आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Automobile Industry News In Marathi, Foreign Investment, Divya Marathi

वाहन उद्योगावर मंदीचे सावट, ऑटो क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीत 85 % घट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मागणी घटल्याने मागील दोन वर्षांपासून घसरणीचा सामना करणा-या देशातील वाहन उद्योगात चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते मे या काळात थेट विदेशी गुंतवणुकीत (एफडीआय) सुमारे 85 टक्के घट झाली आहे.औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाच्या (डीआयपीपी) आकडेवारीनुसार एप्रिल ते मे 2013 या काळात वाहन क्षेत्रात 47.8 कोटी डॉलरची विदेशी गुंतवणूक आली होती.
यंदा मात्र याच काळात केवळ 7.3 कोटी डॉलर एफडीआय आकर्षित झाला आहे. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, विक्री आणि निर्यात या दोन्ही आघाड्यांवर देशातील वाहन उद्योगाला घसरणीला सामोरे जावे लागते आहे.एका उद्योग विश्लेषकाच्या मते, वाहन क्षेत्र सध्या मंदीच्या बाहेर पडण्यासाठी झगडत आहे. मागील दोन वर्षांत देशातील वाहन कंपन्या आपल्याकडील क्षमतेचा पूर्ण वापर करू शकलेल्या नाहीत. देशातील कार विक्री सलग दुस-या आर्थिक वर्षात (2013-14) घसरणीच्या रस्त्यावर आहे. या काळात विक्री 4.65 टक्के घटली आहे. घटलेली मागणी हे विक्रीतील घटीचे प्रमुख कारण आहे.

कारची निर्यात घसरली
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जुलै दरम्यान कारच्या निर्यातीत 5.02 टक्के घसरण झाली आहे. या काळात 1,71,274 कारची निर्यात झाली. गतवर्षी याच काळात 1,80,332 कारची निर्यात झाली होती. याच काळात इतर काही क्षेत्रातील गुंतवणुकीतही घट आली आहे. औषध निर्माण (फार्मा) क्षेत्रात या काळात 68 कोटी डॉलरची विदेशी गुंतवणूक झाली. विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सरकार पावले टाकते आहे. देशात उद्योग करणे सुलभ करणे आणि एफडीआयचे धोरण उदार बनवणे याचा यात समावेश आहे. सियामने याची आकडेवारी दिली आहे.

* 1000 कोटी रुपयांची गरज पाच वर्षांत पायाभूत क्षेत्रासाठी लागणार आहे

* विदेशी गुंतवणुकीची गरज
देशासाठी विदेशी गुंतवणूक अत्यंत महत्त्वाची आहे. बंदरे, विमानतळ आणि राष्ट्रीय महामार्ग यासारख्या पायाभूत संरचना क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी आगामी पाच वर्षांत सुमारे 1000 अब्ज डॉलरची आवश्यकता आहे. आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये भारतातील एकूण एफडीआय वाढून 24.29 अब्ज डॉलर झाला आहे. गतवर्षी याच काळात 22.42 अब्ज डॉलर एफडीआय होता.