आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंदी सरेना, घाट चढेना, वाहन विक्री वाढेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘बुडत्याचे पाय खोलात’ अशी वाहन उद्योगाची झालेली स्थिती अद्यापही सुधारण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. मोटारींच्या विक्रीने जुलै महिन्यात 7.4 टक्क्यांची घट नोंदवली आहे.

विशेष म्हणजे मोटारींची विक्री सलग नवव्या महिन्यात घसरली आहे. त्याचबरोबर आता मध्यम आणि अवजड वाहनांच्या विक्रीत तर सलग 17 व्या महिन्यात घसरण झाली. या सगळ्याचा फटका आता या उद्योगातील हंगामी कर्मचार्‍यांना बसू लागला आहे.

वाहन उद्योगाची स्थिती अतिशय गंभीर झालेली असून वाहनांच्या मूळ उपकरण उत्पादकांनी हंगामी कामगारांची कपात करण्यास सुरुवात केली आहे. या कपातीचा नेमका किती कामगारांना फटका बसणार याची निश्चित अशी आकडेवारी देता येणार नाही. कारण उत्पादन क्षेत्रात ही कपात केवळ वाहन क्षेत्रापुरती मर्यादित नाही. कारण बहुतांश वाहन कंपन्यांमध्ये हंगामी कर्मचारी कार्यरत असल्याचे सियामचे महासंचालक विष्णू माथूर म्हणाले.

दरम्यान, मारुती सुझुकी इंडियाने आपल्या मानेसारच्या डिझेल इंजिन उत्पादन प्रकल्पातील काही कर्मचार्‍यांना अनिश्चित कालावधीसाठी सुटीवर जाण्याची सूचना केली आहे. दुसर्‍या बाजूला टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीमध्येही सध्या हंगामी कर्मचार्‍यांच्या करारांचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्याबाबत त्यांनी अधिक तपशील देण्यास नकार दिला.

सर्वच क्षेत्रांत मागणीची बोंब
केवळ एकट्यादुकट्याच नाहीत, तर संपूर्ण वाहन क्षेत्रातच मागणीची बोंब झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून मोटारींसह सर्व प्रवासी वाहनांची जुलैमध्ये सलग आठव्या महिन्यात घसरणीची नोंद केली आहे. मोटारसायकली आणि सर्व गटातील एकूण वाहनांची सलग सहाव्या महिन्यात घसरण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. सरसकट सर्वच गटांतील एकूण वाहनांची विक्री 2.08 टक्क्यांनी घसरून ती अगोदरच्या वर्षातल्या 14,45,112 वाहनांवरून यंदाच्या जुलैमध्ये 14,15, 102 वाहनांवर आली आहे.