आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटो क्षेत्रावर रोजगार कपातीची टांगती तलवार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वाहन बाजारातील विक्रीचा फेल झालेला ब्रेक अजूनही सुधारण्याची कोणतीही लक्षणे अद्याप दिसून आलेली नाहीत. या उद्योगात आलेल्या मंदीने आता कळस गाठला असून देशातील मोटार विक्री मेमध्ये सलग सातव्या महिन्यात 12.26 टक्क्यांनी घसरली आहे. सततच्या घसरगुंडीमुळे आता या उद्योगावर रोजगार कपातीची टांगती तलवार दिसू लागली आहे.


देशातील प्रवासी मोटारींची विक्री अगोदरच्या वर्षातल्या मे महिन्यात 1,63,222 मोटारींवरून यंदाच्या मे महिन्यात 1,43,216 मोटारींवर आली असल्याचे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. उपयोगिता वाहने (युटिलिटी व्हेइकल्स ) आणि स्कूटर्स वगळता अन्य सर्व वाहनांच्या विक्रीने मे महिन्यात घसरणीचा सूर आळवला असल्याचे ‘सियाम’ने म्हटले आहे.


‘सियाम’ 1997 - 98 पासून देशातील वाहन विक्रीची नोंद ठेवण्यास सुरू केल्यापासून या अगोदरच्या एप्रिल महिन्यात मोटारींची विक्री लक्षणीय 10.43 टक्क्यांनी घसरून 1,50,789 मोटारींवर आली आहे. प्रवासी मोटारींच्या विक्रीमध्ये सलग सहा महिने घसरण झालेली असून अवजड वाहनांच्या विक्री सलग 15 महिने घसरली तर मोटारसायकलींची विक्री सलक चौथ्या महिन्यात घसरली असल्याचे ‘सियाम’चे महासंचालक विष्णू माथूर यांनी सांगितले.


सरसकट सर्व प्रकारच्या वाहनांची एकूण विक्री यंदाच्या मे महिन्यात 0.93 टक्क्यांनी घसरून ती 14,98,909 वाहनांवर आली आहे. अगोदरच्या वर्षात याच कालावधीत 15,12,986 वाहनांची विक्री झाली होती.


वाहन विक्रीची चावी मान्सून, आर्थिक वाढीच्या हाती
आर्थिक वृद्धी झाली तरच या उद्योगाला काहीशी गती मिळण्याची अपेक्षा आहे; परंतु त्यासाठी केवळ व्याजदर कमी होणे पुरेसे ठरणार नाही. वाहन बाजारात एकूणच मरगळीचे वातावरण आहे. यंदा पाऊस चांगला झाला तर वाहन उद्योगाला थोडा आधार मिळेल. निदान दुचाकी आणि लहान मोटारींच्या विक्रीमुळे या उद्योगाच्या चेह-यावर हसू बघायला मिळेल, असे मत माथूर यांनी व्यक्त केले. नव्या मोटारींमुळे वाहन बाजाराला संजीवनी मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


रोजगार कपातीची भीती
वाहन उद्योगातील सततच्या मंदीच्या वातावरणामुळे रोजगार कपात करण्याबाबत काही घडामोडी सुरू असल्याची सध्या तरी आपल्याकडे माहिती नाही. कदाचित त्याची सुरुवात लवकरच होण्याची भीती माथूर यांनी व्यक्त केली. याचा पहिला फटका कंत्राटी किंवा तात्पुरत्या कर्मचा-यांना बसण्याची शक्यता आहे. मोटारींची मागणी कमी झाल्यामुळे कदाचित मूळ सुट्या भागांची निर्मिती करणा-या कंपन्यादेखील याच पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता माथूर यांनी व्यक्त केली.


सरकारच्या पुढाकाराची गरज
याअगोदर 2008 - 09 मधील मंदीच्या काळात वाहन उद्योगाला आधार देण्यासाठी सरकारने हस्तक्षेप केला होता, पण या वेळी सरकारने तसा पुढाकार घेतलेला नाही, परंतु सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे मत माथूर यांनी व्यक्त केले.