चढ्या व्याजदरामुळे वाहनांची / चढ्या व्याजदरामुळे वाहनांची विक्री घटली

May 11,2013 04:37:00 AM IST

मुंबई - आर्थिक मरगळ, चढ्या व्याजदरामुळे वैतागलेल्या मोटारप्रेमींची पावले शोरूम्सकडे अद्यापही वळत नसल्याने वाहन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. मागणी आटल्यामुळे सलग सहाव्या महिन्यात मोटार कंपन्यांची विक्रीची वाट चुकली असल्याचे दिसून येत आहे.


‘सियाम’ या वाहन संस्थेच्या आकडेवारीनुसार यंदाच्या एप्रिल महिन्यात देशातील प्रवासी मोटारींच्या विक्रीत 10.43 टक्क्यांनी घसरण होऊन ती मागील वर्षातल्या याच महिन्यातील 1,68,354 वाहनांवरून 1,50,789 वाहनांवर आली आहे. ग्राहकांच्या नकारात्मक मानसिकतेचा मोटारींच्या विक्रीवर परिणाम होत आहे. वाहन बाजारातील परिस्थिती सुधारण्यासाठी बजेटमध्येही काही करण्यात आलेले नाही, असे सियामचे उपमहासंचालक सुगातो सेन म्हणाले. एप्रिल महिन्यातील मोटार विक्रीतील घसरणीचे प्रमाण जवळपास 10.43 टक्के असून ते 2002 पासूनचे सर्वाधिक प्रमाण आहे.


पीछेहाट सुरूच
1997-98 पासून सियामने वाहन कंपन्यांच्या विक्रीचे संकलन करण्यास प्रारंभ केला. परंतु तेव्हापासून मोटार विक्रीत इतकी सलग, प्रदीर्घ झालेली घट बघितली नव्हती, असे सेन म्हणाले.


आणखी दोन महिने
वाहनांच्या विक्रीतील घसरणीचा कल आणखी दोन महिने कायम राहण्याची शक्यता आहे. इंधनाच्या किमती थोड्याफार कमी झाल्यामुळे ग्राहकांची पावले पुन्हा शोरूम्सकडे वळू लागली आहेत.

X