आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Audi Car Become Expensiv, Price Hike By 2 To 3 Percent

वाहन उद्योग : ऑडी कार महागणार, किमती 2 ते 3 टक्क्यांनी वाढणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - घसरत्या रुपयामुळे वाहन कंपन्यांच्या खर्चाला चांगलाच पीळ बसू लागला आहे. त्यामुळे आता महिंद्रा अँड महिंद्रापाठोपाठ लक्झरी मोटारींच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या ऑडी कंपनीनेदेखील आपल्या मोटारींच्या किमतीत तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.


रुपयाच्या अवमूल्यनामुळे वाहनांच्या किमतीत 2 ते 3 टक्क्यांनी वाढ करण्यावाचून कोणताही पर्याय नाही. ही किंमतवाढ जुलै ते ऑगस्टमध्ये होण्याचे संकेत ऑडी कंपनीचे भारतातील प्रमुख मायकेल पर्शे यांनी दिले. कंपनीने बाजारात दाखल केलेल्या ऑडी आरएस 5 कुपे या नव्या मोटारीच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. या मोटारीची किंमत 95.28 लाख रुपये (एक्स शोरूम मुंबई) आहे.


याअगोदर जानेवारी महिन्यात कंपनीने मोटारींच्या किमती वाढवल्या होत्या. परंतु अलीकडच्या काही आठवड्यांत रुपयाचे मूल्य लक्षणीय घसरल्यामुळे त्याचा नफ्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे ते म्हणाले. परंतु जानेवारी ते जून या कालावधीत कंपनीच्या विक्रीत 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून महिन्यातील मोटार विक्रीत 4 टक्क्यांनी वाढ होऊन ती 750 मोटारींवर गेली आहे. यंदाच्या वर्षात 10 हजार मोटारींच्या विक्रीचे लक्ष्य ठेवले आहे.