आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम सेवेवर येणार निर्बंध,दुसर्‍या बँकेच्या एटीएमसाठी आता शुल्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गरज पडल्यास आपली बँक सोडून अन्य बँकेच्या एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्याच्या सवयीला आता मुरड घालावी लागणार आहे. कारण अन्य बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्याच्या या चकटफू सेवेवर एक डिसेंबरपासून काही निर्बंध येणार आहेत. त्यामुळे आता एका महिन्यात फक्त पाच वेळाच अन्य बँकेत व्यवहार करता येतील, हे लक्षात ठेवावे लागणार आहे.

ग्राहकांना देण्यात येणार्‍या मोफत एटीएम सेवेवर मर्यादा आणण्याची परवानगी बँकांना देण्यात आली आहे. महानगरांमधल्या बँकांसाठी ही परवानगी देण्यात आली आह. ठरावीक मर्यादेच्या पलीकडे एटीएममध्ये बँक व्यवहार झाल्यास अतिरिक्त शुल्क आकारण्याची मुभादेखील बँकांना देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक नोव्हेंबरला यासंदर्भात एक आदेश काढला होता.

सहा महानगरांचा समावेश
खातेदारांनी आपल्या स्वत:च्या बँकेचे एटीएम वापरावे तसेच आर्थिक तसेच बिगर आर्थिक व्यवहारांसाठी किमान पाच व्यवहारांची मर्यादा रिझर्व्ह बँकेने घातली आहे. त्यामुळे सहा महानगरांमध्ये असलेल्या अन्य बँकांच्या एटीएम व्यवहारामध्ये व्यवहार करण्याची मर्यादा सध्याच्या पाचवरून तीन व्यवहारांवर आणण्यात आली आहे. ही शहरे पुढीलप्रमाणे : मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद.

२० रुपये शुल्क
रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार आता आपली स्वत:ची बँक सोडून अन्य बँकेच्या एटीएममध्ये पाचपेक्षा जास्त व्यवहार झाल्यास २० रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारले जाईल. बिगर वित्तीय व्यवहारासाठी साडेआठ रुपये दंड आकारला जाणार आहे. काही बँकांनी अतिरिक्त बँक व्यवहारांसाठी शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे; परंतु सर्वच बँकांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. परंतु, हळूहळू काही बँका या नव्या नियमांचे पालन करतील तसेच एक डिसेंबरपासून त्या अमलात आणतील. पंजाब नॅशनल बँकेने मात्र आपल्या बचत खातेदारांच्या मोफत एटीएम व्यवहारावर कोणतेही निर्बंध घालण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.