आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहन विक्री घसरणीच्याच घाटात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या हंगामी अर्थसंकल्पात वित्तमंत्र्यांनी वाहनांवरील अबकारी शुल्क कमी केल्यामुळे वाहन कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कपातीचा परिणाम ताबडतोब बाजारावर झालेला नसला तरी ग्राहकांकडून चौकशीचा ओघ सुरू झाला आहे. परंतु तरीही चढे व्याजदर, रुपयाचे अवमूल्यन, इंधनांच्या किमती यांचे चटके बाजाराला बसत आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात वाहन विक्रीमध्ये संमिश्र सूर दिसून येत आहे.

यंदा झालेला चांगला पाऊस आणि शेतकर्‍यांना मिळालेली चांगली किमान आधारभूत किंमत यामुळे चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ट्रॅक्टर विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे मत महिंद्राच्या ट्रॅक्टर, कृषी यांत्रिकीकरण विभागाचे सीईओ राजेश जेजुरीकर यांनी व्यक्त केले.

मारुतीच्या विक्रीत किंचित घट : देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती-सुझुकीला फेब्रुवारीत विक्रीच्या आघाडीवर किंचित घसरण सोसावी लागली. यंदाच्या फेब्रुवारीत कंपनीने 1,09,104 वाहनांची विक्री केली, तर फेब्रुवारी 2013 मध्ये 1,09,567 वाहनांची विक्री केली होती.

टोयोटा किर्लोस्कर : टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या विक्रीत 19.27 टक्क्यांनी घसरण होऊन ती 11,284 मोटारींवर आली आहे. कंपनीने गेल्या वर्षात याच कालावधीत 13,979 मोटारींची विक्री केली होती.

ह्युंदाई मोटर इंडिया : कंपनीच्या विक्रीत फेब्रुवारीमध्ये 14.9 टक्क्यांनी घसरण होऊन ती अगोदरच्या वर्षातल्या याच महिन्यातील 46,665 मोटारींवरून 46,505 मोटारींवर आली आहे.

होंडा कार्स इंडिया : कंपनीच्या विक्रीत दुप्पट वाढ होऊन ती 6,510 मोटारींवरून 13,543 मोटारींवर गेली आहे. फेब्रुवारी महिन्यात ब्रायो (1,235), सेडान अमेझ (6,030) सेडान सिटी ( 7,213) या मोटारींना चांगली मागणी आली. त्याचबरोबर सीआरव्ही (65) वाहनाने देखील चांगली साथ दिली आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा : कंपनीच्या विक्रीमध्ये 12 टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षातल्या फेब्रुवारीतील 47,824 मोटारींच्या तुलनेत यंदा याच महिन्यात 42,166 वाहनांची विक्री झाली. स्कॉर्पिओ, एक्सयूव्ही 500, झायलो, बोलेरो, व्हेरिटो यांची विक्री घटून ती 19,308 झाली आहे.