असे मिश्रण असणारा एक हायब्रीड फंड म्हणून आपण मंथली इन्कम प्लॅन म्हणजेच एमआयपीची माहिती घेतली होती. पण एमआयपी हा मुख्यत: डेट फंडाचा प्रकार आहे. अशा एमआयपी फंडांकडे गुंतवणुकीसाठी जी एकूण रक्कम जमा होते त्यापैकी जास्तीत जास्त फक्त 20 टक्के इतकी इक्विटी म्हणजे शेअर मार्केटमध्ये गुंतवली जाते व इतर 80 टक्के ते 100 टक्के रक्कम कर्जरोखे (सरकारी व कॉर्पोरेट), मनी मार्केट साधने (इंस्ट्रुमेंट) अशा डेट प्रकारात गुंतवली जाते. मात्र, बॅलन्स्ड फंड हेही इक्विटी व डेट या दोन्ही ठिकाणी पैसे गुंतवत असले तरी हे प्रमाण साधारणपणे इक्विटीमध्ये कमीत कमी 65 टक्के व डेटमध्ये जास्तीत जास्त 35 टक्के इतके असते. बॅलन्स्ड फंड म्हणजे हे प्रमाण समसमान 50:50 टक्के नको का, असा प्रश्न पडणे साहजिकच. त्याचे उत्तर आहे, जर म्युचुअल फंड जमा झालेल्या रकमेपैकी कमीत कमी 65 टक्के इक्विटीमध्ये गुंतवत असेल तर त्याला आयकरासाठी इक्विटी फंडाचे नियम लागू होतात व ते आपल्यासाठी जास्त लाभदायक आहेत. त्यानुसार लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणजे अशा फंडातील एक वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या गुंतवणुकीवर इन्कम टॅक्स द्यावा लागत नाही.

बॅलन्स्ड फंडाचा मुख्य फायदा: बॅलन्स्ड फंडाचा मुख्य फायदा म्हणजे अ‍ॅसेट अलोकेशन. समजा आपल्याला 65 टक्के रक्कम इक्विटीमध्ये गुंतवायची आहे व 35 टक्के डेट प्रकारात म्हणजे सुरक्षित साधनांत. पण शेअर मार्केटमध्ये तेजी आल्यावर किंवा शेअर मार्केट खाली गेल्यावर हे प्रमाण बिघडते. समजा आपण 100 रुपयांपैकी 65 रुपये इक्विटीमध्ये गुंतवले व 35 रुपये डेटमध्ये गुंतवले. शेअर मार्केटमध्ये तेजी आल्यामुळे 65 रुपयाचे मूल्य वाढते व मग आपण त्या प्रमाणात इक्विटीमधील गुंतवणूक कमी करून ती डेट प्रकारात गुंतवायला हवी. पण शेअर मार्केट वर चालले आहे बघून आपल्याला ते आणखी वर जाईल, आणखी फायदा होईल, असा मोह सुटतो. आपण रिबॅलन्सिंग करत नाही. शेअर मार्केट खाली आले तर इक्विटीमधील गुंतवणुकीचे प्रमाण 65 टक्क्यांपेक्षा कमी होते. या वेळेस आपण डेटमधून इक्विटीकडे त्या प्रमाणात पैसे वळवायला हवेत. पण आपल्याला मार्केट आणखी खाली जाईल, अशी भीती वाटते. त्यामुळे आपण चालढकल करत राहतो. बॅलन्स्ड फंड मात्र सतत हे प्रमाण बिघडणार नाही याची काळजी घेतात. इक्विटीचे प्रमाण जास्त झाले की त्यातील गुंतवणूक कमी करून ती डेटकडे वळवतात. उलट मार्केट खाली आल्याने इक्विटीचे प्रमाण कमी झाले की डेटमधील रक्कम तिकडे वळवतात. बॅलन्स्ड फंडाच्या इक्विटीमधील गुंतवणुकीत जास्त लाभ मिळू शकतो, तर फंडाच्या डेट प्रकारातील गुंतवणुकीमुळे सुरक्षितता मिळते, हे आपण लक्षात घेतले. अर्थात, जर शेअर मार्केटमध्ये खूप तेजी आली तर प्युअर इक्विटी म्युचुअल फंडामधील गुंतवणुकीतून जितके रिटर्न मिळतील त्यापेक्षा बॅलन्स्ड फंडातून मिळणारे रिटर्न कमी असतील, पण मार्केट खाली आले तर होणारे नुकसानही बॅलन्स्ड फंडात कमी असेल.

सेव्हिंग्ज व इनव्हेस्टमेंट प्लॅन :बॅलन्स्ड फंड कोणते हे ओळखायचे कसे? बहुतेक म्युचुअल फंड आपल्या अशा बॅलन्स्ड फंडाच्या नावातच त्याचा बॅलन्स्ड फंड म्हणून उल्लेख करतात. काही अपवाद आहेत. महत्त्वाचा अपवाद म्हणजे, एचडीएफसी म्युचुअल फंडाचा एचडीएफसी प्रूडन्स फंड. तसेच बहुतेक म्युचुअल फंडांचे मुलांच्या भविष्यासाठी म्हणून जे चिल्ड्रेन प्लॅन असतात ते बॅलन्स्ड फंडच असतात. या चिल्ड्रेन प्लॅनमध्येच सेव्हिंग्ज प्लॅन व इनव्हेस्टमेंट प्लॅन असे उपप्रकार असतात व डेट व इक्विटी यांच्या प्रमाणात त्यानुसार फरक असतो. म्हणून नावापेक्षाही एखादी योजना बॅलन्स्ड फंड आहे की नाही हे ठरवण्याचा चांगला मार्ग म्हणजे त्या योजनेची माहिती वाचावी. त्यात योजनेचा इनव्हेस्टमेंट पॅटर्न काय दिला आहे ते बघावे. जर त्याप्रमाणे कमीत कमी 40 टक्के व जास्तीत जास्त 75 टक्के रक्कम इक्विटी व इक्विटीसंबंधित साधनांमध्ये व राहिलेली रक्कम डेट प्रकारात असेल तर त्याला बॅलन्स्ड फंड म्हणता येईल. तसेच फंड इक्विटीमध्ये फक्त 40 टक्के रक्कम गुंतवू शकत असला तरी ती एक तरतूद आहे. आयकराचा लाभ घेण्यासाठी बहुतेक वेळा इक्विटी व डेट याचे प्रमाण 65:35 असे राखले जाते. बॅलन्स्ड फंडांमध्येही लाभांश किंवा ग्रोथ असे पर्याय उपलब्ध आहेत.